परीक्षेच्या आधी काही तासात वर्षभराचा अभ्यास कसा पूर्ण करायचा?

Image: pexels

वर्षभर केलेल्या अभ्यासाचा कस परीक्षेत लागतो. परीक्षा सुरु होण्याआधीचा आणि परीक्षा सुरु असतानाचा काळ हा परीक्षेच्या तयारीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. या काळात तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता यावर तुमची परीक्षेची तयारी किती परफेक्ट होईल, हे अवलंबून असतं. हे वेळेचं नियोजन करण्यासाठी आणि केलेल्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत.

परीक्षेसाठी टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ?

अभ्यास करायला बसण्याआधी आपला उद्देश स्पष्ट ठरवावा. अभ्यासाला बसताना हे करावं की ते असा गोंधळ न करता कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत, त्या विषयातले आपल्याला काय अभ्यासायचे आहे, ते अभ्यासून झाल्यानंतर लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करणार हे सर्व अभ्यासाला बसण्याआधी ठरवावं.

अभ्यासाचं वेळापत्रक परीक्षेच्या काळात जास्त महत्त्वाचं असतं. परीक्षेची तयारी करण्यासाठीचा आपल्या हातातला वेळ कमी उरलेला असतो. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करायचा असल्याने वेळापत्रक करणं आणि आपण तयार केलेलं वेळापत्रक पाळणं महत्त्वाचं असतं. कुठल्या वेळेत कुठल्या विषयाचा अभ्यास करणार, ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो करताना त्या विषयातल्या कोणत्या धड्यांवर, धड्यातल्या कोणकोणत्या मुद्द्यांवर जास्त भर द्यावा लागणार आहे, असे कोणते धडे किंवा धड्यातले मुद्दे आहेत ज्यांची आपली तयारी चांगली झाली आहे, त्यामुळे त्यावर कमी भर दिला तरी चालणार आहे हे सर्व आधी ठरवायला हवं.

परीक्षेचा अभ्यास करताना 'पोमोडोरो' हे तंत्र वापरायलाच हवं. एका बैठकीत २५ मिनिटांच्या अभ्यासानंतर एक मिनिटांचा ब्रेक आणि चार वेळा असं केल्यानंतर दुसरं चक्र सुरु करण्याआधी १५-३०  मिनिटांचा मोठा ब्रेक घ्यावा. त्यामुळे अभ्यासात आपलं लक्ष टिकून राहातं आणि अभ्यास जास्त केला तरी थकवा येत नाही.

हेही वाचा!

सोप्या आणि येत असलेल्या भागांचाच सराव करणे हे परीक्षेच्यादृष्टीने योग्य नसते. त्यामुळे आपल्याला काय येत नाही, कुठला विषय अवघड जातो, अमूक विषयाची रिव्हिजन करताना त्यातला क्लिष्ट भाग कोणता या सर्वांचा विचार करुन परीक्षेच्या काळातील अभ्यासाचा प्राधान्यक्रम ठरवावा.

अभ्यास करताना बऱ्याचदा जे आवडतं, सोपं जातं त्याचाच आधी अभ्यास केला जातो. पण जे आवडत नाही, जे क्लिष्ट आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. आता नको नंतर करु असं म्हणत आपण चालढकल करत राहातो. त्यामुळे अनेकदा ज्या भागावर जास्त लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं त्या भागाचा अभ्यास करायला हातात पुरेसा वेळ उरत नाही. अवघड मुद्यांचा वरवर अभ्यास होतो. अभ्यासासाठी कमी वेळ उरलेल्या अवघड प्रकरणांवर प्रश्न आले तर त्याची उत्तरं लिहिण्याचा आत्मविश्वास वाटत नाही. म्हणून परीक्षेचा अभ्यास करताना 'आता नको नंतर करु' , 'हे तर काय सोपं आहे, एकदा वाचलं तरी लक्षात येईल' असा जो चालढकलपणा आपण करतो तो करायला नको.

Image: freepik

आपण जिथे बसून अभ्यास करणार आहोत ती जागा स्वच्छ हवी. अभ्यासाचा टेबल नीट हवा. ज्या विषयाचा अभ्यास करायचा, त्याची वह्या-पुस्तके-नोट्स, अभ्यास करताना महत्त्वाचे मुद्दे नोंदवण्यासाठी, अवघड बाबींचा सराव करण्यासाठी वही-पेन या गोष्टी जवळ घेवून बसाव्यात. नीटनेटकेपणा ठेवल्यास अभ्यास करण्यात मन लागतं. अभ्यासाला बसल्यानंतर अमूक शोध, तमूक शोध असा वेळ वाया जात नाही.

परीक्षेचा अभ्यास म्हणजे सर्व तर येतंच असतं, फक्त रिव्हिजन तर करायची असते असा समज चुकीचा असतो. ऐन परीक्षेचा अभ्यास करतानाही एखादी संकल्पना समजलेली नसते, त्यामुळे ती लक्षात येत नाही.. अशा वेळेला तो भाग सोडून देण्याऐवजी आलेल्या शंका विचारण्यासाठी शाळेतले शिक्षक, क्लासचे शिक्षक, वर्गातले मित्र यांची मदत घ्यावी. त्यांच्याशी चर्चा करुन आपल्या शंकांचं निरसन करुन घ्यावं. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact