गोष्ट 'इमोशन्स'ची
- डाॅ. श्रुती पानसे
मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

“तुझा अभ्यास किती झाला आहे? माझा तर झालेलाच नाही.”
“ मी दोन धडे ऑप्शनला टाकले आहेत .”
“मी अभ्यास केला होता पण मला काही आठवतच नाही.”
“मला आज अगदी अभ्यास झाल्यासारखा वाटतो आहे. 50 पैकी 48 तरी नक्कीच मिळतील.”
“ मला अभ्यास करायला वेळच मिळत नाही कारण माझी वही अजून अपूर्ण आहे ती पूर्ण करण्यातच माझ्या सगळा वेळ जातो आहे त्यामुळे मी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही.”
“ तुला हे गणित कसं सोडवायचं माहिती आहे का मला हे गणित येत नाही?”
सध्या आपल्या आसपास अशाच स्वरूपाच्या गप्पा ऐकू येत असतील याचं कारण तोंडावर आलेली किंवा सध्या चालू असलेल्या परीक्षा.
सध्या सगळीकडेच परीक्षेचं वातावरण आहे. सगळे मित्र-मैत्रिणी एकमेकांशी अभ्यास, परीक्षा, नोट्स याबद्दलच बोलतायत अशा वेळेला आपला गोंधळ उडू शकतो.
परीक्षा म्हटलं की सगळ्यांनाच कसली ना कसली भीती वाटत असते.
हेही वाचा!
राग आल्यावर तोंडातून वाईट शब्द आणि शिव्या का निघतात?
परीक्षेची भीती का वाटते?
१. काहींचे नावडते विषय जास्त असतात आणि त्या नावडत्या विषयांचा अभ्यास करावासा वाटत नाही. म्हणून जास्त अभ्यास केला जात नाही आणि अभ्यास केला जात नाही म्हणून ती परीक्षा अवघड वाटते.
२ . काहीजण अभ्यास करतात पण आपला अभ्यास पूर्ण झाला नाही असं वाटतं.
३. काहींना असं वाटतं की आपला अभ्यास तर झालेला आहे पण आपण जो अभ्यास केला आहे ते परीक्षेत आलं नाही तर?
४. काही जण आपला खूपच अभ्यास झालेला आहे असं दाखवत असतात.
प्रत्येकाचं वेगळं म्हणणं असतं. कोणीही काहीही सांगितलं तरी या सगळ्याचा थोड्याफार प्रमाणावर ताण आपल्यावर येतच असतो. अशा प्रकारे सगळ्यांनाच परीक्षेची थोड्याफार प्रमाणात भीती वाटत असते.

पेपर लिहिण्याचा 'काॅन्फिडन्स' कसा मिळवायचा?
१. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कितीही भीती वाटत असली तरी सुद्धा परीक्षा तर द्यायचीच आहे. मग हीच परीक्षा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे देऊ शकतो या एकाच गोष्टीचा विचार करायला हवा!
२. मित्र मैत्रिणींपैकी कोणी म्हणालं, माझा गणिताचा अभ्यास झालेला नाही की आपल्यालाही तसेच वाटू लागतं . दुसरा कोणी म्हणाला, की हे मी केलं होतं पण माझ्या लक्षात राहत नाहीये. तर आपल्याला पण तसंच वाटायला लागतं. त्यापेक्षा परीक्षेच्या काळात इतर कोणाशीही गप्पा न मारता फक्त आपला अभ्यास आणि आपल्याला कोणते विषय किती येतात, किती जमतात, किती गोष्टी आपल्या लक्षात राहिलेल्या आहेत, किती गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि आपण व्यवस्थित लिहू शकतो इतक्याच गोष्टींवर आता लक्ष केंद्रित करायला हवं.
३. इतर कोणाच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची ही वेळच नाही. म्हणून घरी अभ्यास करताना, शाळेत एकत्र अभ्यास करताना, परीक्षेला जाताना ,शाळेत गेल्यावर कोणी मित्र मैत्रिणी भेटले, त्यांच्याबरोबर अभ्यास याविषयी बोलताना अशा कोणत्याही वेळेस इतरांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. आपला अभ्यास किती झाला आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि म्हणून आपल्याला वाटत असलेला आत्मविश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास बाळगून परीक्षा दिली तर भीतीची भावनाच मनात राहणार नाही.
ishruti2@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


