मुलांनी किती अभ्यास केला म्हणजे आईबाबांचं समाधान होईल?

डॉ. श्रुती पानसे

अभ्यास किती वेळा केला म्हणजे होतो असा प्रश्न खूप मुला-मुलींना पडतो. या प्रश्नाचं उत्तर ना पुस्तकात मिळेल ना गुगलवर शोधाशोध करून.  खरंतर  किती वेळ अभ्यास करायचा हा एक फार फार डेंजर प्रश्न आहे. कारण रोज सगळ्यांच्या घरी असंच असतं. मुलं म्हणतात की, 'खूप वेळ अभ्यास केला. आता खेळायला जाऊ का?' आणि आई-बाबा म्हणतात की , 'अजून जास्त वेळ अभ्यास करायला पाहिजे. सारखं काय खेळायला जायचं असतं तुम्हाला? बसा अजून जरा वेळ. अजून ५ गणितं सोडवा!' अजून दहा मिनिटं, अजून अर्धा तास किंवा तासभर अशी मोठ्यांची अभ्यासाची मागणी संपत नाही आणि मुलांची मात्र अजून अभ्यास करण्याची क्षमता संपलेली असते. या ताणावर योग्य उत्तर मिळणं आवश्यक आहे. 

हेही वाचा!

किती वेळ अभ्यास हे ठरवायचं कसं?

रोज शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण केला पाहिजे. कारण तो गृहपाठ केल्यानं आपल्याला त्या दिवशी शिकवलेला अभ्यास चांगला समजतो. त्याची उजळणी होते.

शाळेत त्या दिवशी जो धडा किंवा जे प्रकरण शिकवलं असेल, त्याची घरी येऊन एकदा उजळणी किंवा वाचन केलं पाहिजे.

शाळेतून जे प्रकल्प करायला सांगितलेले असतील, त्याचं काम आपण वेळेवर केलं पाहिजे. काही वेळा ते प्रकल्प एक आठवड्यात पूर्ण करायचे असतात. त्यासाठी रोज थोडं काम करावं लागणार असतं. पण आपण काय करतो, की आठवडाभर काहीच करत नाही आणि मग शेवटच्या दिवशी आपली धावपळ होते आणि मग आपण घरातल्या सगळ्यांना त्यासाठी कामाला लावतो. असं करणं काही योग्य नाही. आपण शाळेतून दिलेला रोजचा अभ्यास रोज पूर्ण करणं, त्याचे व्यवसाय पूर्ण करणं हे महत्त्वाचं असतं.

Image: oxfordlearning

अभ्यासाचा मंत्र 

पुस्तकं उघडून बसणं हा काही 'अभ्यास' नव्हे ! खूप वेळ सलग वह्या-पुस्तकं उघडून बसल्याने काही उपयोग होतोच असं नाही. त्यापेक्षा पूर्ण एकाग्रतेने अर्धा तास किंवा तासभर अभ्यास करा. असा मन लावून केलेला अभ्यास फायदेशीर ठरतो.  मग पाहिजे तर मध्ये पाच - दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. पण तो ब्रेक पाच किंवा दहा मिनिटांचाच असेल याकडे लक्ष ठेवा. अभ्यास करताना सलग तासनतास न बसता मध्ये छोटेसे ब्रेक घेतल्याने सलग अभ्यास करताना आलेला कंटाळा किंवा थकवा दूर होतो. 

याशिवाय दुसरा भाग असा असतो, की आपल्याला काही विषय कठीण वाटतात. त्या विषयांची आपण शिकवणी लावलेली असते. त्या शिकवणी वर्गात दिलेला गृहपाठसुद्धा पूर्ण करायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जसे वरच्या वर्गात जाता तसं इंग्रजीची स्पेलिंग्ज पाठ करणं, शुद्धलेखनाचा सराव करणं हेही गरजेचं असतं. आता हे सगळं करायला प्रत्येक मुलाला वेगवेगळा वेळ लागतो. काही मुलांचा अभ्यास पटकन करून होतो, तर काहींना त्यासाठी वेळ लागतो.

आणि जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल तर तसं आई-बाबांना सांगा. अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर ते तरी कशाला तुम्हाला बसवून ठेवतील बरं?

संचालक 'अक्रोड'

ishruti2@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact