मी कशाला अभ्यास करु, मी यूट्यूबर होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे?

“अरे वा! विवान किती उंच झालायस…” विवानच्या पप्पांचे मित्र घरी आले होते ते कौतुकाने म्हणाले. त्यावर विवानने नुसतंच स्माईल दिलं. आता किती उंच झालायस यावर काय बोलणार? बरीचशी दहावीत गेलेली मुलं उंच होतात तसा तोही झाला होता.

image : wikihow

“मग यंदा काय दहावी ना?”

“हो काका.”

“मग क्लास वगैरे लावला की नाही? हे अभ्यासाचं वर्षं आहे. आता खेळ आणि इतर टाईमपास बंद! समजलं का?” काकांनी उगाचच दम भरला. विवानने पप्पांकडे बघितलं आणि त्यांचा चेहरा बघून निमूटपणे म्हणाला, “हो काका.”

मग काकांनी पुढचा प्रश्न टाकला,

“मग? पुढे काय व्हायचं ठरवलं आहेस?”

“युट्युबर!” विवानने शांतपणे सांगितलं.

हेही वाचा! 

मनासारखं घडलं नाही तर राग येणारच. पण तो येवू नये म्हणून काय करायला हवं?

“ऑ???” काकांना बिचाऱ्यांना काही कळलंच नाही. “काय होणार आहेस तू?”

image : freepik

“युट्युबर होणार आहे काका. मी माझं स्वतःचं युट्युब चॅनल काढणार आहे. त्यावर व्हिडीओज टाकणार आहे आणि त्यातून पैसे कमावणार आहे.”

काकांनी प्रश्नार्थक चेहेऱ्याने विवानच्या पप्पांकडे बघितलं. ते कसाबसा राग आवरत म्हणाले,

“त्याला काय कळतंय अजून? काहीही बोलतो मित्रांच्या नादाने. तो इंजिनिअर होणार आहे. त्याला चांगले मार्क्स पडतात.”

“अच्छा अच्छा… मग ठीक आहे.” काकांनी मान डोलावली. पप्पांनी विवानला डोळ्यांनी ‘जा आता’ असा इशारा केला. तो समजून विवान ताबडतोब बाहेर गेला. पण हा विषय इतक्यात संपणार नाही हे त्याच्या लक्षात आलेलं होतं, आणि तसंच झालं. तो संध्याकाळी घरी आल्याबरोब्बर पप्पांनी जे त्याला झापायला सुरुवात केली ते काही केल्या थांबेचनात!

“ते यूट्यूबचं वेड आधी डोक्यातून काढून टाक. समजलं? हुशारी अशी वाया घालवतात का? तुमच्यासाठी आम्ही इतके कष्ट करतो त्याची काही किंमत नाही तुम्हाला. एवढाल्या क्लासच्या फिया कशाला भरल्यात मग?” वगैरे वगैरे नेहेमीचं रागवून झाल्यावर ते मम्मीकडे वळले, “म्हणून मी सांगत होतो, की  त्याला इतक्यात मोबाईल घ्यायला नको. पण तुला नेहेमी त्याचंच खरं वाटतं. अभ्यासासाठी पाहिजे म्हणे मोबाईल. आता हे युट्युबर वगैरे अभ्यासात शिकलास वाटतं?”

पप्पा इतके का चिडले ते विवानला काही केल्या कळेचना. "इतर कुठलंही काम करून पैसे कमावलेले चालतात, तर युट्युबर का नाही?" आणि असं होण्याच्या बाबतीत विवान एकटा नाहीये. एखाद्या मुलाच्या किंवा मुलीला सोशल मीडियावर लाईक्स आणि थोडेफार फॉलोअर्स मिळायला लागले, की आपण सोशल मीडिया स्टार किंवा इन्फ्लुएन्सर व्हावं असं त्यांना वाटायला लागतं. इतके दिवस त्यांच्या व्हिडीओजचं कौतुक करणारे घरचे लोक ते करियर करायचं म्हंटलं की एकदम विरोध करायला लागतात. “आधी शिक्षण पूर्ण करा. मग काय हवं ते करा.” असा बहुतेक सगळ्या पालकांचा आग्रह असतो. आणि आपल्याला सोशल मीडियावरून खूप पैसे मिळणार आहेत तर शिक्षणात वेळ कशाला ‘वाया’ घालवायचा? असा मुलांचा प्रश्न असतो.

हेही वाचा! 

स्क्रीनचं व्यसन टाळण्यासाठी स्क्रीन टाइम किती असायला हवा?

यात कदाचित सुरुवातीला मुलांना पैसे मिळतातही, पण या बाबतीत शिक्षण पूर्ण करा हे पालकांचं म्हणणं अगदी योग्य असतं.

image : wikihow

सोशल मीडियावर पैसे मिळत राहण्यासाठी सातत्याने उत्तम कन्टेन्ट द्यावा लागतो. ते काम वर वर पाहता वाटतं तितकं सोपं नसतं. दुसरं म्हणजे सोशल मीडियातले स्टार्स लाटेसारखे येतात आणि वाहून जातात. पाच वर्षांपूर्वी ज्यांची हव्वा होती ते आता कुठे दिसतही नाहीत. एके काळी काचा बदाम वाल्याने नुसता धुमाकूळ घातला होता. आता  आठवतसुद्धा नाही. इतक्या बेभरवशाच्या क्षेत्रात आपल्या मुलाने जाऊ नये असं वाटणं अगदी योग्य आहे. शिवाय सोशल मीडियाचं जग बाइरुन दिसतं तेवढं प्रत्यक्षात छान, ग्लॅमरस आणि रंगीबेरंगी नसतं. त्यात बहुतेक वेळा फारसे पैसेही मिळत नाहीत आणि समाधानही मिळत नाही. 

त्याही पलिकडे जाऊन पालक कसा विचार करतात? तर “समजा तुझं युट्युब चॅनल नाही चाललं तर काय?” तर अशा वेळी हातात डिग्री आणि कामाचा अनुभव असेल तर वेळीच दुसरं करियर करता येतं. पण सोशल मीडियाच्या नादात शिक्षण अर्धवट सोडलं तर ऐन पंचविशीत अशी परिस्थिती येऊ शकते की आता सोशल मीडियात करियर होऊ शकत नाही, दुसरं काही करावं म्हंटलं, तर हातात डिग्री नाही, कौशल्य नाही, कामाचा अनुभव नाही आणि हे सगळं कमवायला वेळही नाही. त्यापेक्षा शिकण्याच्या वयात शिक्षणावर लक्ष द्या हेच योग्य आहे. तुमच्याकडे खरंच लोकांना देण्यासारखी माहिती, ज्ञान असं गोळा झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं तर त्यावेळी तुम्ही युट्युब चॅनल वगैरेचा विचार करू शकता. कारण युट्युबवर दीर्घकाळ चॅनल चालवण्यासाठीसुद्धा मुळात तुमच्याकडे ज्ञान तर पाहिजेच, आणि ते शिक्षणानेच मिळतं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact