वाया जाणाऱ्या अन्नातून प्राण्यांना मेजवानी देणाऱ्या कोईची यांच्या धडपडीची गोष्ट

ग्रीन वॉरियर

Image:thecooldown

घरात एखादी आपली आवडती गोष्ट आईने तयार केली की ती किती खाऊ आणि किती नाही असं होतं आणि अधाशासारखं आपण ते ताटात वाढूनही घेतो. मग खाता खाता लक्षात येतं की जेवढं आपण ताटात वाढून घेतलं आहे तेवढं तर आपण खाऊच शकणार नाही. मग काय पोट भरलं की कितीही चांगलं असलं तरी आपण उष्टं टाकून देतो. आणि आपल्या आवडीचे पदार्थ नसतील तर मग विचारायलाच नको, नाही आवडलं तर अनेकजण अन्न सरळ ताटात टाकून उठून जातात. आपण उष्टं टाकलेलं अन्न इतर कोणी खाऊ शकत नाही. मग ते सरळ कचऱ्यात जातं. आणि हा कचरा दुसऱ्या दिवशी घंटागाडीत जातो. तिथून आपण वाया घालवलेल्या अन्नाचा असा प्रवास सुरु होतो जो आपल्या पृथ्वीसाठी घातक असतो. आपल्यासारखे अन्न उष्टं टाकणारे खूपजण असतात. त्यामुळे टनावारी अन्न वाया जातं. आणि हे अन्न पृथ्वीला घातक असे ग्रीन गॅसेस उत्सर्जनाचं प्रमाण वाढवायला कारणीभूत ठरतात. वाया जाणारं अन्न, अन्नाची नासाडी ही फक्त आपल्या देशातलीच समस्या नसून जगभरातली आहे. पण तरीही त्यावर उपाय शोधणारे, त्यासाठी धडपडणारे मात्र फारच कमी जण असतात. जपानमध्येही वाया जाणाऱ्या अन्नाची समस्या मोठी होती. या समस्येचे गंभीर पर्यावरणीय परिणाम बघून या देशाने वाया जाणाऱ्या अन्नावर एक प्रभावी उपाय शोधला आहे.

हेही वाचा!

पडांगटेगल हे गाव झालं जगात पाॅप्युलर.. या गावाकडे आहे एक सीक्रेट!

कोईची ताकाहाशी या जपानमधील पशुवैद्यकांनी म्हणजे प्राण्यांच्या डाॅक्टरांनी वाया जाणाऱ्या अन्नावर उपाय शोधला आणि तो अंमलात आणला. कोईची यांनी वाया जाणाऱ्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी 'जपान फूड इकाॅलाॅजी सेंटर‘ सुरु केलं आहे. या सेंटरमध्ये वाया जाणाऱ्या अन्नावर प्रक्रिया करुन त्यातून 'पिग फूड'म्हणजे डुकरांचं खाद्य तयार केलं जातं. जपानमध्ये पाळीव डुकरांचं मांस विकल जातं. त्यासाठी पिग फार्ममध्ये डुकरं पाळली जातात. बाजारात डुकरांचं खाद्य फारच महाग असतं. शिवाय त्याचा दर्जाही खूप चांगला असतो असं नाही. पण वाया जाणाऱ्या अन्नावर प्रक्रिया करुन जपानमधील पिग फार्म चालवणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं पिगफूड परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देण्याचा मार्ग कोईची यांनी शोधला आहे.

कोईची यांनी काय केलं?

- अन्न ज्या विविध ठिकाणी वाया जातं त्या ठिकाणांहून म्हणजे सुपरमार्केट, अन्न उत्पादक कंपन्यातून उरलेलं , वाया गेलेलं अन्न गोळा केलं जातं. ते ' जपान फूड इकाॅलाॅजी सेंटरमधे आणलं जातं. त्यात उरलेला भात, भाज्यांची सालं असं सगळं असतं. ते सर्व आधी निवडून त्याचं वर्गीकरण केलं जातं. नंतर ते अगदी बारीक केलं जातं. ते आधी निर्जंतुक केलं जातं. नंतर लॅक्टिक ॲसिड जीवाणु वापरुन त्यावर किण्वन प्रक्रिया केली जाते. म्हणजे ते आंबवलं जातं. या प्रक्रियेतून उच्च पोषण मूल्याचं खाद्य तयार होतं. हे खाद्य फ्रीजमध्ये न ठेवताही पुढचे दहा दिवस व्यवस्थित टिकू शकतं.
- या तंत्रानं वाया जाणाऱ्या अन्नाची योग्य व्यवस्था लागली. तेथील पिग फार्मरना फायदा झाला. पिग फीडवरचा त्यांचा खर्च निम्म्यानं कमी झाला आणि परवडणाऱ्या दरात त्यांना उत्तम प्रतीचं पिग फूड उपलब्ध झालं. यातून त्याच्या फार्ममधील उत्पादनाचा दर्जाही वाढला.
- आधुनिक यंत्रणा आणि आंबवण्याची पारंपरिक पध्दत यांचा मेळ घालून अन्न पुर्नप्रक्रिया व्यवस्था यशस्वीपणे राबवता येते हे कोईची यांच्या प्रयोगानं दाखवून दिलं. आंबवणं ही जपानच्या समृध्द इतिहासाचा भाग आहे. या प्रक्रियेसोबत आधुनिक शास्त्राचा वापर करुन जपानमध्ये वाया जाणाऱ्या अन्नावर जो उपाय शोधला गेला त्याचा सध्याच्या पर्यावरणसमस्या सोडवण्यासाठीही फायदा झाला.
- शाश्वत उपाय आणि नफा या दोन गोष्टी हातात हात घालून राबवता येतात आणि त्याचा फायदा पर्यावरण जपण्यासाठी करता येतो हे जपानमधील या प्रयोगाने जगाला दाखवून दिलं. तसेच आपआपल्या देशातील अन्न नासाडीच्या उपायावर काम करण्यासाठी हा प्रयोग मार्गदर्शक बनला आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact