मोठ्यांनी सांगण्यापेक्षा आपणच आपल्याला शिस्त लावली तर?

Image: smartparents

शिस्त या शब्दाचा सर्वच मुलांना कंटाळा येतो. शाळेत शिस्त घरी शिस्त.. अभ्यास करताना शिस्त, एखादं आवडीचं काम करतानाही शिस्त. इतकंच काय तर मस्ती देखील शिस्तीने करा असं  म्हणतात मोठी माणसं. मग शिस्तीचा वीट येणारच ना! शिस्त हा शब्द कितीही वैताग देणारा वाटत असला तरी त्याआधी आपण जर 'स्वयं' हा शब्द जोडला तर त्याचा वैताग येणार नाही आणि ते नकोसेही वाटणार नाही. कारण शिस्तीची जेव्हा स्वयंशिस्त होते तेव्हा आपण अमूक गोष्टी कराव्यात, कधी कराव्यात, कशा कराव्यात हे कोणी आपल्याला दुसरं किंवा मोठ्या व्यक्ती सांगत नाही. उलट आपणच स्वत:ला ते सांगतो.  काय करायचंय, कसं करायचंय , केव्हा करायचंय हे आपलं आपणच ठरवतो. तज्ज्ञ म्हणतात की ही स्वयंशिस्त अंगी बाणवली तर अवघड विषयही सोपे होतात. अभ्यास व्यवस्थित होतो. परीक्षेत मार्क्स छान मिळतात. स्वयंशिस्त असली की अभ्यासासोबतच आवडीच्या गोष्टीही करायला मिळतात. तज्ज्ञ म्हणतात की आपल्याला जर आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, अभ्यासासोबतच इतर सर्व क्षेत्रात प्रगती करायची असेल तर स्वयंशिस्त हवीच.

हेही वाचा!

विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिस्त का महत्त्वाची?

स्वयंशिस्त असेल तर प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि विशिष्ट वेळेतच करायची सवय लागते. कमी वेळात अनेक गोष्टी चांगल्या करता येतात. शिवाय मोठी माणसं 'किती वेळ वाया घालवता' म्हणून आपल्याला रागवतात. पण स्वयंशिस्त असली की विनाकारण वेळ वाया जातच नाही. वेळेचा चांगला उपयोग आपण स्वत:हून करायला लागतो. स्वयंशिस्त लावली तर आपल्यालाला आपल्याकडील वेळेचं योग्य नियोजन करता येतं. ठरवलेल्या वेळेत आपल्याला करायचय गोष्टी बसवता येतात. ही स्वयंशिस्त अंगी बाणवण्याचा पहिला मार्ग म्हणजे  आपलं टाइम टेबल तयार करणं. आणि आपण तयार केलेलं टाइम टेबल काटेकोरपणे पाळणं.

स्वयंशिस्तीमुळे आपण अमूक करु शकतो, तमूक करु शकतो असा विश्वास निर्माण होतो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर चांगल्या गोष्टी करुन बघण्याचा विश्वास निर्माण होतो. आपलं नवीन गोष्टी शिकण्यासाठीचं कुतुहल वाढतं. त्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमात व्यायाम, मैदानी खेळ, पौष्टिक जेवण करणं, वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं या गोष्टींचा समावेश करायला हवा. या गोष्टींमुळे आपल्या अंगी स्वयंशिस्त बाणवता येते.

एकदा का आपल्याला स्वयंशिस्त लागली तर आपण जे करतो आहोत त्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं. यासाठी आपल्याला दिवसभरात काय काय करायचं आहे हे एका पानावर रोज लिहून काढावं. जे जे काम करु त्यापुढे बरोबरची खूण करत जावी. यामुळे दिवसभरात आपल्याला जे जे करायचं ते सर्व करुन होतं. आपलं एकही काम किंवा थोडाही अभ्यास, गृहपाठ करायचा राहात नाही. स्वयंशिस्तीने अभ्यास केला तर गृहपाठ अपूर्ण राहण्याचा प्रश्नच उरत नाही. आपण जसं मोठं होवू तसं आपल्याला या स्वयंशिस्तीमुळे अनेक कामं करुन बघण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.

इतरांशी वागताना, बोलताना स्वयंशिस्त  खूप कामी येते.  स्वयंशिस्त असेल तर आपण वागता बोलताना चुकत नाही. आपल्या वागण्या बोलण्यामुळे मोठ्यांचा अपमान होत नाही की लहानांना त्रास होत नाही. स्वयंशिस्तीमुळे आपलं वागणं बोलणं नियंत्रित राहातं. त्याचा फायदा म्हणजे आपले खूप चांगले मित्र-मैत्रिणी होतात. स्वयंशिस्तीमुळे आपल्या वागण्यातून कोणतेही प्रश्न निर्माण होत नाही.

बेशिस्तपणे वागल्यास आपल्या कोणत्याच गोष्टी नीट होत नाही. आपलं अभ्यासात नीट लक्ष लागत नाही. त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेलं समजत नाही. त्याचा परिणाम म्हणजे घरी अभ्यास करताना सर्व अवघड जातं. आपला अभ्यास, गृहपाठ शिल्लक राहातो. त्याचा परिणाम म्हणजे बेशिस्तीमुळे आपण आपलं टेन्शन वाढवून घेतो. शिक्षक रागावतील, शिक्षा करतील,  आपण नापस होवू, मागे पडू अशी भीती आपल्या मनात निर्माण झाली की त्याचा आणखी वाईट परिणाम आपल्या वागण्यावर होतो. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वयंशिस्त मदत करते

Image: masandpas

शाळेत किंवा घरी आपण जसं वागतो-बोलतो- जे काही करतो त्या गोष्टी इतरही पाहातात. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले विद्यार्थी, घरी लहान भावंडं आपण जसं वागतो-बोलतो-करतो त्याचं अनुकरण करतात. शाळेत, घरी, मित्र-मैत्रिणींसोबत असताना आपला  प्रभाव इतरांवर चांगला पडावा असं वाटत असेल तर स्वयंशिस्त अंगी बाणावीच लागेल. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact