पेपर लिहिताना वेळच पुरत नाही? त्यासाठी टाइम मॅनेजमेंटचे ७ नियम पाळा.

 Image: freepik

वर्षभर केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळी फक्त ३ तासात उत्तरपत्रिकेत उतरवायचा असतो. त्यामुळे परीक्षा म्हटली की टेन्शन येतं. आपल्याला पेपर चांगला लिहिता येईल की नाही? याची भीती वाटत राहाते. आधी हे टेन्शन आणि पेपर सोडवून झाल्यावर आपण आता जो पेपर सोडवला त्याच्यापेक्षा जास्त चांगला पेपर सोडवू शकलो असतो अशी हळहळ वाटत राहाते. चांगला पेपर सोडवण्याच्या मार्गात अगदी हुशार मुलांनाही येणारी  अडचण म्हणजे पेपर लिहिण्यासाठी वेळच पुरत नाही.  प्रश्नपत्रिकेतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं येत असूनही केवळ वेळ पुरला नाही म्हणून प्रश्न सोडून देण्याची वेळ कित्येक मुलांवर येते. हातात असलेले मार्क्स गेल्याने आपल्याला दु:ख होतं आणि घरी 'असा कसा पेपर वेळेत पूर्ण होत नाही? असे मोठे विचारतात आणि रागावतातही. पेपर लिहायला वेळ पुरला नाही म्हणून काही प्रश्न सुटले असा प्रसंग आपल्यावर येवू नये म्हणून पेपर सोडवताना काही सोपे नियम पाळायचे. नियम या शब्दाला घाबरुन जावू नका.. हे नियम तुम्हाला पेपर चांगला लिहिता यावा यासाठी मदत करणारेच आहेत.

पेपर सोडवताना काय नियम पाळाल?

१. पेपर सुरु होण्याआधी पाच मिनिटं डोळे मिटून शांत बसावं. काहीही आठवायचा प्रयत्न करु नये. आपलं लक्ष फक्त नाकावाटे आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे ठेवावं. मन शांत करण्याचा हा सोपा उपाय आहे.

 २. पेपर हातात आल्यानंतर पहिली ५ मिनिटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी द्यावा. संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर कोणते प्रश्न सोपे, कोणते अवघड याचा अंदाज येतो. तो अंदाज घेवून प्रश्नपत्रिका कोणत्या क्रमाने सोडवणार हे ठरवा.

३. प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न किचकट असतील तर लगेच घाबरुन जावू नये. त्या अवघड प्रश्नावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा आधी येत असलेले प्रश्न सोडवले तर किचकट वाटणारे प्रश्नही सोडवण्याचा आत्मविश्वास वाढतो.

हेही वाचा!

४. प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचं स्वरुप पाहून प्रत्येक प्रश्नासाठीचा वेळ ठरवून घ्यावा. आधीच अवघड वाटणाऱ्या प्रश्नांवर १५- २० मिनिटं घालवले तर येत असलेले प्रश्न सोडवायलाही वेळ पुरत नाही. त्यामुळे आधी जे येतंय ते सोडवून वेळ उरल्यास पुन्हा अवघड प्रश्नाकडे वळावं.

५. प्रश्नपत्रिका सोडवताना अचूकतेकडे लक्ष द्यावं. प्रश्न समजून घेण्यात गोंधळ करु नये, नाहीतर उत्तरं लिहितानाही गोंधळ होतो आणि मार्क्स जातात.

६. पेपर सोडवताना आपलं लक्ष जरी प्रश्न आणि उत्तरं याकडेच असलं तरी मध्ये मध्ये घड्याळ पाहून वेळेचा अंदाज घेत राहावा. किती वेळ उरला, आपले किती प्रश्न सोडवायचे राहिलेत याचा अंदाज घेत राहावा. वेळ आणि उरलेले प्रश्न यांची सांगड घालून पुन्हा उरलेल्या प्रश्नांसाठी कमी-अधिक वेळ ठरवावी लागते. प्रश्नपत्रिका वेळेत पूर्ण करायची तर घड्याळीकडे पाहाणे आणि प्रश्न सोडवण्याचं फेरनियोजन करणे ही गोष्ट सारखी करावी लागते.

७. प्रश्नपत्रिकेतल्या फक्त अवघड/ किचकट प्रश्नांचाच जास्त विचार करत बसू नये. यामुळे टेन्शन येतं. त्याचा परिणाम येत असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यावरही होतो. त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा वेळ लावून पेपर सोडवण्यावर भर द्यावा. पेपर सोडवताना हे वेळेच गणित जमलं की पेपर हवा तसा लिहिता येतो आणि तो पूर्णही होतो.

Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact