
“सुट्टी संपत आली, अजून एकाही पुस्तकाला हातसुद्धा लावला नाहीयेस हा वरद तू!” १३ वर्षांच्या वरदवर आई चांगलीच चिडली होती.
“मला बोअर होतं पुस्तकं वाचायला.”
“अरे वाचायला बोअर होतं, तर तू नवीन गोष्टी शिकणार कसा?”
“कसा म्हणजे यूट्युबवरून!”
“यूट्युब वेगळं पुस्तक वेगळं.”

हे आईचं वाक्य ऐकल्यावर वरदची चिडचिड झालीच. कारण आता नेहेमीची वादावादी सुरु होणार. इतका वेळ सोफ्यावर वाकडातिकडा लोळत पसरलेला वरद आता एकदम उठून बसला.
“तुला यूट्युबबद्दल एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे?”
“मला यूट्युबबद्दल प्रॉब्लेम नाहीये. मी इतकंच म्हणते आहे की पुस्तक वेगळं आणि व्हिडीओज वेगळे.”
“कसे काय? तू जी पुस्तकं वाच म्हणून माझ्यामागे कटकट करत असतेस त्यातसुद्धा माहितीच असते आणि व्हिडीओजमध्येपण माहितीच असते. मग पुस्तकच कशाला वाचायला पाहिजे? व्हिडीओ बघतो ना मी!”
“हो ना?” आईच्या लक्षात आलं, की वरदला आपलं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि आता तो असेच वेड्यासारखे प्रश्नावर प्रश्न विचारत राहणार आईने आपलं धोरण बदललं आणि तिने शांतपणे त्याला विचारलं, “जर का दोन्हीमध्ये माहितीच असते, तर मग तुला व्हिडीओज कशाला बघायचेत? पुस्तक वाच की! तूच म्हणालास ना, की दोन्हीमध्ये माहितीच असते म्हणून!”
“हो, पण ते… तसं सेम नसतं गं आई!” वरदला यावर पुढे काय बोलावं ते सुचेना.
“का बरं? त्यात काय फरक असतो?”
आईचा शांतपणा बघून वरदची गोची झाली. कारण आता त्यालापण आरडाओरडा आणि चिडचिड करता येईना. नाईलाजाने तोही शांतपणे म्हणाला,
“यूट्युबवर व्हिडीओज बघायला मजा येते आई… पुस्तक वाचायला बोअर होतं.”
“का बरं?”
हेही वाचा!
मी कशाला अभ्यास करु, मी यूट्यूबर होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे?
“का म्हणजे??? पुस्तकं बोअर असतात. आणि व्हिडीओज इंटरेस्टिंग असतात म्हणून!”
“असं का असतं तेच तर विचारतेय ना मी.”
“आई आता बोअर मारू नकोस हां!”
“बोअर करत नाहीये. फक्त विचारते आहे.”
“ते मला काय माहित आई???” आता मात्र वरदचा पेशन्स संपला. “मेबी पुस्तकं लिहिणारे सगळे बोअर लोक्स असतील.”
“पण तुला नक्की माहिती नाहीये ना?”
“नाही.”
“मी सांगते. यूट्युब बघायला मजा येते, कारण त्यातून आपल्याला आयती माहिती मिळते. आणि पुस्तक वाचायला बोअर होतं कारण त्यावर आपल्याला विचार करावा लागतो.”
“असेल.” वरदने खांदे उडवले, “पण मग त्यात वाईट काय आहे?”
“वाईट हे आहे, की आपल्या मेंदूला एकदा आयतं खाद्य मिळालं की काम करायला नको वाटतं. आणि मग आपल्याला तीच सवय लागते.”
“मग काय बिघडलं? नाहीतरी सगळं यूट्युबवर असतंच ना.”
“असतं ना. पण म्हणून आपण आपलं नुकसान कशाला करून घ्यायचं? कारण एरवी काही आपल्याला यूट्युबवरून मिळालेल्या माहितीचा उपयोग होत नाही. गणित आपलं आपल्यालाच सोडवावं लागतं, मित्रांशी झालेली भांडणं आपल्यालाच विचार करून सोडवावी लागतात, खरं म्हणजे सगळे प्रश्न आपले आपल्यालाच सोडवावे लागतात.”
“मग त्यासाठी पुस्तकाचा तरी काय उपयोग आहे?”
“पुस्तकाचा उपयोग असा आहे, की त्यामुळे आपल्याला विचार करायची सवय लागते.”
“ओह!” वरदला आता थोडं थोडं पटत होतं, “पण म्हणून यूट्युब पूर्ण बंद करायचं???”
“छे छे! यूट्युब बघायचंच… पण पुस्तकही वाचायची. मग चालेल?” आईने विचारलं.
“डन!” कधी नाही ते वरद आणि आईमध्ये एकमत झालं होतं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


