एका सेकंदात वीस वेळा टकटक करणारा सुतार आहे जंगलाचा डाॅक्टर

 

Image: https://pixabay.com

 

निसर्गात जमिनीपासून झाडाच्या शेंड्यापर्यंत वेगवेगळ्या सजीव साखळ्यांमध्ये भक्ष आणि भक्षकाचा खेळ चालू असतो. त्यात झाडाच्या खोडामध्ये लपलेल्या किटकांना खाणाऱ्या सुतार पक्ष्याला तर 'जंगलाचा डाॅक्टर' म्हटलं जातं. सुतार पक्षी सर्वत्र आढळतात. पण ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, न्यू जिनिव्हा, मदागास्कर आणि अगदी शीत ध्रुवावर आढळत नाही. प्रामुख्याने सुतार पक्षी घनदाट जंगलात आढळतात. पण झाडं नसलेल्या वाळवंटातही ते असतात. तिथल्या कॅक्टस वनस्पतींमधल्या किड्यांवर ते  गुजराण करतात.  सुतार पक्ष्याच्या २०० प्रजाती आहेत. त्यामुळे सुतार पक्ष्यात मोठ्या प्रमाणात विविधता दिसते. सर्वात लहान सुतार पक्षी तीन इंच उंचीचा असतो तर सर्वात मोठा सुतारपक्षी दोन फूट लांबीचा असतो. 

 हेही वाचा 

फळं खाऊन बिया थुंकणारा धनेश

Image: https://www.lakemetroparks.com

  उत्क्रांतीदरम्यान सुतार पक्ष्याच्या पूर्वजांनी पुढच्या पिढ्यांना दिलेल्या देणग्यांच्या जोरावर हे सुतार पक्षी झाडांच्या खोडांवर छिद्र करतात. आणि लांबसडक जिभेने आतमध्ये लपलेल्या किड्यांना खेचून काढून मटकावून टाकतात. खोडावर चिकटण्यासाठी त्यांच्या बोटांची रचनाही इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असते. म्हणजे सहसा पक्ष्यांमध्ये तीन बोटं पुढे आणि एक मागे असतं. सुतार पक्षाला  पुढे आणि मागे  दोन बोटं असतात. . त्यामुळे  सुतार पक्ष्याला झाडाच्या खोडावर घट्ट पकड धरता येते.  झाडाच्या खोडावर सुतार पक्ष्याची टकटक फक्त आतील किडे खाण्यासाठीच नसते तर अशी टकटक करुन सुतारपक्षी एकमेकांशी संवाद साधत असतात. झाडावर टकटक करणं हा त्यांच्या संवादाचा मार्ग असतो. 

Image: wordpress

सुतार पक्ष्याचा  झाडावरील आघाताचा वेग आणि संख्या किती असते माहितीय? सेकंदाला २० वेळा आणि दिवसातून हजारो वेळा. तुम्ही नुसतं सातआठ वेळा डोकं गदागदा हलवून बघा आपल्याला आपला मेंदू हलल्याचा भास होईल. चक्कर आल्यासारखं वाटेल.  यावरुन सुतार पक्ष्याच्या क्षमतेचा सहज अंदाज लावता येईल.  इतक्या वेळा झाडाच्या टणक खोडावर चोच आपटून सुतार पक्ष्याच्या मेंदूला इजा होत नसेल का? तर अजिबात नाही. एक लक्षात घ्या, नुकसान होतं ते अचानक थांबल्यामुळे. वेगामुळे नाही. सुतारपक्ष्याचा मेंदू आपल्या मेंदूसारखा द्रवामध्ये तरंगत नसून अगदी टाइट पॅक केलेला असतो. त्याच्या कवटीमध्ये, जिथे चोच कवटीला चिकटलेली असते तिथे आतमधल्या बाजूला स्पंजसारख्या पेशींचं एक्स्ट्रा पॅॅकिंग असतं. ज्यामुळे आघाताचा धक्का मेंदूपर्यंत न पोहोचता बाहेरच्या बाहेर पचवला जातो. यालाच अजून आधार मिळतो तो त्याच्या जिभेचा. सुतार पक्ष्याची जीभ त्याच्या चोचीच्या तिप्पट लांबीची असते आणि गळ्याच्या आतमधून वरच्या दिशेला कवटीच्यावरुन नाकाच्या आतल्या बाजूपर्यंत आलेली असते. म्हणजे  आपल्या सुताराकडे असलेली पत्र्याची मेजरिंग टेप जशी स्प्रिंगने गुंडाळलेली असते तशीच या सुतार पक्ष्याची जीभ असते. या लांबलचक  आणि मजबूत जिभेमुळेच सुतार पक्ष्याच्या मेंदूला अजून संरक्षण मिळतं.

 

Image: allaboutbirds.org

खोडावर छिद्र पाडत असताना त्यातून उडणारे कपचे डोळ्याला इजा पोचवू शकतात. पण डोळ्याच्या सुरक्षेची खास व्यवस्थाही सुतार पक्ष्याकडे निसर्गत:च असते.  प्रत्येकवेळी चोच खोडाला टेकली की त्याच्या पापणीच्या आतमध्ये असलेला एक दुधी रंगाचा अर्धपारदर्शक पडदा (निक्टिटेटिंग मेंब्रेन) डोळ्यावर ओढला जातो. सुतारपक्षी अन्न मिळवण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी झाडावर टकटक करतात तसेच अंडी घालण्यासाठी झाडाच्या खोडाला मोठं भोक पाडून घरटं करतात. मादी सुतार पक्षी अंडं घालण्यासाठी जमिनीपासून उंच जागेवरची जागा निवडते. घरटं तयार झाल्यावर मादी सुतार पक्षी अंडी घालतात. दोन आठवड्यांनी अंडी ऊबतात. पिल्लं अंड्यातून बाहेर आल्यानंतर पुढचे २० ते ३० दिवस काहीच करु शकत नाही. 

Image: allaboutbirds.org

 जंगलात गेल्यावर टकटक करणारा सुतार पक्ष्याचा आवाज कानाला हवाहवासा वाटतो. पण जंगल मोठ्या प्रमाणावर कमी होवू लागली आहेत. त्यामुळे जंगल सोडून सुतार पक्षी जर शहरात आले आणि आपल्या घराच्या बागेतल्या झाडावर दिवसभर टकटक करु लागले तर मग मात्र आपलं डोकं दुखलंच म्हणून समजा. यातला गंमतीचा भाग सोडला तर जंगलातल्या झाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या या डाॅक्टर पक्षाचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी जंगल वाचवणं गरजेचं आहे.  

-मकरंद केतकर

makketkar@gmail.com

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५०० 
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact