अभ्यासाचीच पुस्तकं वाचून होत नाही अवांतर वाचन कधी आणि का करायचं?

Image: freepik

जरा वाचत जा! असं जेव्हा आपले आई बाबा आपल्याला सांगतात तेव्हा आपण काय म्हणतो? 'रोजच तर वाचतो. मराठी इतिहास, भूगोल, विज्ञानाची पुस्तकं. अजून किती वाचायला हवं!' पण हे उत्तर देताना आपण जाणून बुजून वेड घेवून पेडगावला जातो. म्हणजे आई बाबा कोणत्या अर्थाने वाच हे माहित असूनही आपण आपल्या मनातलं उत्तर देवून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आई बाबांना, शिक्षकांना आपण अभ्यासाची पुस्तकं वाचतो हे काही माहित नसतं का, तरीही ते वाचायला सांगतात. याचा अर्थ त्यांना अभ्यासाशिवायचं अवांतर वाचन म्हणायचं असतं. पण अनेकांना अवांतर वाचन का करायचं हेच कळत नसतं? जरा अवांतर वाचन केलंस तर परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील असं जेव्हा मोठे म्हणतात तेव्हा अवांतर वाचनाचा आणि अभ्यासाचा काय संबंध, अवांतर वाचनाने मार्क्स चांगले कसे पडतील? असे उलट प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. आपल्याला अभ्यास खूप असतो, त्यामुळे अवांतर वाचन करायला वेळच मिळत नाही असं आपण कितीही म्हणत असलो तरी अभ्यास आणि अवांतर वाचन, अभ्यासातील प्रगती आणि अवांतर वाचन यांचा जवळचा संबंध असतो.कसा तो समजून घ्यायला हवा.

हेही वाचा!

अवांतर वाचन का करावं?

आपली वाचनाची क्षमता अवांतर वाचन केल्याने सुधारते. अभ्यासाशिवाय आपण जेव्हा वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला अनेक नव्या गोष्टींची माहिती होते. नवनवीन लेखन शैलीशी आपली ओळख होते. या माहितीचा वापर किंवा नव्या शैलीचा वापर आपण प्रत्यक्ष परीक्षेत भाषा विषयाचा पेपर सोडवताना निबंध लिहिताना करु शकतो. अवांतर वाचनामुळे आपल्यालाही नवीन काही नवीन पध्दतीने लिहिण्याची प्रेरणा मिळते.

अवांतर वाचन केल्याने आपली विचार करण्याची क्षमता वाढते. अवांतर वाचनामुळे आपल्याला नवनवीन कल्पना समजतात. त्याचा फायदा म्हणजे आपणही विचार करायला लागतो. नवीन कल्पना आपल्यालाही सूचायला लागतात. आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यामुळे आपली अभ्यास करण्याची ताकद तर वाढतेच शिवाय अभ्यास करताना आपण तयार, आयत्या मायत्या उत्तरापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करायला शिकतो.

अवांतर वाचनामुळे अभ्यासातील पुस्तकातल्या मुद्द्यांशिवाय आपली नवनवीन मुद्द्यांशी ओळख होते. याचा फायदा आपलं अभ्यासातलं आकलन वाढण्यास तर होतोच शिवाय वाचनामुळे आपल्याला जगातल्या, आपल्या अवतीभवतीच्या नवनवीन मुद्द्यांचा परिचय व्हायला लागतो. वाचनामुळे आपल्याकडील माहितीचा साठा तर वाढतोच शिवाय या माहितीचा योग्य वेळी उपयोग करण्याची आपल्यातली क्षमता वाढते किंवा नव्याने निर्माण होते.

हेही वाचा!

सतत अभ्यास करुन, अभ्यासाचेच मुद्दे डोक्यात ठेवून आपल्याला अभ्यासाचा ताण यायला लागतो. हा ताण जर खूप वाढल तर मग आपल्याला अभ्यास करावासा वाटत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहात नाही, अभ्यासात मन लागत नाही. अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो. पण अभ्यासाशिवाय अवांतर वाचन जेव्हा केलं जातं तेव्हा अभ्यासामुळे आलेला डोक्यावरचा ताण निघून जातो. आपल्या आवडीचं वाचत असल्यास अभ्यासाने निर्माण होणारा, ताण, चिंता, बोअरनेस या गोष्टी कमी होतात. अवांतर वाचनामुळे आपली लक्ष देवून वाचण्याची क्षमता सुधारते.  नवीन शब्द, वाक्यरचनेची नवीन शैली आपल्याला समजते. अवांतर वाचन झाल्यानंतर मन शांत होतं. त्यानंतर पुन्हा जोमाने अभ्यास करण्याची इच्छा होते.

आपल्या आवडीचं पुस्तकं पाऊण तास किंवा एक तास वाचलं तर आनंदाने अभ्यास होतो. अवांतर वाचनाने मूड हलका फुलका होतो. मन लावून आणि लक्ष एकाग्र करुन अभ्यास करण्याची क्षमता वाढते. 

रोज आपल्या आवडीचं पुस्तक वाचलं तर आपली स्मरणशक्ती देखील  वाढते. 

Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact