- शिल्पा दातार

थायलंड या देशातली ही गोष्ट. नीन अवघी सात वर्षांची धडपडी मुलगी असते.
तिचं आणि तिच्या आईचं दोघींचंच छोटं जग असतं. त्यांच्या छोट्या घरात ताई, दादा, बाबा, आजी, आजोबा असं कोणी कोणी नसतं. तिची आई शाळेत गेलेली नसते. त्यामुळं ती पैसे मिळवण्यासाठी छोटासा फळांचा व्यवसाय करत असते. त्यातून दोघींचं पोट कसंबसं भरत असते. आईला नेहमी छोट्या नीनची काळजी वाटत असते. आपण तिच्या गरजा पुरवू शकू का, याचा विचार करत असते. हिचं कसं होईल? ही शाळा नीट शिकेल का? आपण तर शिकलेलोसुद्धा नाही आहोत, मग हिला कसं शिकवायचं?
हेही वाचा!
गोष्ट पायातून निसटलेल्या बुटाची आणि स्लिपर तुटलेल्या मुलाची
पक्षी कसे आपल्या पिल्लांना पंख फुटल्यावर एकदा उडायला शिकवतात आणि नंतर आकाशात मुक्त सोडून देतात. त्यांचं त्यांनी अनुभव घेऊन पंख पसरून उडायला हवं. तसंच नीनच्या आईला वाटतं. पण नीन तिची चिंता दूर करते. कशी माहितीय का?
ती खूप समजूतदार मुलगी असते. ती कोणत्याही गोष्टीचं खूप छान निरीक्षण करत असते. नीन आणि तिची शांत, हसरी आई एकमेकींशी खूप कमी बोलतात. एकमेकांच्या डोळ्यांतले हावभाव त्या जणू वाचत असतात. एकदा आई आपल्या गाडीवर विकण्यासाठी अननस चिरून त्याच्या आकर्षक फोडी करत असते. तिच्या शेजारी बसलेली नीन आई वरून काटेरी वाटणारं अननस कसं चिरते, याचं बारीक निरीक्षण करते. दुसरा अननस घेऊन तस्साच चिरायचा प्रयत्न करते. फळं चिरण्याची, त्यांच्या विविध आकारांच्या आकर्षक फोडी करण्याचीसुद्धा एक कला असते, बरं का! ते बघायला तुम्हाला नक्की आवडेल.
एकदा काय होतं, तिच्या घरापाशी आइस्क्रीम विकणारे काका येतात. तिच्या शाळेतली काही मुलं-मुली तिथं जातात आणि गार गार आईस्क्रीम विकत घेतात. नीनची आई आपला फळांचा गाडा घेऊन तिथंच उभी असते आणि छोटी नीनही! ती पाहते तर गल्ल्यात आईस्क्रीम घेण्याइतके पैसेच नसतात. नीन त्या आईस्क्रीम खाणाऱ्या मुलांकडं एकटक बघत असते. पण ती रडत नाही आणि आईकडे अजिबात हट्ट करत नाही. तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यावरून तिची आई ओळखते की, तिलाही आईस्क्रीम खावंसं वाटतंय. मग आईनं काय केलं असेल, ते पाहणं खूप मजेदार आहे.
नीनची आई शाळा शिकलेली नसते, पण फार हुशार असते. ती खूप विचार करते. रात्री नीन झोपल्यावर ती एक गंमत करते. आईस बॉक्सवरून जणू जादूची कांडीच फिरवते. नीनची आई नक्की काय करते ते तुम्ही या छोट्याशा चित्रपटात नक्की बघा! तिच्याकडून प्रेरणा घेऊनन तुम्हीही आपापल्या घरी तशी गंमत तयार करू शकता.
सकाळ होते आणि काय! सरप्राईज! आई नीनच्या हातात चक्क आईस्क्रीम ठेवते. त्या गार गार आईस्क्रीमची चव तिला फारच आवडते बरं का! ती ते आईस्क्रीम खाते. आई म्हणते, हे चवदार थंडगार आईस्क्रीम बाजारात जाऊन विकून ये. इतक्या छोट्याशा मुलीला आईने आईस्क्रीम विकायला का सांगितलं असेल बरं! नीनही तिचं ऐकते, कारण आईला फळंविक्रीतून पुरेसे पैसेच मिळत नसतात. हे तिला माहीत असतं. नीन आपल्या गळ्यात आईस बॉक्स घेते आणि आईस्क्रीम विकायला निघते. पण तिची आईस्क्रीम्स काही विकली जात नाहीत. ती निराश मनानं घरी येते. तिची आई शांतपणे तिला विक्रीचं गुपित सांगते. ते नीन ऐकते का? आई तिला नक्की काय सांगत असेल? नीनला आईस्क्रीम विकण्यात यश मिळतं का? नीन नक्की काय करते? ती स्वतः काही विचार करते का? हे पाहायला खूप गंमत येईल. सिनेमा छोटाच असल्यानं तुम्हाला अजिबात बोअर होणार नाही. उलट नेहमी पाहावासा वाटेल. त्यातून आपले प्रश्न आपणच कसे सोडवायचे, एखाद्या गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण कसं करायचं, हे नक्कीच शिकायला मिळेल.
नीनचा यशाचा सुंदर प्रवास इथूनच सुरू होतो. तिची आई म्हणते, आता मी आजूबाजूला नसले तरी नीन तिचे प्रश्न नक्कीच सोडवू शकेल. आता तिची काळजी करण्याची गरज नाही. ही खऱ्याखुऱ्या नीनची गोष्ट आहे. नीन हे तिचं टोपणनाव.
चला, नीनशी दोस्ती करूया का? तिच्या आईला फळं विकायला मदत करूया का? नीन कशी आईस्क्रीम विकते, ते पाहायला तिच्याबरोबर बाजारातून फेरफटका मारूया का? ट्रिंग ट्रिंग अशी घंटा वाजवत सायकल आली की तिचं ‘जादूचं’ आईस्क्रीम खाऊया का? ही सगळी गंमत अनुभवण्यासाठी नीनची गोष्ट बघावी लागेल. या शॉर्ट फिल्मचं नाव आहे, ॲन अनस्कूल्ड मदर... (an unschooled mother)
ही फिल्म युट्यूबवर पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


