तुमच्यापैकी कोणाकोणाला सायकल चालवता येते? बऱ्याच जणांना आणि जणींना येत असणार. तुम्ही सगळे चान्स मिळाला रे मिळाला की सायकलवरून इकडेतिकडे जात असणार. त्यातही आईबाबा ओरडणार की “कॉलनीच्या किंवा गल्लीच्या बाहेर जायचं नाही.” आणि तुम्हाला मात्र लांब जायचं असणार. किंवा तुमच्यातले काही जण शाळेत सायकलवर जात असतील. काही जणी मित्रमैत्रिणींच्या घरी सायकलवर जात असतील.
तर, प्रश्न असा आहे, की या रस्त्यात सायकलवरून जातांना तुम्हाला कधी ट्रॅफिक सिग्नल लागलाय का? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न असा आहे की ट्रॅफिक सिग्नलला तुम्ही थांबता का? मला माहितीये तुमच्यातले अनेक जण म्हणतील, की ‘सायकलने ट्रॅफिक सिग्नलसाठी थांबण्याची गरज नसते, कारण सायकलला लायसन्स लागत नाही.’ पण हे बरोबर आहे का? थोडा विचार करून सांगा बरं…
हेही वाचा!
रोबोटची करामत.. एकही चूक न करता रोबोटनं ६० कलाकारांकडून वाजवून घेतला ऑर्केस्ट्रा
लायसन्सचा आणि ट्रॅफिक सिग्नलचा काय संबंध? म्हणजे सायकलला लायसन्स लागत नाही म्हंटल्यावर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दंड करू शकत नाही असं कदाचित तुम्ही म्हणत असाल. पण मला सांगा, आपण ट्रॅफिकचे नियम पाळतो ते दंड होईल म्हणून का स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी? सिग्नल जेव्हा लाल असतो त्यावेळी तिकडून येणाऱ्या सगळ्या गाड्यांनी थांबायचं असतं, ते का? कारण त्यावेळी दुसऱ्या कोणाचातरी सिग्नल हिरवा झालेला असतो. आणि ज्याचा सिग्नल हिरवा असतो तो त्या चौकातून बिनधास्त सुसाट जातो. कारण त्याला माहिती असतं की यावेळी इतरांचा सिग्नल लाल असणार आहे, याचा अर्थ आपल्या रस्त्यात कोणी येणार नाही. असं असतांना, तुम्ही जर का सायकलवर तो लाल सिग्नल तोडून गेलात तर काय होईल???

किती मोठा अपघात होईल? त्यात तुम्ही सायकलवर असाल आणि जोरात येणारी गाडी एखादी कार किंवा ट्रक असेल तर? कोणाला जास्त लागेल? त्यावेळी तुम्हाला कोणी दंड करेल का याला काही अर्थ उरेल का? नाही ना? त्यामुळे आपण सायकलवर असलो तरीही ट्रॅफिक सिग्नलला थांबायचंच असतं. कारण तो सिग्नल आपल्या सुरक्षिततेसाठी असतो.
आता त्याच्यापुढची गोष्ट… काही वेळा आपल्याला आपले ताई दादा काका मावशी आजी आजोबा आई बाबा असे शाळेत सोडायला येतात. त्यातसुद्धा सकाळची वेळ असेल, उशीर झालेला असेल, तर त्यांना स्कूटर घेऊनसुद्धा असं वाटतं, की सिग्नल लाल असला तरी हळूच पटकन निघून जाऊ. पण असं करणं अत्यंत धोकादायक असतं. त्यामुळे तुम्हीतर सिग्नल पाळाच, पण घरातलं इतर कोणी मोठं माणूस तो तोडणार असेल तर त्यालाही थांबवा. कारण सिग्नल आपल्या सुरक्षिततेसाठी असतो.


