दोन शब्द एकत्र करा आणि एक नवीन शब्द बनवा! हा खेळ कसा खेळायचा?

- उज्ज्वला बर्वे

Image: freepik

आमच्या सोसायटीतली छोटी मुलं रोज संध्याकाळी बागेत खेळतात. मला त्यांची दंगामस्ती बघायला छान वाटायचं म्हणून मी जवळच्याच एका बाकावर बसायला लागले. हळूहळू आमची दोस्ती झाली. मुलं खेळून दमली की माझ्याजवळ येऊन गप्पा मारायला लागली.
एकदा मुलांनी मला विचारलं ‘तुम्हाला आम्ही काय म्हणू?’ मी म्हणाले, ‘उज्ज्वला आजी म्हणा.’
प्रणव पटकन म्हणाला, ‘उज्जी म्हणू का? दोन नावं एकत्र करण्याची फॅशन आहे. माझ्या एका दादाच्या लग्नात हॅशटॅग केला होता मिहिरिका... मिहीर आणि निहारिका मिळून.’
मी म्हणाले, ‘हरकत नाही. पण एक अट आहे. तुम्ही प्रत्येकाने दोन शब्द किंवा नावं एकत्र करून एक नवा शब्द तयार करून दाखवायचा. चालेल?’
चक्क तयार झाली की मुलं. ‘मी सांगू? मी सांगू?’चा इतका गलका झाला की मी त्यांच्या नावांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार प्रत्येकाचा नंबर ठरवून दिला.
अनीहाचा पहिला नंबर. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ‘माझ्या आईबाबांचं जॉइंट नाव रीरो होईल. रीमा आणि रोहन.’ त्यावर सगळे एकदम ओरडायला लागले... ‘तसं नाही. ते तर काय नावाचं पहिलं अक्षर आहे.’

हेही वाचा!

फक्त नव्याचे नऊ दिवस टिकेल असा संकल्प नाही तर करा वर्षभर करता येतील अशा २६ गोष्टी!

शांभवी म्हणाली, ‘तसं केलं तर माझ्या आईबाबांचं मामी होईल. मानसी आणि मिथुन.’
मग सुटलेच सगळे. ऐकलेली कुठलीही नावं एकत्र करणं सुरू झालं.
प्रणव म्हणाला, ‘कावेरी आणि कुलदीप म्हणजे काकू.’ सुमेशला सुचलं, ‘आस्था आणि इशान म्हणजे आई.’
आर्या ‘बागेश्री आणि पूजा मिळून बापू’ म्हणत खिदीखिदी हसायला लागली. इतका वेळ शांत असलेला रियांश ‘सुनीता आणि सुबोध म्हणजे सुसु’ असं म्हणाल्यावर तर हास्याचं कारंजेच उसळले.
चावट शब्द तयार करण्याची चढाओढ सुरू व्हायच्या आत ‘आपण काय काय एकत्र करू शकतो?’ असं विचारल्यावर बरेच नवनवीन शब्द बनले.
नास्ता आणि जेवण - नावण, अभ्यास आणि मजा- मभ्यास, खाणं आणि गप्पा- खाप्पा, हसणं आणि रडणं- हडणं किंवा रसणं, जेवण आणि मोबाइल- जेवईल, टेस्ट आणि एक्झाम- टेक्झामवरून गाडी हळूहळू पिझ्झा आणि पास्ता- पिस्ता, वरण आणि भात- भारण, हलवा आणि गुलाबजाम- हलजामवर आली तेव्हा सगळ्यांना जोरदार भूक लागली आहे हे लक्षात येऊन आम्ही घरी जायला निघालो.
जाताना ‘बाय उज्जी!’ असं म्हणायला मात्र मुलं विसरली नाहीत.

(लेखक माध्यम अभ्यासक आहेत)
ujjwalabarve@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact