मनाचा मित्र -
- रुचिरा दर्डा,
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज

माझा लहान भाऊ आल्यापासून कुणीही माझे लाड करत नाही. आईबाबा, आजीआजोबा सगळे त्याच्याभोवतीच असतात. मी त्यांना आता आवडत नाही असं मला वाटतं, असं का करतात ते?
- शर्विल, अमरावती
हॅलो शर्विल, तुला जे वाटतंय तसं वाटणं ‘नॉर्मल’ आहे. अनेक लहान मुलांना त्यांचा छोटा भाऊ किंवा बहीण आली की हे असं वाटतंच, त्यामुळे तुला असं वाटतंय म्हणजे तुझं काहीतरी चुकतंय असा विचार करु नकोस… दॅट्स ओके, तुला जे वाटतंय ते वाटूदेत, आपण बोलूया याबद्दल.
तुझा लहान भाऊ येण्याआधी तूच घरात सगळ्यात लहान होतास, बरोबर? त्यामुळे सगळेजण सतत तुझ्या अवतीभवती असायचे. तुझे लाड करायचे. पण आता तुझा छोटा भाऊ आला आहे. तो खूपच लहान आहे. सारखा रडतो, झोपतो, दूध पितो, आई सारखी त्याच्या अवतीभवती असते. त्यामुळे तुला वाटतंय की आता तुझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, तुला वाईट वाटत असेल, कंटाळा येत असेल, थोडं ‘जेलस’ही वाटत असेल.
हेही वाचा!
आई-बाबांचं भांडण होतं, तेव्हा घाबरलेल्या मुलांनी काय करायचं असतं?
पण आईबाबा, आजीआजोबा सतत बाळाच्या भोवती असतात म्हणजे त्यांचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही, हे लक्षात ठेव.
तुझ्या लहान भावाकडे आत्ता सगळ्यांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्याला अजून चालता येत नाही. बोलता येत नाही. काय होतंय ते सांगता येत नाही. त्यामुळे तो नुसता रडतो. तो रडला की त्याला काय होत असेल याचा अंदाज करत बसणं हे मोठ्या माणसांचं एक कामच झालंय. तू मात्र आता मोठा झाला आहेस, शहाणा आहेस, तुला काही हवं असेल तर तू मागू शकतोस, काही झालं तर ते सांगू शकतोस, त्यामुळे तुझ्याकडे सतत लक्ष दिलं नाही तरी चालेल, पण म्हणजे तू महत्त्वाचा नाहीस असं अजिबात नाही, त्यामुळे तसा विचारही मनात आणू नकोस.
हे सगळं तुला कळलं तरी मनात तुला थोडं वाईट वाटत असणारच, मग आता काय करायचं, बरं?
मी सांगते.
१ - 'सगळे बाळाचेच लाड करतात आणि मी कुणालाच आवडत नाही' असा विचार करत लांब राहाण्यापेक्षा तूही बाळाबरोबर वेळ घालव. त्याच्याशी गप्पा मार. बाळाची काळजी घेताना आईला मदत कर. तुला मजा येईल आणि आईलाही मस्त वाटेल.
२ - घरी आलेलं छोटं बाळ हे तुझा लहान भाऊ आहे हे लक्षात ठेव. ते थोडं मोठं झालं की तुला खेळायला, दंगामस्ती करायला पार्टनर मिळणार आहे, हे विसरु नकोस. ते मोठं झालं की दादा म्हणजे तू त्याला त्याचा रोल मॉडेल वाटणार आहेस, मित्रही वाटणार आहेस, त्या मैत्रीची सुरुवात आत्तापासूनच कर, कशी वाटते ही आयडिया?
३ - आईबाबांना तू खूप आवडतोस, तुझ्यावरचं त्यांचं प्रेम कसं कमी होईल बरं? त्यामुळे पुन्हा असा विचार मनात आला तर एक मिनिट थांब, दीर्घ श्वास घे आणि तूही आईबाबांचा खूप लाडका आहेस हे स्वतःला सांग, तुला मस्त वाटेल बघ.
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


