उद्याचा पेपर आपल्याला अवघडच जाणार असं वाटतं का तुम्हाला?

Image: freepik

वार्षिक परीक्षा म्हटलं की पोटात गोळा येतो ना . परीक्षा नकोच असं वाटायला लागतं. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय काय होईल हे दिसायला लागतं. आई बाबा किती ओरडतील, मित्र-मैत्रिणी चिडवतील, शिक्षक रागावतील या कल्पनेनेच अभ्यास करत असतानाही आपला अभ्यासच होत नाहीये असं वाटायला लागतं. पेपर अवघड जाणार, मार्क्स कमी मिळणार असा विचार येवू लागतो. मग दोन दिवसांपूर्वी चांगलं येत असलेलं उत्तर रिव्हिजनच्या वेळी आठवेनासं होतं. जुनंच आठवत नाही आता नवीनची कशी तयारी करणार? या विचाराने आणखी टेन्शन येवू लागतं. आणि पुन्हा उद्याचा पेपर अवघडच जाणार असा विचार मनात पक्का व्हायला लागतो . हे असं होतं हे खरं असलं तरी परीक्षेच्या बाबतीत आपलं मन जे विचार करतं तेच होईल असं मात्र नाही. परीक्षेची भीती वाटत असल्यास, पेपर अवघड जाण्याची, कमी मार्क्स मिळण्याची चिंता वाटत असेल तर परीक्षेच्या आधी काही गोष्टी मुद्दाम केल्या तर मनातली ही भीती दूर होते, परीक्षेची चांगली तयारी होते आणि पेपरही सोपे जातात.

हेही वाचा!

पेपर चांगले लिहिता येण्यासाठी परीक्षेच्या आधी काय करायचं?

उद्याचा पेपर अवघड निघाला तर, आपल्याला काही लिहिता आले नाही तर असा विचार केला तर आपण घाबरणार. आपला आत्मविश्वास कमी होणार.  असं होवू नये याकरता आपला अभ्यास चांगला झाला आहे, आपल्याला पेपर चांगले जाणार असा विचार केल्यास आपण पेपर छान सोडवतो आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केल्यास आपला मूड चांगला होतो. मनातली परीक्षेविषयीची भीती कमी होणार. पण म्हणून अभ्यास सोडून आपण छान पेपर लिहितोय असं चित्र दिवसभर डोळ्यासमोर आणून त्याचा विचार करत बसायचं नाही. असं केल्यास ते दिवास्वप्न पाहिल्यासारखं होईल. ज्याचा प्रत्यक्ष पेपर लिहिण्यासाठी काहीच उपयोग होणार नाही. संध्याकाळी थोडा वेळ आपल्याला पेपर चांगला जाणार, आपण छान पेपर सोडवणार असा विचार करायचा आणि पुन्हा शांत मनाने अभ्यास करायचा.

याआधी झालेल्या परीक्षांमधील आपले चांगले गुण आठवायचे, त्याबाबत शिक्षकांनी दिलेले शेरे, आईबाबांनी दिलेली शाबासकी आठवायची. आपण आधीच्या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळवलं होतं. त्यामुळे वार्षिक परीक्षेतही आपल्याला चांगलं यश मिळणार हा विचार करायचा आणि तसे प्रयत्न करायचे. यामुळे परीक्षेत पेपर चांगला सोडवण्यास मदत होते. ज्या परीक्षेत आपल्याला चांगले मार्क्स पडले त्या परीक्षेत आपण  कोणत्या पध्दतीने अभ्यास केला होता, कोणतं तंत्र वापरलं होतं याचा विचार करुन त्या गोष्टींचा वापर आपल्याला आताही करता येतो का ते बघायचं.

आपण वार्षिक परीक्षेची तयारी कशी केली आहे याचा विचार करावा. आपण कसा अभ्यास केला याचा विचार केला तर आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते. आपली तयारी चांगली झाली आहे तर आपल्याला पेपरही चांगलाच जाणार हा विश्वास येतो आणि पेपरविषयी वाटणारी भीती कमी होते.

अमूक मित्र कसा अभ्यास करतो, तमूक मैत्रिणीची परीक्षेची कशी तयारी झाली असा विचार करत राहिल्यास आपल्याला यातून काहीच फायदा मिळणार नाही. उलट अशा विचारांनी नुकसानच होईल. इतर मुलांच्या अभ्यासाचा विचार करुन आपल्याला पेपर चांगला लिहिण्याची हिंमत मिळणार नाही. इतर मुलांच्या अभ्यासाची आणि आपल्या अभ्यासाची तुलना करत राहिल्यास त्याचा आपल्याला ताण येतो, त्रास होतो, परीक्षेतल्या अपयशाची भीती वाटू लागते. त्यामुळे आपली तयारी,आपला अभ्यास असं आपल्यावरच लक्ष केंद्रित केल्यास परीक्षा आत्मविशासाने देण्याची आपली ताकद वाढते.

हेही वाचा!

आधीच्या परीक्षेच्या वेळेस किंवा अभ्यास करताना आपल्याला कोणते अडथळे आले होते, त्यावर आपण कशी मात केली हे थोडं आठवून बघितलं तर परीक्षेत येवू शकणाऱ्या अडथळ्यांवर मात्र करण्याचा विश्वास आपल्यात निर्माण होतो.

एखाद्या गोष्टीची भीती बाळगली तर त्याचा परिणाम ताण वाढण्यावर होतो. यासाठी खेळाडूंचं उदाहरण घ्यायला हवं. खेळाडू स्पर्धेला/ सामन्याला कधीही घाबरत नाही. ते ती स्पर्धा/ सामना एक आव्हान म्हणून स्वीकारतात आणि मनातल्या भीतीवर मात करतात. खेळाडूंप्रमाणे आपणही आपल्या परीक्षांकडे, पेपरकडे एक आव्हान म्हणून बघायला हवं. तसं बघितलं तर आपल्याला पेपर नक्कीच चांगले लिहिता येतील. पेपर अवघड गेला तर, परीक्षेत नापास झालो तर असा नकारात्मक विचार कर राहिल्यास या विचारांचा आपल्यावर ताण येतो, लक्ष विचलित होतं. त्याचा रात्रीच्या झोपेवरही परिणाम होतो.

परीक्षा आहे म्हणूअ रात्री जागून जास्त अभ्यास करण्याचा हट्ट करु नये. पुरेसा अभ्यास झाल्यावर रात्री लवकर झोपल्यास, व्यवस्थित झोप घेतल्यास परीक्षेत उत्तरं लिहिताना विसरायला होत नाही. पेपर लिहिताना लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. परीक्षेच्या आधी नीट झोपलं नाही तर त्याचा परिणाम आपल्या मूडवर होतो, आपल्या मनात नकारात्मक विचार येत राहतात.

अभ्यासासोबतच या काही गोष्टी करुन बघितल्या तर मनातली परीक्षेची भीती जावून पेपर चांगले लिहिता येतील हे नक्की!

Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact