कार्बन फूटप्रिंट्स म्हणजे काय? ते कमी करायचे म्हणजे काय करायचं ?

Image: naeco.com

प्रदूषण कोण करतं? असा प्रश्न विचारला तर आपण लगेच कारखाने, उद्योग, कंपन्या यांची नावं घेतो. पण आपणही प्रदूषण करतो असं कधी म्हणतो का? कारण आपल्याला वाटतं आपण प्रदूषण करतच नाही. पण असं नसतं. दिवसभरात आपण अनेक गोष्टी अशा करतो त्यामुळे प्रदूषण होतं. म्हणून तर पर्यावरण तज्ज्ञ सतत लोकांना 'कार्बन फूटप्रिण्ट्स' कमी करण्याचं आवाहन करत असतात. तुमची गाडी कार्बन फूटप्रिण्ट्सवर नक्कीच अडली असणार.. बरोबर ना?

कार्बन फूटप्रिण्ट म्हणजे?

सोप्पं आहे. एक उदाहरण देते. आपलंच. पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर खेळून घरी जातो, तेव्हा आपल्याला दिसतं की घर छान आवरलेलं आहे. फरशीही स्वच्छ आहे. पण आपण तसंच पायात चपला/ बूट ठेवून किंवा पाय पायपोसण्याला न पुसता घरभर फिरुन येतो. मग काय आपले मातीचे पाय सर्व घरात उमटतात. आई चिडते. आपल्याला आपणच केलेली चूक नजरेस आणून देते. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मातीच्या पायांमुळे घर कसं घाण झालंय ते. कार्बन फूट प्रिण्टचंही असंच असतं. कार्बन फूटप्रिण्ट्स म्हणजे आपण रोज अशा काही कृती करतो की ज्यामुळे पर्यावरणाच नुकसान होतं. शास्त्रीय भाषेत कार्बन फूट प्रिण्टस म्हणजे आपल्या कृतीतून तयार होणाऱ्या ग्रीन हाऊसचं एकूण प्रमाण. जगात अमेरिकेतल्या माणसाचे कार्बन फूटप्रिण्ट्स सर्वात जास्त आहे. अमेरिकेतला प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सरासरी १६ टन म्हणजे १४,५१५ किलो कार्बन फूटप्रिण्टस तयार करतात. अमेरिका सोडून जगभरातील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी ४ टन म्हणजे ३६२८. ७४ किलो कार्बन फूटप्रिण्ट्स तयार करतात. जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी २०५० पर्यंत कार्बन फूटप्रिण्ट्सचं प्रमाण वर्षाला ४ टनावरुन २ टन म्हणजे १८१४.३७ किलोवर आणायचं आहे. २ टन कार्बन फूटप्रिण्ट्सचं लक्ष गाठणं ही सोपी गोष्ट नसली तरी अशक्य तर अजिबात नाही. आपण दिवसभरात काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास आपण हे लक्ष गाठू शकतो.

हेही वाचा !

आपले कार्बन फूटप्रिण्ट्स कसे कमी कराल?

पर्यावरण अभ्यासक पर्यावरणाबाबतचे धोके, प्रश्न याबद्दल आपल्याला माहिती देताना आपल्याला जमतील तसे कोणते उपाय करावेत हे देखील सांगर्त असतात. आपले कार्बन फूटप्रिण्ट्स कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी खूप सोपे उपाय सांगितले आहेत.

१. आपण अभ्यास करुन झाल्यावर खोलीतील लाइट, पंखा सुरु ठेवून टी.व्ही पाहायला, जेवायला नाहीतर खेळायला निघून जातो. ही सवय असल्यास ती आधी बदलावी. आपलं काम झाल्यावर खोलीतले दिवे, पंखा आठवणीने बंद करावा.

२. दात घासताना बेसिनचा नळ आपण सरळ सुरु ठेवतो. इकडे आपण दात घासण्यात दंग असतो आणि दुसरीकडे पाणी मात्र वायाच जात असतं. असं न करता पूर्ण दात घासून झाल्यावरच बेसिनचा नळ सुरु करावा.

३. आपलं घर पहिल्या मजल्यावर असू देत किंवा चौथ्या. लिफ्टचा कमीत कमी वापर करुन पायी जिना चढावा आणि उतरावा.

४. अभ्यासाचा क्लास, खेळण्याचा क्लास जवळच असतो. तरी आपण रिक्षेने जातो किंवा आई बाबांना सोडून देण्याचा हट्ट करतो. तसं न करता जवळच्या जवळ पायी जावं किंवा सरळ सायकल वापरावी. आणि आपल्या आई बाबांनाही जवळच्या जवळ कामं असतील तर ती पायी फिरुन करण्याचा आग्रह करावा.

५. वापरलेले कागद, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक बाॅटल्स कचऱ्यात न टाकता ते रिसायकलसाठी द्यावेत. मोठ्यांना याबद्दल माहिती असते त्यांना विचारावं.

६. घराच्या, इमारतीच्या बागेत झाडं लावावीत. लावलेल्या झाडांची काळजी घ्यावी.

Image: freepik

हेही वाचा !

Image: easel.ly

७. अनेकदा टी.व्ही सुरु असतो आणि आपण मात्र इतर गोष्टी करण्यात दंग असतो. अशा वेळेस आधी टी.व्ही बंद करावा.

८. चार्ज झालेला मोबाइल काढून घेतल्यानंतर आपण बटन बंद करायचं विसरुन जातो. तसं न करता आधी लाइटचं बटन बंद करुन मोबाइल चार्जर काढून घ्यावा.

९. बाहेर गेलं की तहान लागतेच. अशा वेळी घरातूनच स्टीलची बाटली भरुन सोबत घ्यावी. प्लॅस्टिकची बाटली असल्यास ती रिकामी झाल्यावर कचरा नको म्हणून ती सरळ बाहेर टाकून दिली जाते. पर्यावरणासाठी ही सवय अतिशय घातक मानली जाते.

१०. आईने दुकानात सामान आणायला पाठवल्यास हात हलवत न जाता सोबत घरातली कापडी पिशवी न्यावी. आणि आई बाबांनाही प्लॅस्टिकच्या पिशव्यांपेक्षा कापडी पिशवीच वापरा हा आग्रह केला पाहिजे.

११. भाज्या, फळं खराब झाल्यास ती कचऱ्यात न टाकता आपल्या बागेतील कुंड्यामध्ये टाकावी. त्याचं खत होतं.

१२. आंघोळीच्या वेळेस पानी खेळण्याची चांगली संधी मिळते. आंघोळ कमी आणि पाणी खेळणं जास्त असाच उद्योग सुरु असतो. ही सवय लगेच बदलून टाकवी. कमीत कमी वेळेत, कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छ आंघोळ करण्याची सवय लावावी.

१३. घरात टी.व्ही पाहण्यात, मोबाइलवर गेम खेळण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरळ उठावं आणि बाहेर खेळायला जावं.

आपले कार्बन फूटप्रिण्टसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे वरील नियम पाळले तरी पर्यावरणाला त्याचा खूप फायदा होवू शकतो. मग करायची ना सुरुवात आजपासूनच.. कार्बन फूटप्रिण्ट कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या सवयींमध्ये काय बदल केला ते मलाही कळवाल का?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact