रोज भाजी पोळीचाच डब्बा हवा!असा नियम शाळेने का बरं केला असेल?

Image: hindustantimes

“तुमच्या शाळेची कुठली गोष्ट तुम्हाला अजिबात आवडत नाही?” असा प्रश्न विचारला तर खूप शाळांमधली मुलं काय सांगतील माहितिये? “आमच्या शाळेत रोज भाजीपोळीचा डबा न्यावा लागतो आणि ते आम्हाला अजिबात आवडत नाही.” तुम्हीपण तेच सांगाल. हो की नाही?

आधीच रोज डब्यात भाजीपोळी आणायची असला बोअर नियम शाळेने करून ठेवलेला असतो. आणि तो नियम पुरेसा नसतो असं आईबाबांना वाटतं, म्हणून ते अजून त्यात त्यांचे नियम बनवतात. काय तर म्हणे “रोज बटाट्याची भाजी डब्यात देणार नाही.” आता हे काही शाळेने सांगितलेलं नसतं. हे आईबाबा आपले आपण ठरवतात. का बरं रोज बटाट्याची भाजी देणार नाही??? बरं बटाटा नाही, तर निदान भेंडी तरी द्यावी. पण नाही. आईबाबांचं वेगळंच काहीतरी असतं. सिमला मिरची, दोडका, भोपळा, शेपू अश्या भाज्या का बरं मुलांना डब्यात न्याव्या लागतात? मुळात शाळेत भाजीपोळीच का न्यावी लागते? इतर पोटभरीचं काहीतरी नेलं तर का चालत नाही?

हेही वाचा!

छोट्याशा नीनवर मोठी जबाबदारी. ती अननसाचं आइस्क्रिम कसं विकेल?

सगळ्या मुलांना हा प्रश्न पडतोच, आणि त्याचं उत्तर मात्र कोणी देत नाही. पण त्याचं उत्तर काय आहे सांगू? भाजीपोळीतून तुमच्या शरीराच्या वाढीसाठी जे अन्नघटक मिळतात ते इतर सटरफटर खाण्यातून मिळत नाहीत. तुम्हाला शाळेत अन्नघटक शिकवतात ना? कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व हे सगळे घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. इतकंच नाही, तर खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं होण्यासाठी त्यात चोथा असणंही आवश्यक असतं. हे सगळं खाणं कायमच महत्वाचं असतं. पण वाढीच्या वयातल्या मुलांसाठी तर ते फारच महत्वाचं असतं. आणि हे सगळे अन्नघटक संतुलित प्रमाणात भाजीपोळीत असतात.

पण तुम्हाला नेमकी भाजीपोळी आवडत नाही. तुम्हाला काय आवडतं? तर वडापाव, समोसा, बर्गर, पिझ्झा, केक, बिस्किट्स, चायनीज नूडल्स असलं काहीतरी. पण मग हे खाल्लं तर काय बिघडतं? तर कधीतरी हे सगळं खाल्ल्याने काही बिघडत नाही. पण नेहेमी नेहेमी हेच खाल्लं तर त्यातून आपल्या शरीराला पोषण मिळत नाही. आणि मग तुमचं नुसतं वजन वाढतं, पण अंगात ताकद काही येत नाही. आणि हे सगळं केव्हातरी खाल्लेलं चालतं, म्हणूनच बहुतेक प्रत्येक शाळेत आठवड्यातून एक दिवस खाऊचा डबा आणायला परवानगी असते. आणि त्या दिवशी तुम्ही तुम्हाला पाहिजे तो छान खाऊ डब्यात नेतासुद्धा.

पण खरं खरं सांगा, तुम्हाला जर का डब्यात काहीही आणलेलं चालेल अशी परवानगी दिली तर तुम्ही डब्यात भाजीपोळी न्याल का? नाही! मग तुम्ही रोजच “काहीतरी छान डबा दे” असं म्हणून आईबाबांच्या मागे लागाल. आणि त्याने नुकसान तुमचंच होईल. म्हणूनच शाळेत भाजीपोळीचाच डबा न्यायचा असतो. कारण एरवी आपण घरी आपल्याला पाहिजे ते खातोच. मग दिवसातलं एक जेवण पौष्टिक असायला काय हरकत आहे? आणि नाही तरी, शाळेत सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर बसून डबा खातांना इतकी धमाल येते, की अगदी पडवळाची भाजी जरी डब्यात असेल, तरी काही बिघडत नाही. हो ना?

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact