- गौरी पटवर्धन

नवीन वर्ष सुरु झालं की प्रत्येकाच्या मनात येणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संकल्प! बहुतेक सगळेच जण नवीन वर्षात काही ना काही संकल्प करतात. हे संकल्प काय असतात? माहितीये?
मी रोज लवकर उठेन, रोज व्यायाम करेन, स्क्रीन टाइम कमी करेन, घरात मदत करेन, रोज डायरी लिहीन, गृहपाठ आणि स्वाध्याय रोजच्या रोज पूर्ण करेन… वगैरे वगैरे, हो ना?
तुम्हीही आतापर्यंत अनेकदा असे संकल्प केले असतील.हो ना? मग? त्यातले किती संकल्प पूर्ण झाले बरं? खरं सांगू? यापैकी एक जरी संकल्प तुम्ही सिद्धीस नेला असेल, म्हणजे, वर्षभर नित्यनेमाने पाळला असेल तरी तुम्ही शुद्ध ग्रेट आणि थोर आहात. नवीन वर्षानिमित्त केलेले बहुतेकांचे बहुतेक संकल्प मात्र पहिल्याच आठवड्यात धारातीर्थी पडतात. असं का होत असेल?
कारण एखादा संकल्प पूर्ण करणं हे कठीण असतं. त्यासाठी कमालीचा निश्चय लागतो. शिस्तही लागते. म्हणजे संकल्प पूर्ण होत नाही म्हणजे तुम्ही निश्चयी नाही किंवा बेशिस्त आहात असं अजिबात नाही… पण संकल्प बारगळला की आपल्याकडून एक साधा संकल्पसुद्धा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपली चिडचिड होते. खरं तर चिडचिड करण्यापेक्षा नीट विचार करुन, थोडे जास्तीचे प्रयत्न करून पूर्ण करता येतील असेच संकल्प करायचे, म्हणजे ते वर्षभर पाळून पूर्ण करणं शक्य होतं.
२०२६ या नवीन वर्षात थोड्या प्रयत्नांनी पण यशस्वीपणे नक्की पूर्ण करता येतील अशा संकल्पांची एक यादी मी तुम्हाला देते. बघा तुम्हाला यात काही आवडतंय आणि करावंसं वाटतंय का?
मी रोज लवकर उठेन, रोज व्यायाम करीन, रोज डायरी लिहीन, गृहपाठ रोजच्या रोज पूर्ण करीन…हे असले संकल्प १ जानेवारीला केले की ते १० जानेवारीपर्यंत नक्की मोडतात. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सहज टिकतील असे संकल्प करायचेत का तुम्हाला? - ही घ्या यादी...
१. स्मार्ट फोनला टायमर लावेन आणि तेवढा वेळ संपला की फोन खरंच ठेऊन देईन.
२. अलार्म एकदाच स्नूझ करेन. मग लगेच उठेन.
३. रोज वेळापत्रक तपासून शाळेचं दप्तर भरेन. म्हणजे इतिहासाचा गृहपाठ गणिताच्या वहीत लिहिला असं होणार नाही.
४. शिव्या देणार नाही. एकदा पण नाही.
५. घरातलं एक काम ठरवून करीन. मग ते किती लहान का असेना. कप आणि पाण्याचे ग्लास धुवून ठेवणे इतकं लहान असेल तरी चालेल.
६. आजवर न शिकलेली एक गोष्ट या वर्षभरात शिकेन. मग ती चहा करण्याइतकी किरकोळ असली तरी चालेल.
७. या वर्षभरात अभ्यासाव्यतिरिक्तची किमान ३ पुस्तकं वाचेन.
८. अक्षर वळणदार काढायचा प्रयत्न करेन.
९. शाळेतले प्रोजेक्ट्स करायला ‘एआय’ वापरणार नाही.
१०. मित्राला/मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून गप्पा मारेन.
हेही वाचा!
प्राॅब्लेम ओळखा, उत्तर शोधा, दुरुस्तीचा आनंद मिळवा

११.. संध्याकाळचा वेळ मैदानावर किंवा किमान पार्किंगमध्ये/घराच्या बाहेर खेळण्यात घालवेन.
१२. कुठलंही ॲप किंवा गेम आईबाबांना दाखवल्याशिवाय डाऊनलोड करणार नाही.
१३. कुठलंही ऑनलाईन चॅलेंज स्वीकारणार नाही.
१४. जवळच्या मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला हँडमेड गिफ्ट देईन.
१५. ज्या खोलीत काही काम नसेल तिथले दिवे आणि पंखे बंद करेन.
१६. नळ हळू सोडेन, माझ्या हातून पाणी वाया जाऊ नये याची काळजी घेईन.
१७. उगाचच भारंभार नवीन कपडे विकत घेणार नाही.
१८. झोपायच्या एक तास आधी स्क्रीन बंद करेन.
१९. एखादी अजिबात न आवडणारी भाजी खायला शिकेन.
२०. दप्तर आणि बूट जागेवर ठेवणे, कपडे धुवायला टाकणे, बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासणे यासाठी आईबाबांना आठवण करायला किंवा ओरडायला लावणार नाही.
२१. आजीआजोबांबरोबर बँकेत जाणं, डॉक्टरांकडे जाणं, औषधं आणून देणं अशा कामांमध्ये आईबाबांना मदत करेन.
२२. लहान भावंडांच्या खोड्या काढणार नाही किंवा मोठ्या भावंडांच्या खोट्या तक्रारी करणार नाही.
२३. छोट्या टिपा घालणे, बटणं लावणे एवढं शिवणकाम शिकून घेईन.
२४. एक झाड किंवा कुंडीतलं रोप लावून ते वर्षभर जगवेन.
२५. आपल्या वस्तू जागेवर उचलून ठेवेन.
२६. एक तरी नवीन मित्र/मैत्रीण जोडेन.
patwardhan.gauri@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


