मनाचा मित्र
- रुचिरा दर्डा,
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज

माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल येतात. मला त्या पिंपल्समुळे खूप लाज वाटते. कुणाबरोबर खेळायला, कुणाला भेटायला नको वाटतं. मला पिंपल आवडत नाहीत. ते कधी जातील? कसे जातील? मी नेहमी अशीच दिसेन का? मला छान दिसायचं आहे… - जान्हवी, छत्रपती संभाजीनगर
आपण मोठे होतो तेव्हा साधारण सगळ्यांच्याच चेहऱ्यावर पिंपल येतात. बऱ्याच मुली (आणि मुलंसुद्धा, कारण पिंपल मुलांच्याही चेहऱ्यावर येतात!) त्या पिंपल्सचं त्यांना वाईट वाटलं तरी त्याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. खरंतर मराठीत पिंपलला 'मुरुमं' असा शब्द आहे, पण आपण सध्या 'पिंपल'च म्हणू!
तुझ्या चेहऱ्यावर पिंपल येणं, त्याचं तुला वाईट वाटणं हे सगळंच ‘नॉर्मल’ आहे. मोठं होताना, म्हणजे वयात येताना आपल्या शरीरात खूप बदल होत असतात. हॉर्मोन्सची पातळी बदलत असते. या सगळ्या प्रक्रियेत आपली त्वचा जास्तीचं तेल निर्माण करत असते. त्यामुळे त्वचेची छिद्रं बंद होतात आणि पिंपल येतात. काहींना ते अगदी थोडे येतात तर काहींना खूप येतात, पण त्यात फार काळजी करण्यासारखं काही नाही.
हेही वाचा!
आईबाबांकडे काही मागा, ते म्हणतात, 'नंतर बघू'- असं का?
आणि आता तुझ्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर - तुझी स्किन आत्ता अशी आहे म्हणजे नेहमी ती तशीच राहाणार आहे, हा विचार मनातून काढून टाक. वयात येताना आपल्या हॉर्मोन्समध्ये होणारे बदल हे तात्पुरते असतात. ते कायम राहात नाहीत. त्यामुळे तुझी त्वचा, त्यावरचे पिंपल हे अजिबात कायमस्वरुपी टिकणार नाहीत. तू मोठी होत जाशील तशी तुझी त्वचा छान होत जाईल. चांगल्या त्वचेसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही मुलांनी भरपूर घाम येईपर्यंत खेळायला हवं. व्यायाम, नृत्य करायला हवं. त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. रोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणं, भरपूर भाज्या, फळं, कोशिंबिरी आणि घरी केलेलं ताजं पौष्टिक जेवणं आवश्यक आहे. तुम्ही बाहेरचं, जंक जेवढं जास्त खाल तेव्हढं ते तुमच्या त्वचेवर परिणाम करेल. रात्रीची शांत झोप नसेल तरी पिंपल येतात. त्यामुळे आठ ते नऊ तास शांत झोपणं हे संपूर्ण आरोग्यासाठी आणि अर्थातच त्वचेसाठीही आवश्यक आहे.
रोजच्या रोज स्वच्छ आंघोळ करणं, दिवसातून दोनदा चेहऱ्याला एखादं सौम्य फेसवॉश लावून तो स्वच्छ धुणं, मग मॉइश्चरायझर लावणं यामुळेही त्वचा चांगली होते. केसांमध्ये कोंडा होत असेल तर त्यामुळेही पिंपल येतात. आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून केस स्वच्छ धुवायचे. त्यामुळेही पिंपल कमी होतील. आणि हे सगळं केल्यावरही पिंपल येणं कमी होत नसेल, पिंपल्स खूप दुखत असतील तर एखाद्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरना भेटून त्यांचा सल्ला घेता येईल. त्यासाठी आईबाबांशी बोल. ते तुला त्यांच्याकडे घेऊन जातील.
आणि हो, त्वचेवर पिंपल आहेत म्हणजे तू छान दिसत नाहीस, हे मनातून काढून टाक. तुझा स्वभाव, तुझं हसू, तुझा आत्मविश्वास या गोष्टी तुझं सौंदर्य ठरवतात, तुझ्या चेहऱ्यावरचे पिंपल नाही.
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


