मनाचा मित्र
- रुचिरा दर्डा,
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज

सगळे मला माझ्या उंचीवरुन चिडवतात. मी बुटका आहे ना, म्हणून. मलाही मस्त उंच व्हायचंय, सगळ्यांच्यात उठून दिसायचंय, मी काय करु म्हणजे माझी उंची वाढेल?
आदित्य, नागपूर
आपण उंच नाही म्हणून कुणी आपल्याला चिडवलं तर कसा राग येतो हे मी समजू शकते. आपण बुटके आहोत म्हणून सगळे चिडवतात तेव्हा आपल्यातच काहीतरी गडबड आहे असं वाटतं. पण तुला एक सांगू का? चार चौघांच्यात उठून दिसायचंय म्हणून फक्त उंच होणं एवढंच पुरेसं नाही. त्यासाठी अजून कितीतरी गोष्टी करायला हव्यात. जगातले कितीतरी सुप्रसिद्ध लोक फारसे उंच नाहीत. सचिन तेंडुलकरचंच बघ ना.. तो कुठे फार उंच आहे? पण तो ग्राऊंडवर आला की सगळे जण उठून उभे राहातात, हो ना? फुटबॉल लिजेंड असलेल्या लिओनेल मेस्सीलाही तो फार उंच नसल्यामुळे ‘रिजेक्शन’ पचवावं लागलंय. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण भारताचं नेतृत्व केलं, पण त्यांची शारीरीक उंची फार नव्हती… पण त्यांचं धैर्य, व्यक्तिमत्व मात्र खूप मोठं होतं. म्हणजे हे सगळेजण मोठे झाले ते त्यांच्या अंगच्या गुणांमुळे, शरीराच्या उंचीमुळे नाही…
आपण शरीराने उंच नसलो तरी चारचौघात उठून दिसू शकतो. त्यासाठी आपल्याकडे तसे गुण असायला हवेत. मग ते कसे मिळवायचे? त्यासाठी काही साध्यासोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकायला हव्यात. आपल्याला समोरच्याचं म्हणणं ऐकता यायला हवं, दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात करुणा हवी . करुणा म्हणजे ‘काइंडनेस’, दुसऱ्याला मदत करायची, नवीन लोकांशी मैत्री करायची ‘स्किल्स’ आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण गोंधळलेले असताना, अडचणीत असताना आपल्याबरोबर कोण होतं हे माणूस कधीही विसरु शकत नाही, असा माणूस होणं हे नुसतंच उंच असण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला माहिती हवं. त्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचन, अभ्यास, माहिती यातून आपल्याला आत्मविश्वास येतो. त्यातून लोकांना आपल्याबद्दल आदर वाटतो.
हेही वाचा!
चेहेऱ्यावरचे पिंपल्ल्स कधीच जाणार नाहीत का? ते गेलेच नाहीत तर?

आपण जे करु त्यात आपल्याला जीव ओतता यायला हवा. मग तो खेळ असेल, भाषण असेल, गाणं, नृत्य यातलं काहीही असेल. आपल्या दिसण्यापेक्षा, उंचीपेक्षा आपली ‘स्किल्स’ नेहमीच जास्त उठून दिसतात. शिवाय तू अजून लहान आहेस. टीनेजर होशील तेव्हा तुझी उंचीही वाढणारच आहे. भरपूर खेळ, चांगलं पौष्टिक, सकस खा आणि पुरेशी झोप घे, म्हणजे त्याचा तुझ्या वाढीसाठी उपयोगच होईल. पण उंची कमी असो की जास्त, मी सांगितलेल्या इतर सगळ्या गोष्टी तुला कमावता येतील आणि त्या तुला चारचौघांपेक्षा वेगळा बनवतील, हे लक्षात ठेव. तुझी उंची जास्त की कमी हे कुणाच्याही फार वेळ लक्षात राहाणार नाही, पण तुझा आत्मविश्वास, स्वभाव आणि गुण मात्र त्यांच्या कायमस्वरुपी लक्षात राहातील, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


