
Image: .fox5atlanta
दक्षिण अटलांटिक महासागरावरील सेंट हेलेना बेट. या बेटाची जगभर चर्चा आहे, ती एका कासवामुळे . काही महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये नाताळाच्याआधी या बेटावर या कासवाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. या वाढदिवसाला या बेटावर राहाणाऱ्या नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली आणि आपल्या लाडक्या जोनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना केली. लोकांना जोनाथन सोबत स्वत:चे फोटो काढून घेतले. या बेटावर जोनाथन सर्वांसाठीच खूप 'स्पेशल' आहे. इतका की त्याची प्रतिमा असलेलं एक नाणंही काढण्यात आलं आहे. सेंट हेलेना बेटावरचा जोनाथन इतका स्पेशल आहे, कारण जोनाथन हा जमिनीवरील प्राण्यांमधला जगातला सर्वात वयस्कर प्राणी आहे. जोनाथनचा १९० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. जोनाथनची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड'नेही घेतली आहे.
हेही वाचा!
जोनाथनचा वाढदिवस सेंट हेलेना बेटावरील 'प्लॅण्टेशन हाऊस' या गर्व्हनरच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. जोनाथन या प्लॅण्टेशन हाऊसमध्येच राहातो. वाढदिवसाला जोनाथनसाठी त्याच्या डाॅक्टरांनी जो हेलिन्स यांनी त्याला आवडणाऱ्या फळं आणि भाज्यांचा केक केला होता. हा केक जोनाथन मिटक्या मारत संपवला. सेंट हेलेना बेटावरील लोक जोनाथनला आपली राष्ट्रीय संपत्ती मानतात.
जोनाथन हा मूळचा सेशेल्स बेटावरचा. हे बेट आहे आफ्रिका खंडाच्या पूर्वेला. १८८२ मध्ये जोनाथनला सेशेल्सवरुन सेंट हेलेना बेटावर आणलं गेलं. तेव्हापासून आजतागायत जोनाथन या बेटावरच राहतो. जोनाथन सोबत आणखी तीन कासव आणले होते. सर विल्यम ग्रे विल्सन जे नंतर सेंट हेलेनाचे गव्हर्नरही झाले, त्यांना जोनाथन भेट म्हणून देण्यात आला होता. जोनाथन हा शेलोनिअन वर्गातील सर्वात वयस्कर कासव आहे.

Image: twitter
जोनाथन आपला संपूर्ण दिवस हा डेव्हिड, एमा आणि फ्रेड या तिघा कासवांसोबत घालवतो. जोनाथनला ऊन खूप प्रिय. ऊन पडलं की जोनाथन कवचातून आपली लांब मान वर करतो, पाय शक्य तितके ताणून उन्हात छान शेकून घेतो. थंडीच्या दिवसात जेव्हा सूर्यप्रकाशाचा अभाव असतो , तेव्हा जोनाथन स्वत:ला बागेतील झाडांच्या मोठ्या पानांमध्ये स्वत:ला गुंडाळून घेतो किंवा मोठ्या झालेल्या गवतामध्ये लपून बसल्यासारखा बसतो.

Image: sthelenatourism
जोनाथनला दिसत नाही आणि वासही घेता येत नाही. पण त्याची ऐकण्याची क्षमता जबरदस्त आहे. जोनाथनला आठवड्यातून एकदा त्याचे डाॅक्टर हाताने खाऊ घालतात. या आहारातून जोनाथनला उष्मांक (कॅलरीज) जीवनसत्वं आणि खनिजं दिली जातात. जोनाथनला माणसांचा सहवास खूपच प्रिय. त्यातही आपल्या डाॅक्टरांचा आवाज ऐकला की जोनाथला खूपच आनंद होतो. आता आपल्याला चांगलं खायला मिळणार, याचा अंदाज तो या आवाजावरुन लावतो. असा हा जोनाथन १९० वर्षांचा आहे, आणि तो आनंदी असून त्याची तब्येत उत्तम असल्याचं त्याच्या डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
कासव एवढे जगतात?
कासव संवर्धन सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार कासवांच्या बहुतेक प्रजाती १० ते ८० वर्षांपर्यंत जगतात. समुद्री कासव आणि जमिनीवरील कासव हे त्यापेक्षाही जास्त जगतात. जोनाथन सारखेच दीघायुष्य लाभलेले काही कासव होते, जे आता अस्तित्त्वात नाही. त्यामुळे जोनाथन हा सध्या जमिनीवरील सर्वात वयस्कर प्राणी आहे आणि दीर्घायुषी कासवही. आणखी चार कासव दीर्घायुषी होते.
१. हेरिएट - द जायण्ट गॅलापागोस लॅण्ड टाॅरटाॅइज- १८३० मध्ये जन्मलेलं हे कासव मादी होते. ऑस्ट्रेलियात राहाणारं हे कासव १७५ वर्षं जगलं.२००६ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
२. टुई मालिया द रेडिएटड टाॅरटाॅइज- हे कासव मादी होते. ते १८९ वर्षं जगले. १९६६ मध्ये या कासवाचा मृत्यू झाला.
३. अद्वैता द ॲल्डब्रा जायण्ट टाॅरटाॅइज- हे कासव नर होते. भारतात कोलकत्तामध्ये असलेलं हे कासव २५५ वर्षं जगलं . २००६ मध्ये या कासवाचा मृत्यू झाला.
४. अल्गबा- द आफ्रिकन स्पर थाईड टाॅरटाॅइज- मादी असलेलं हे कासव आफ्रिकेतील नायजेरियामध्ये राहात होतं. २०१९ मध्ये एका छोट्याशा आजारपणात या कासवाचा मृत्यू झाला.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact