
Image: unsplash
उन्हाळा म्हणजे सुट्या.. उन्हाळा म्हणजे फिरायला जाणं.. मस्त आंबे, कलिंगड खाण्याचे दिवस. दुपारी कसंबसं घरात थांबून संध्याकाळची चाहूल लागताच बाहेर उनाडपणा करायला जाण्याचे दिवस म्हणजे उन्हाळा. बाहेर सूर्य आग ओकत असला तरी तुम्हा आम्हा मुलांना मात्र उन्हाळा फारच प्रिय. बाहेर ऊन सोसलं नाही की घरात येवून पंख्याखाली किंवा कूलरसमोर बसायचं किंवा एसी असेल तर एसी सुरु करुन गारेगार व्हायचं. अशा परिस्थितीत बाहेर ऊन तळपतंय ही गोष्ट देखील आपण विसरुन जातो. उन्हाळ्याचा आपल्याला जसा आनंद होतो, तसा आनंद निसर्गातील प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांनाही होतो का? त्यांच्यासाठी उन्हाळा नेमका काय असतो? भर ऊन्हात यांना काय वाटत असेल बरं, असा विचार केला तर त्याचं उत्तर काय असेल?
हेही वाचा!
आपल्या परिसंस्थेचा विचार केला तर उन्हाळ्याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणच्या वातावरणानुसार बदलतो. पृथ्वीवर काही ठिकाणी उन्हाळा म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. तर काही ठिकाणी उन्हाळा खूपच मोठा असतो. जवळ जवळ सहा महिने एवढा काळ उन्हाळा असतो. तर काही ठिकाणी उन्हाळा इतका सौम्य असतो, की तो जाणवत देखील नाही. पण जगभरात उन्हाळ्यात एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे सर्वत्र नेहमीच्या तापमानापेक्षा उन्हाळ्यात तापमान जास्त असतं.
ओलसर भागातला उन्हाळा
उन्हाळा म्हणजे उष्णता. ही उष्णता पर्यावरणासाठी शाप आणि वरदान अशी दोन्हीही प्रकारे काम करते. उन्हाळ्यातील उष्णता प्राणी आणि वनस्पती यांना जगण्यासाठी आवश्यकच असते. उलट वनस्पतींच्या जगात तर सूर्यप्रकाश मिळवण्याची स्पर्धाच लागलेली असते. उष्णकटिबंधीय प्रदेशातील परिसंस्थेत झाडं, झाडांची छोटी छोटी रोपं ही सूर्याचा प्रकाश मिळवण्यासाठी आपल्या पानांना, फांद्यांना सूर्य प्रकाशाच्या दिशेने ताणतात. ज्या लहान रोपांना, झुडपांना उन्हाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, जी सावलीतच राहतात ते रोपं, झुडुपं मरुन जातात.
वनस्पतींप्रमाणे प्राण्यांवरही उष्णतेचा परिणाम होतो. ओलसर वातावरणात उन्हाळ्यातील उष्णतेमुळे जिवाणू, लहान सहान कीटक यांच्यावर विशेष परिणाम होतो. उन्हाळ्यात त्यांची संख्या वाढते.या किटकांच्या अंड्याची टिकून राहाण्याची क्षमता वाढते . त्यामुळे उन्हाळ्यात लहान प्राण्यांना खायला मिळेल असं खाद्य पुरेसं वाढतं. उन्हाळ्यामुळे अशी परिसंस्थेतील अन्नसाखळी मजबूत होते.
कोरड्या वातारणातील उन्हाळा
कोरड्या वातावरणात उन्हाळ्यातील सूर्याची उष्णता प्राणी आणि वनस्पतींसाठी घातक ठरते. त्यामुळे या कोरड्या वातावरणात राहाणारे प्राणी उन्हाळ्यात दिवसभर सावलीत राहतात आणि संध्याकाळी, रात्री बाहेर पडतात. वाळवंटातील वनस्पती उन्हाळ्यात आपली रंध्रं म्हणजे वनस्पतींच्या अंगावरील बारीक छिद्रं बंद करुन घेतात. आत साठवून ठेवलेलं पाणी, कर्बोदकं ते जगण्यासाठी वापरतात. तसेच प्रथिनं तयार करण्याची प्रक्रियाही रात्री गार वातावरणात करतात. पण कोरड्या वातावरणात काही प्राण्यांना मात्र सूर्याची उष्णता हवी असते. थंड रक्ताचे प्राणी म्हणून ओळखले जाणारे पाल, सरडा, साप यांना सूर्य किरणांचा ऊबदारपणा हवा असतो. उन्हाळ्यात हे प्राणी जास्त सक्रीय असतात. ते या काळात इतरत्र जास्त पसरतात, तसेच प्रजननासाठी सोबती शोधतात.
निसगाचे अभ्यासक काय म्हणतात?
अभ्यासक म्हणतात की प्राणी आणि पक्षीदेखील ऋतूचक्राप्रमाणे आपली जगण्याची वागण्याची दिशा ठरवतात. सूर्य प्रकाशाच्या चक्राने प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या जीवनचक्रावर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या काळात अनेक प्राणी प्रजनन करतात. त्यामुळे वसंत ऋतूत ते पिल्लांना जन्म देतात आणि उन्हाळ्यात त्यांच्या पिल्लांना वाढवतात. या काळात पिल्लांना वाढवण्यासाठी निसर्गात त्यांच्यासाठी भरपूर खाद्य ( छोटे किटक) उपलब्ध असतं.

Image: seasonsyear
थंड प्रदेशातील प्राणी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहातात. जेव्हा बर्फ वितळायला सुरुवात होते तेव्हा चारा पाणी आणि प्रजनानासाठी स्थलांतरित झालेले पक्षी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परततात. झाडं वनस्पती देखील फुलांसाठी किवा बिया उगवण्यासाठी योग्य काळाची वाट पाहात असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या वातावरणात उन्हाळ्याला सामोरं जाण्याची निसर्गाची पद्धत विशेष असते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact