
Image: upi.com
रोबोट काय काय करु शकत असेल असं तुम्हाला वाटतं? तो घरात , ऑफिसात किंवा हाॅटेल-रेस्टाॅरण्टमध्ये काम करु शकतो हे तर आपण ऐकलेलं वाचलेलं आणि पाहिलेलंही आहे. यापलीकडे तो आणखी काय करु शकतो. तर ऐकूही न येणारा रोबोट म्युझिकल प्रोग्राम सादर करु शकतो असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. दक्षिण कोरियात एका रोबोटच्या मार्गदर्शनाखाली ऑर्केस्ट्राचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. हा ऑर्केस्ट्रा प्रोगाम रोबोट कंडक्ट करणार असल्याचं आधीच जाहीर केलेलं होतं. एरवीही ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला गर्दी असतेच पण रोबोट हा कार्यक्रम कंडक्ट करणार म्हटल्यावर कोरियाचं नॅशनल थिएटर प्रेक्षकांनी भरुन गेलं होतं. या कार्यक्रमाला ९५० प्रेक्षक उपस्थित होते. या प्रेक्षकांसमोर एकही चूक न करता ऑर्केस्ट्रा प्रोगाम कंडक्ट करुन रोबोटनं उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकलं.
हेही वाचा!
ऑर्केस्ट्रा म्हणजे अनेक प्रकारची वाद्यं मिळून केलेला संगीताचा कार्यक्रम. यात तंतू वाद्य- व्हायोलिन, व्हायोला, सेलो, डबल बास. लाकडी वायू वाद्यं- बासरी, ओबो, क्लाॅरिनेट, बासून. पितळी वाद्य- हाॅर्न, ट्रम्पेट, ट्राॅम्बोन, ट्युबा. तालवाद्य- टिंपनी, स्नेअर ड्रम, बास ड्रम, झांज, त्रिकोण, टंबोरिन, मॅलेट अशी अनेक वाद्य असतात. या सर्व प्रकारच्या वाद्यांच्या मेळातून ऑर्केस्ट्रा सादर होत असतो. पण वाद्य, वाद्यांचे सूर, त्यांची तीव्रता, क्रम हे सर्व या कलाकारांसमोर हातात एक पातळशी काठी घेवून उभा असलेला मॅस्ट्रो करत असतो. हा मॅस्ट्रोच ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम कंडक्ट करत असतो. त्याच्या हाताच्या आणि बॅटनच्या हालचालींकडे बघून कलाकार आपली वाद्यं वाजवत असतात. ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात विविध वाद्यं ताला सुरात वाजवणाऱ्या कलाकारांचं जितकं महत्व तितकंच महत्व त्या कलाकारांना मार्गदर्शन करणाऱ्या या मॅॅस्ट्रोचं अर्थात उस्तादाचं असतं. दक्षिण कोरियात झालेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात इतकी महत्वाची जबाबदारी या रोबोटनं यशस्वीरित्या, जराही चूक न करता पार पाडली म्हणून केवळ दक्षिण कोरियातच नाही तर जगभरात या रोबोटचं कौतुक झालं.
EveR6 असं या रोबोटचं नाव. ५ फूट १० इंचाचा हा रोबोट कमरेपर्यंतचाच. कमरेखाली त्याला पाय नाही. या रोबोटनं नॅशनल ऑर्केस्ट्रा ऑफ कोरियाच्या ६० संगीतकारांना मार्गदर्शन करुन कोरियन पारंपरिक वाद्यांचा म्युझिकल प्रोग्राम सादर केला. EveR6ने या कलाकारांना स्वतंत्रपणे आणि चोई सू येअल या मानवी मॅस्ट्रोच्या उपस्थितीत मार्गदर्शन केलं. चोई सू येअल या ऑर्केस्ट्रा मॅस्ट्रो EveR6 सोबत अर्धा तास स्टेजवर उभ्या होत्या.
काय झालं स्टेजवर?
आधी EveR6 स्टेजवर आला. रोबोट स्टेजवर येत असल्याचं पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. लिफ्टच्या सहाय्याने EveR6 आधी स्टेजखाली उतरला आणि त्याने प्रेक्षकांकडे बघून वाकून अभिवादन केलं. EveR6 स्टेजवर परतला आणि कलाकारांच्या समोर तोंड करुन उभा राहिला. त्याचे हात, हातातला बॅटन हलू लागला आणि एक एक वाद्यं वाजू लागली. आपले निळे डोळे रोखून EveR6 कलाकारांकडे एकटक पापणी न लवता पाहात होता. हलत होतं ते त्याचं डोकं, हात आणि हातातला बॅटन. रोबोट ऑर्केस्ट्रा कंडक्ट करणार आहे असं ऐकल्यावर संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही टेन्शन आलं होतं. पण रोबोट इतकं चांगलं काम करु शकतो, चूक शोधण्यासाठी जराही जागा ठेवत नाही, हे पाहून प्रेक्षक, कलाकार, विद्यार्थी सर्वच आश्चर्यचकित झालेत.

Image: news.yahoo

Image: koreaherald
EveR6 कोणी तयार केला?
कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नाॅलाॅजी या कंपनीने EveR6 या रोबोटची निर्मिती केली. ली डाॅंग वूक या इंजिनअरनं EveR6च्या प्रोग्रामिंगचं काम केलं. ' मोशन कॅप्चर टेक्नाॅलाॅजीद्वारे EveR6च्या हालचालींचे प्रोग्रामिंग केलं गेलं. प्रत्यक्ष हा ऑर्केस्ट्रा सादर करण्याआधी EveR6 आणि कलाकार यांच्या अनेक तालमी झाल्या. ऐकण्याची क्षमता नसलेला हा रोबोट संगीतकारांसोबत हावभावांद्वारे संवाद करु शकत नाही आणि संगीतकारांनी केलेली चूक लगेच सुधारु शकत नाही. EveR6च्या इंजिनिअरला रोबोटमधील या कमतरता यापुढील काळात दूर करायच्या आहेत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact