
Image:.freepik
विहानची शाळा सकाळी 9:30 वाजता असते. पण तो उठतो पावणे नऊला. सुटीमध्ये रोज सकाळी नऊपर्यंत झोपण्याची सवय होती ना त्याला. शाळा सुरु होवूनही लवकर उठण्याची त्याची इच्छाच होत नाही. कसंतरी आवरुन शाळेत जाणाऱ्या विहानला गेला पूर्ण आठवडा प्रार्थनेच्या वेळेस शाळेबाहेर उभं राहावं लागलं. उशिरा येण्याची शिक्षा म्हणून. दिवसाची सुरुवातच शिक्षेने होत असल्याने विहानचा चेहेरा शाळेतून आल्यावर उतरलेलाच.
अन्वय दुपारी शाळेतून आला की एक पाय घरात आणि एक पाय दारात, लगेच टीव्ही लावतो. शाळेच्या ड्र्रेसवरच सोफ्यात बसून त्याची आवडती वेबसीरिज पाहात बसतो. वेबसीरिज पाहाताना कसा वेळ जातो, हेच त्याला कळत नाही. परवा त्याने भूमितीची वही आईसमोर धरली. वहीच्या पानावर आईची सही हवी होती. का ? - तर गृहपाठ अपूर्ण असल्याचा शेरा दिला होता टीचरने, त्याखाली पालकांची सही घेवून येण्यास सांगितलं होतं. टीव्ही पाहात बसल्याने कुठल्या ना कुठल्या विषयाचा गृहपाठ शिल्लकच असतो अन्वयचा. सुटीत एकामागून एक वेबसीरिजचे सीझन पाहाण्याची सवय लागली ना अन्वयला.
सान्वी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर कपडे बदलते आणि काॅलनीतल्या मैत्रिणींसोबत खेळायला जाते ती थेट रात्री आठ साडे आठलाच घरी येते. मग अभ्यासाला बसल्यावर चिडचिड होते तिची.
हेही वाचा!
हे फक्त या तिघांच्याच बाबतीत होतंय असं नाही. ही तर फक्त उदाहरणं. अशी खूपजणं आहेत ज्यांचा सुटीचा मूडच जात नाहीये. सुटी संपून आपली शाळा सुरु झाली आहे, आपण लवकर उठायला हवं, टीव्ही कमी पाहायला हवा, खेळण्याची विशिष्ट वेळ ठरवायला हवी हे अनेकांना अजून पटतच नाहीये.
पण असं करुन कसं चालेल. प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते तसा शेवटही असतो, हे आपल्याला माहीत आहे ना. आपल्याला एखादा सिनेमा कितीही आवडला तरी तो दोन अडीच तासात संपतोच ना. आपल्याला आवडला म्हणून तो सुरुच राहातो असं नाही आणि आपणही सिनेमा आवडला म्हणून थिएटरमध्येच बसून राहातो असं नाही. परीक्षा सुरु होतात तशा संपतातही. शाळा सुरु होते तशी शाळेला सुटीही लागते. आणि शाळेची सुटी संपतेदेखील. सुरु होणं आणि संपणं हे एक चक्र असतं. एक प्रवास असतो. ज्यातून आपल्याला जावंच लागतं. या चक्रातून लहानांना जसं जावं लागतं, तसे मोठेही जातातच. मोठेही आपल्या कामाला अधून मधून सुटी घेतात. सुटीच्या काळात मजा करतात आणि काम सुरु झालं की आपलं नेहेमीच रुटीन पुन्हा सुरु करतात. मोठे यासाठी आपलं घरातलं काम, ऑफिसचं काम आणि आपल्या आवडीचं काम याचं एक शेड्यूल आखतात. म्हणजे वेळापत्रक तयार करतात. त्यामुळे मोठी माणसं काम करुनही आनंदी असतात. मग आपणच का असं सुटीच्या मूडमध्ये अडकून मोठ्यांची बोलणी खायची? आपणही सुटीच्या मूडमधून बाहेर पडायला हवं ना! माझ्याकडे चांगला उपाय आहे, सांगू का?
सुटीच्या मूडमधून बाहेर पडण्यासाठी
१. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सुटी संपलेली आहे. सुटीत आपण खूप मजा केली आहे. आता शाळा सुरु झाली असून आपण चांगलं लक्ष देवून अभ्यास करायला हवा, हे मनाशी ठरवायला हवं. एकादा का हे ठरवलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतील.
२. शाळा सकाळची असो किंवा दुपारची. रात्री लवकर आणि वेळेत झोपून सकाळी लवकर उठायचं हे आपण आधी ठरवायला हवं. एखादी गोष्ट दुसऱ्यांनी कम्पलसरी केली तर होत नाही. पण तीच जर आपण ठरवली तर आपण अवघड गोष्टही सहज करु शकतो. तर सकाळी लवकर उठावं. फ्रेश झाल्यावर किमान १५ मिनिटं व्यायाम करावा. आपल्याला जो आवडतो, तो व्यायाम करावा. चाला, पळा, उड्या मारा नाहीतर फक्त ५ सूर्यनमस्कार घाला, न चुकता. पाहा किती फ्रेश वाटतं ते. शरीर आणि मनात एकदम उत्साह संचारेल.
३ शाळेतून आल्यावर आपलं एक आनंदी शेड्यूल तयार करावं. आल्यावर थोडं खाणं पिणं, थोडा आराम , क्लास असेल तर क्लास, मग थोडा वेळ खेळ, अभ्यास, मग आपली आवडती गोष्ट, जेवण, आई बाबांशी गप्पा.. हे असं शेड्यूल आखलं की आपल्यालाच आश्चर्य वाटेल आपण एका दिवसात किती साऱ्या गोष्टी करु शकतो ते.
४. सगळा अभ्यास शक्यतो सोमवर ते शनिवार मध्येच संपवावा. रविवार आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी मोकळा ठेवावा. जे शाळेच्या दिवसात करता येत नाही ते रविवारी करायचं. म्हणजे संपूर्ण आठवड्यासाठी आपला फ्रेश मूड तयार होतो.

Image: .freepik
सुटीच्या मूडमधून बाहेर पडण्यासाठी एवढं केलंत तरी खूप आहे. तुम्ही यातलं काय केलं किंवा काही वेगळं केलं असेल तर मला कळवाल का? काल रविवार होता ना. मला पुस्तक वाचण्यासाठी खूप वेळ मिळाला. भारी वाटलं मला. आता आठवडाभरासाठी माझा मस्त कामाचा मूड तयार झाला आहे!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact