जंगलातील झाडांची विविधता राखण्याचं काम जंगलातील प्राणी -पक्षीच करीत असतात. यात शिंगचोच्या धनेश पक्ष्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. आकाराने गिधाडा एवढा मोठा असलेला आणि आपल्या भलामोठ्या चोचीवर मोठ्ठे ढापण किंवा चोचीवर एक आणखी छोटी चोच असलेला धनेश त्याच्या आकाराने लगेच उठून दिसतो. 'ब्यूसेरोटिडी' या कुळातील धनेश पक्ष्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे 'हाॅर्नबिल' असं म्हणतात. मोठी आणि बाकदार पिवळी चोच. चेहरा काळा, लाल डोळे, पिवळसर मान, उडताना काळ्या पंखावर पांढरा पट्टा दिसतो असं त्याचं रुप सुरेख असतं. धनेशाच्या एकूण ६२ प्रजाती आहेत. ३२ आशिया आणि ३० आफ्रिका खंडात आहेत. भारतात मोठा धनेश धरुन ९ प्रजाती आढळतात.
हेही वाचा
तरस चक्क हसतो, हे वाचलं होतं का कधी?

संपूर्ण आशिया खंडात अरुणाचल प्रदेशातील 'नॅमडफा नॅशनल पार्क'मध्ये धनेशाची संख्या सर्वात जास्त आहे. भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, सुमात्रा बेटे येथे धनेशाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. भारतात मलबारी धनेश, राखी धनेश, महा धनेश, रुफस नेक्ड, ओरिएंटल पाइड, रिथ हाॅर्नबिल, नारकोंडम असे विविध प्रकार ईशान्येकडील जंगलापासून ते अंदमानमधील बेटांपर्यंत आढळतात. नार्कोडम हाॅर्नबिल ही धनेशाची प्रजाती पाहाण्यासाठी बोटीनं अंदमान समुद्रातील नार्कोंडम बेट गाठावं लागतं. धनेशाची ही प्रजाती या बेटावर १२ कि.मीच्या परिघात आढळते. अधिवास नष्ट होत चालल्याने या प्रजातीत १९९९ मध्ये ३६० च नार्कोडम हाॅर्नबिल शिल्लक होते. पण नंतर त्यांचं संवर्धन आणि संरक्षणासाठी विशेष काळजी घेतली गेल्याने आता या प्रजातीच्या धनेशांची संख्या १००० च्या वर आहे. प्रामुख्याने फळे खाणारा धनेश सरडा, उंदीर, छोटे पक्षी, अंडी असा मांसाहारही करतो. तसेच इतर पक्ष्यांसाठी विषारी असलेलं 'स्ट्रायकनोज नक्स वोमिका' या झाडाची फळंही धनेश खातात.

फळं खाण्याची धनेश पक्ष्याची पध्दतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. धनेश फळं न चावता थेट गिळतो. एखाद्या चेंडूप्रमाणे फळ वर उडवून तोंडात झेल घेतो. त्यामुळे फळातील बिया चिरडल्या जात नाहीत. त्याच्या पोटातील पाचक रसामध्ये फळ विरघळते आणि उरलेल्या बिया धनेश तोंडातून बाहेर थुंकतो. त्यामुळे बिया पसरविण्याचे आणि पर्यायाने जंगलातील झाडे वाढवण्याचे काम धनेश करतो, म्हणून त्याला 'झाडे लावणारा पक्षी' असे म्हणतात. धनेशाचा बी पेरण्याचा वेगही अफाट आहे. एका दिवसात धनेश प्रति चौरस किमीच्या परिसरात ११,००० बिया विखरुन टाकतो.

भारतात धनेशाची राखाडी धनेश हीच प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळते. मध्यम आकाराचे राखाडी धनेश शहरात जुन्या झाडांवर दिसतात. विणीच्या हंगामात नर धनेश मादी धनेशाला वैविध्यपूर्ण खाऊ देऊन त्यांची प्रेमयाचना करतात. गुलमोहर, पिंपळ, जांभूळ, वड या झाडांवर धनेश घरटी करतात. धनेशाची मादी एखाद्या मोठ्या झाडाच्या ढोलीत घर करते. अंडे देण्यापूर्वी मादी ढोलीच्या आत जाते. अंडी घालते. त्यानंतर नर आपली विष्ठा, माती वापरुन एक भिंत बांधते. या भिंतीला केवळ एका चोचीपुरते भोक ठेवले जाते. त्याच भिंतीत मादीला बंद करतो. आतमध्ये मादी एका वेळेस साधारणपणे दोन अंडी देते. पुढे महिनाभर नर ढोलीतल्या मादीला अन्न आणून भरवतो. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर मादी ढोलीतून बाहेर येते आणि मग जोडीने ते पिल्लांना भरवतात.
धनेश दरवर्षी नवीन घरटं बांधत नाही. तर वर्षानुवर्ष धनेश एकच घरटं वापरतो. घरटं बांधण्याआधी नर आणि मादी धनेश त्या जागेची एक आठवडाभर पाहाणी करतात. निवडलेली जागा सुरक्षित आहे ना, याची खात्री पटल्यावरच धनेश झाडावर घरटी बांधतात.

झाडं कापणे, शेती, औद्योगिकरण, शेती करणं , धरणं बांधणे या काराणांनी जंगल नामशेष होत आहे. त्यामुळे धनेशाच्या काही प्रजाती धोक्यात आल्या आहेत. रिथ हाॅर्न बिल, नार्कोडम हाॅर्नबिल आणि मलबारी या धनेशाच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. धनेशांची संख्या वाढवण्यासाठी जुनी झाडं जपणे, किड लागलेली झाडं तोडणे आवश्यक आहे. शहरातल्या, गावातल्या जुन्या स्थानिक झाडांची हानी झाल्यास धनेशाचे घरटे, त्यांचं प्रजनन एकूणच त्यांच्या जगण्यावर विपरित परिणाम होतो. 'नेचर कन्झर्व्हेशन फाउंडेशन' ही संस्था अरुणाचलच्या जंगलातील धनेशाच्या संरक्षणासाठी विशेष प्रकल्प राबवत आहे.
नागालॅंडमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात हाॅर्नबिल फेस्टिव्हल साजरा केला जातो. निसर्गाच्या दृष्टीने धनेश पक्ष्यांची संख्या वाढणे फायदेशीर आणि आवश्यक आहे.
- मकरंद जोशी
( लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)
makarandvj@gmail.com
Featured Image: https://www.pexels.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?...
लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?


