गोष्ट 'इमोशन्स'ची
- डाॅ. श्रुती पानसे
मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

पहिलीच्या वर्गातली ही एक खरी घटना
‘ तू माझं खोडरबर का घेतलंस ?’
‘ माझं खोडरबर दे मी तुला मारीन.’
‘ मी पण तुला मारीन… तुझा कोथळाच बाहेर काढतो थांब.’
आपण मित्रांशी मैत्रीनिशी भांडतो. अगदी मारामारी करतो. वाईट वाईट शब्द उच्चारतो. रागाच्या भरात काहीही म्हणजे काहीही बोलतो. पण हे असे शब्द आपल्या बोलण्यात येत नाहीत ना याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.
तो छोटा मुलगा त्याच्या वर्ग मित्राला असं बोलून गेला. अर्थातच पहिलीत शिकत असलेल्या त्या लहान मुलाला त्याचा अर्थही माहीत नसणार. पण एकदा असे शब्द वापरले की त्याची सवय लागून जाते. उद्या कुणालाही तो अशी वाक्यं म्हणू शकतो. अजून थोडा मोठा झाल्यावर त्याची भाषा आणि ती भाषा बोलणाऱ्या त्या मुलाचं मन कसं असेल? याची आपण नक्कीच कल्पना करू शकतो.
हेही वाचा!
आदल्या दिवशी खूप राग आणि दुसऱ्या दिवशी राग गायब.. हे तुमच्याबाबतीतही होतं का?
आपण कितीही राग आला तरी कोणते शब्द वापरतो हे फार महत्त्वाचं असतं कारण तो प्रसंग संपतो पण ज्याच्याशी आपण बोलत असतो त्याच्या मनात मात्र ते वाईट शब्द फिरत राहतात.
कधीकधी संताप व्यक्त करणारा अँग्री यंग मॅन भारी वाटतो. हातात चाकू, बंदूक घेतलेला खूप चिडून बोलणारा, शिरा ताणून बोलणारा, असा एका विशिष्ट वयात माणूस आवडू शकतो. साधं बोलणारा, हळुवार बोलणारा ,दुसऱ्याच्या भावना समजून घेणारा, दुसऱ्याला न दुखवणारा कमकुवत वाटू शकतो. पण असं वाटणं हीच पहिली चूक आहे हे लक्षात घ्यायलाच पाहिजे.
चौकट
असं वागणं चूकच!
- मित्रांना मैत्रिणींना कमी लेखणं.
- मुलींचा अनादर करत राहणं.
- कोणाच्या तरी व्यंगावर बोट ठेवून हसत बसणं .
- सहजपणे शिव्या देणं.
हे असं आपण रोजच वागलो बोललो तर आपण बोथट होऊन जातो. हे सगळं आपल्याबाबतीत होऊ द्यायचं नसेल तर कोणाचा कितीही राग आला तरी तो आपण तो कसा व्यक्त करतो, त्यावेळेस काय बोलतो यावर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
ishruti2@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


