मातृभाषा बोलता-वाचता-लिहिता येते. तरीही तिचा अभ्यास करायचा! कशाला?

Image: mpscworld

आपण  जसं जसं दरवर्षी वरच्या वर्गात जातो, तसे आपल्या अभ्यासक्रमात नवनवीन विषय येतात. पण सर्व विषयात पहिलं स्थान पटकावलेलं असतं ते आपल्या मातृभाषेने. घरी-दारी आपण मातृभाषेतच बोलतो, आपल्याला आपली भाषा येते मग तिचा अभ्यास कशाला करायचा? आणि कितीही अभ्यास केला तरी त्यात मार्क्स मात्र कमीच पडतात अशी खूप मुला-मुलींची तक्रार असते. आपल्या मातृभाषेचा अभ्यास करायला अनेकांना खूप कंटाळा येतो. यामागचं कारण म्हणजे मी मातृभाषेचा अभ्यास का करावा? शाळेत मातृभाषा का शिकवली जाते? या प्रश्नांची उत्तरंच माहीत नसतात. मातृभाषा ही केवळ परीक्षेसाठी , त्यातील गुणांसाठी शिकली-शिकवली जात नाही. मातृभाषा शाळेत शिकवली जाते ती  मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी. 

हेही वाचा!

मातृभाषेचा अभ्यास का करायचा ?

मातृभाषा ही केवळ आपली बोलण्याची भाषा नसते. केवळ आपलं व्यक्त होण्याचं माध्यम नसतं. तर भाषा म्हणजे आपली ओळख असते. शाळेत जेव्हा आपण मातृभाषा शिकतो तेव्हा आपण स्वत:सोबत, आपल्या माणसांसोबत आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडले जातो. मातृभाषा अभ्यास म्हणून शिकताना ही भाषा ज्या समुहाशी, समाजाशी, पंरपरेशी निगडित आहे, त्याची चांगली ओळख होते. आपण कोण आहोत, काय आहोत असे अवघड प्रश्न आपल्याला पडतात, त्याची उत्तरं मातृभाषेच्या अभ्यासातून मिळतात. आपल्याला आपल्या भाषेबद्दल अभिमान वाटायला लागतो.

मातृभाषा म्हणजे आपली रोजची संवादाची भाषा. पण याच भाषेचा शाळेत अभ्यास केला तर भाषेशी निगडित कौशल्यं आपल्यात विकसित होतात. जसे वाचन, लेखन करणे, कविता, गोष्टी लिहिण्याची आवड निर्माण होते. आपल्या भाषेतल्या कथा कादंबऱ्या , गोष्टीची पुस्तकं, ऐतिहासिक पुस्तकं, वैज्ञानिक पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण होते. आपल्याला स्वत:ला वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं, विचार व्यक्त करण्यास बळ मिळत्ं. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. 

मातृभाषेचा अभ्यास केल्याने आपल्या मेंदूचाही विकास होतो. भाषा मेंदुच्या विकासासाठी चांगलं खाद्य पुरवते. अभ्यास म्हणून मातृभाषा शिकताना आपली स्मरणशक्ती वाढते, आपल्याकडचा शब्दसाठा वाढतो. शब्द कसे, कुठे वापरायचे हे आपल्याला मातृभाषेच्या अभ्यासातून कळतं. आपली विचार करण्याची, नवीन गोष्टी समजून घेण्याची क्षमता वाढते. आपल्यात निर्णय क्षमता विकसित होते. प्रश्न मग ते अभ्यासातले असू देत किंवा दैनंदिन आयुष्यातले हे प्रश्न सोडवण्याचं कौशल्य ज्याला आपण सर्व 'प्राॅब्लेम साॅल्व्हिंग स्कील' म्हणतो ते विकसित होतं.

मातृभाषा ही केवळ आपल्याला बोलून माहिती असते. पण मातृभाषेतले बारकावे आपल्याला शिकण्यातून कळत जातात. तिचं व्याकरण, भाषिक संकल्पना कळतात, तसेच प्रमाण पध्दतीने ती कशी लिहितात हे समजतं. यामुळे आपलं लेखन सुधारतं, ते मुद्देसूद होतं, बिनचूक होतं. अशा पध्दतीने आपल्याला आपली मातृभाषा यायला लागली की आपला आत्मविश्वास वाढतो. मातृभाषेतले सर्व बारकावे समजले की इतर भाषा शिकण्याची ओढ लागते.

मातृभाषेच्या अभ्यासाने आपल्या भाषेचा इतिहास, तिची जडण घडणं, तिच्या बोली भाषा, तिचं वैभव, काळानुसार तिचं झालेलं नुकसान्, कारणं, त्यासाठी करता येवू शकणारे उपाय या सर्व गोष्टींची माहिती मिळते. मातृभाषेच्या अभ्यासातून भाषा जिवंत असते, प्रवाही असते ते कसं हे आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो.

अशा प्रकारे शाळेत अभ्यास म्हणून आपली मातृभाषा शिकली तर भाषेवर आपली पकड येते. आपण आपल्या समाजाशी, संस्कृतीशी घट्ट जोडले जातो. मातृभाषेचा अभ्यास हा केवळ आपली अभ्यासातली प्रगती वाढवत नाही तर आपलं व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करतो. आपण एक चांगली व्यक्ती होण्यास आपली मातृभाषा आपल्याला मदत करते. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact