१४ वर्षांच्या करणवने लिहिलीत ११ पुस्तकं. तो पुस्तकातून काय सांगतोय?

Image: magzter 

जसजसा हवामान बदलाचा प्रश्न गंभीर होत आहे तसा लोकांचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. जगभरातून पर्यावरणावर काम करणारी माणसं हवामान बदल, त्याचे परिणाम , ते रोखण्यासाठी आपण काय करु शकतो हे इतरांना समजून सांगंयासाठी, त्याचं गांभीर्य इतरांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी, ही गंभीर गोष्ट थांबवण्यासाठी अनेकजण त्यावर पर्याय शोधत आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये, धडपडणाऱ्यांमध्ये लहान मुलंही मागे नाही. उलट आम्ही लहान असलो म्हणून काय झालं पण आम्ही हे करु शकतो म्हणत मुलंही पर्यावरण संरक्षणासाठी कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. मुलांनी पर्यावरण, हवामान बदल या विषयांवर काम करणं हा मोठ्यांसाठी फक्त कौतुकाचाच विषय ठरला नाही तर अनेकांना मुलांच्या कामातून आपणही काम करण्याची प्रेरणा मिळते आहे. मुंबईचा १४ वर्षांचा करण रस्तोगी हा असाच लहान मोठ्यांना आपल्या कामातून शहाणं करतो आहे, प्रेरणा देतो आहे. करणवने सहा वर्षांचा होता तेव्हापासून पर्यावरणावर पुस्तकं लिहिण्यास सुरुवात केली. ' कार्तिक ॲण्ड मिक्सी: अ जर्नी अबाउट क्रिएशन' नावाचं पुस्तक लिहिलं. तो आठ वर्षांचा असताना ते प्रसिध्द झालं.

करणव लहान होता तेव्हाच त्याच्या मनावर इंग्लीश कवी लाॅर्ड बार्यन यांच्या 'शाईच्या एका थेंबाने कोट्यावधी माणसं विचार करु लागतात' या वाक्यानं प्रभाव पडला. त्यालाही व्यक्त होण्यासाठी लिहिणं हा उत्तम पर्याय वाटतो. करणव १४ वर्षांचा आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो लिहितो आहे.  स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होवून आतापर्यंत  त्याने ११ पुस्तकं लिहिली आहेत. करणवने मॅजिक डस्टबीन, झाडं, मॅजिकल सीड्स, पाण्याचं प्रदूषण या विषयांवर लिहिलं आहे.

हेही वाचा!

निसर्ग, पर्यावरण ही करणवची मोठी प्रेरणा आहे. कोविडच्या कालावधीत प्लॅस्टिक प्रदूषणावर त्याने बरंच वाचलं, ऐकलं आणि पाहिलंही. पृथ्वीला प्लॅस्टिक प्रदूषणापासून वाचवायचं असल्यास काय करावं लागेल याचा तो विचार करायला लागला. सर्वात आधी आपण कमी प्रदूषण करायचं नव्हे प्रदूषण करायचंच नाही हा पर्याय त्याने स्वीकारला. वयाच्या ११ व्या वर्षी करणव प्लॅस्टिकवर निरनिराळे उपाय शोधणारा, प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्याचे पर्याय सांगणारा , त्यावर लिहिणारा प्लॅस्टिक चॅम्पियन झाला. त्याने 'कार्तिक डॅडी ॲण्ड प्लॅस्टिक: अ जर्नी अबाउट बिटींग प्लॅस्टिक पोल्यूशन', कार्तिक मिक्सी ॲण्ड माॅन्स्टर: अ जर्नी अबाउट ओशन पोल्यूशन' ही दोन काॅमिक पुस्तकं (चित्रकथा) त्याने लिहिल्या.

हवामान बदलाच्या परिणामांविरुध्द लढण्यावर प्रकाश टाकणारं कार्तिक मिक्सी ॲण्ड क्लायमेट चेंज: इट्स नाउ ऑर नेव्हर' हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकासोबत ज्या कडुनिंबाच्या बिया दिल्या त्या आपल्या परिसरात लावण्याचं आवाहन करणव वाचकांना करतो.

Image: sofworld.org

Image:.tinkle.in

लिहिण्या व्यतिरिक्त करणव मुलांसाठी, स्वयंसेवी संस्थासाठी कार्यशाळा घेतो. शिबीरं घेतो. आपल्या आतला लेखक शोधणे ही त्याची थीम हे. यावर शिबीरं घेवून हवामान बदलाशी लढण्यासाठी, त्यासाठी नियोजन करण्यासाठी लोकांना करणव जागरुक करत आहे. त्याला येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात आणि केंद्र शासित प्रदेशात १०,००० मुलांसोबत शिबीरं घ्यायची आहे. शिबीरात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आणखी १० जणांना पर्यावरण बदलाबाबत काम करण्यास तयार करावेतसासं आवाहन करणवने केले हे. १०,००० विद्यार्थी जेव्हा प्रत्येकी १० मुलांना तयार करतील तेव्हा आपल्याकडे १ लाख हवामान योध्दे म्हणजे क्लायमेट चेंज वाॅरियर्स तयार होतील आणि ते किमान १०,००० झाडं लावतील असा विश्वास करणवला वाटत आहे.

करणवबद्दल वाचून झाल्यावर तुम्हीही आपल्यातला लेखक जरा बाहेर काढा, त्याला जागा करा आणि त्याला लिहायला लावा. तुमच्यातल्या लेखकाला कशावर लिहायला आवडेल हे ऊर्जालाही नक्की सांगा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact