
Image: freepik
भूगोलाचा तास म्हटलं की वर्गातल्या मुलांचे चेहेरे का उतरतात हेच सुषमा टीचरला कळत नव्हतं. मुलांनी प्रश्न विचारावे, एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करावं असं सुषमा टीचरला वाटायचं. पण मुलं मख्खं चेहेऱ्याने जे शिकवता ते ऐकतात, हे बघून त्यांचा मूडच जायचा. त्या दिवशीही मुलांना अश्मयुगाच्या निमित्ताने वेगवेगळ्या युगांची माहिती देवून माणूस कसा बदलतो? आजूबाजूची परिस्थिती, हवामान, साधनं याद्वारे माणसाने कशी प्रगती केली याची अतिशय रंजक माहिती सुषमा टीचर मुलांना देणार होत्या. पण मुलांच्या चेहेऱ्यावर काही उत्साहच नाही म्हटल्यावर त्यांनी आपला प्लॅन बदलला. मुलांशी भूगोल याच विषयावर बोलायचं त्यांनी ठरवलं.
भूगोल हा विषय तुमच्यापैकी किती जणांना आवडतो?
असा प्रश्न सुषमा टीचरने मुलांना विचारल्यावर कोणाचेच हात वर होईना. एक दोन जणांनी खूप उशीरा हात वर केले. तेही टीचरला वाईट वाटू नये म्हणूनच केले की काय अशी शंका यावी.
' भूगोल हा विषय उपयुक्त आहे की नाही?
या प्रश्नावर मुलं गोंधळली. काही जणांनी धीर करुन भूगोल निरुपयोगी असल्याचं सांगितलंच.
' भूगोलाचा तास हवा की नको?
यावर मुलं गप्प राहिली. मात्र तास नको हे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसतंच होतं, पण हवा असं मात्र कोणीच म्हणालं नाही.
हेही वाचा!
या छोट्याशा एक्सरसाइजमुळे मुलांना भूगोल हा विषय आवडतच नाही, हे सुषमा टीचर यांना समजलं. मुलांना भूगोल हा विषय आवडावा यासाठी त्यांना भूगोल हा विषय केवळ अभ्यासासाठीच नाही तर एकूणच आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगायला हवं असं वाटलं आणि त्यांनी त्या दिवशी भूगोलाच्या तासाला याच विषयावर बोलायचं ठरवलं.
' मला माहिती आहे तुम्हाला भूगोल हा विषय आवडत नाहीये. पण केवळ अभ्यासक्रमातला विषय म्हणून तुम्ही तो शिकताय. हो ना.. पण केवळ गुणांपुरता भूगोलाचा अभ्यास केला तर भूगोल किती छान विषय आहे, हे कळणारच नाही तुम्हाला. भूगोल हा विषय छान आणि महत्वाचा का आहे? हे तुम्हाला सांगितलं तर ?
सुषमा टीचरच्या या प्रश्नावर मुलं एका सूरात 'हो' म्हणाली.
भूगोल का शिकायचा?
१. भूगोल हा खूप मोठा विषय आहे. यात पृथ्वी, आकाश, अवकाश, समुद्र, नद्या , डोंगर, ग्रह, तारे, नद्या, दगड, शेती, जमीन, हवामान, पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. एक विषय शिकण्याच्या निमित्ताने तुम्हाला इतक्या गोष्टींविषयी माहिती मिळते.
२. भूगोलामुळे आपल्याला नकाशा, दिशा ओळखता येतात. आपल्या रोजच्या जीवनात या गोष्टींचं खूप महत्व आहे. इतकंच नव्हे तर याचा उपयोग पुढे नगररचना, वाहतूक, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी होतो. भूगोल शिकल्याने नैसर्गिक समस्या, अपघात यांची माहिती तर मिळतेच, पण त्यासोबतच आपण यातून काय मार्ग काढू शकतो याचीही माहिती मिळते.

Image: thoughtco

Image: freepik
३. भूगोलामुळे आपल्याला आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, त्याच्ं वैशिष्ट्य हे तर कळतंच सोबतच जगाची माहिती देखील मिळते. आपण जगाकडे कसं पाहायला हवं हे आपल्या भूगोल हा विषय शिकवतो. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या देशांची भौगोलिक परिस्थिती, तेथील हवामान्, तेथील लोकांची जगण्याची, राहाण्याची, खाण्यापिण्याची पध्दत, तेथील संस्कृती, प्रथा परंपरा समजून घेता येतात. भूगोलामुळे आपल्यामध्ये जगातल्या लोकांविषयी, त्यांच्या जागेविषयी आपुलकी आणि कुतुहल निर्माण होतं. भूगोल हा विषय आपल्यामध्ये पर्यटनाची, प्रवास करण्याची, प्रवासातून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण करतो.
४. पर्यावरण, निसर्ग याबद्दल आपल्यात जागरुकता निर्माण होते. पर्यावरणाच्या समस्या काय आहेत? त्याला कोण जबाबदार आहेत? त्यावरचे मार्ग काय आहेत? हे आपल्याला भूगोलच शिकवतो.
५. आपलं आणि आपल्या गावाचं, आपल्या शहराचं असलेलं नातं भूगोल घट्ट करतं. हा भूगोल आपल्याला जगाशी जोडतो.
इतकं सगळं जर आपल्याला भूगोलामुळे समजणार असेल तर भूगोलाशी अशी कट्टी का घ्यायची? खारे वारे, मतलई वारे, जांभा दगड , अग्निजन्य खडक, नकाशे म्हटलं की जांभया देण्याऐवजी या सगळ्यांमध्ये लपलेल्या रंजक गोष्टी शोधता यायला हव्यात. ते शोधण्याची चावी या भूगोल या विषयात आहे. ती चावी शोधायची तर मग भूगोल हा विषय हसत खेळत शिकता यायला हवा.. काय? सुषमा टीचरने प्रश्न विचारल्या मुलं उत्साहानं हो म्हणाली. आजच्या तासाला बसं एवढंच. आता पुढच्या तासाला आपण अश्मयुग शिकूया! असं सुषमा टीचरने म्हणेपर्यंत तास संपल्याची बेल झाली.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact