आई-बाबांचं भांडण होतं, तेव्हा घाबरलेल्या मुलांनी काय करायचं असतं?

मनाचा मित्र

- रुचिरा दर्डा,
संस्थापक, पेरेंट विथ पर्पज

Image: freepik

माझे आईबाबा सारखे भांडतात… ते भांडायला लागले की मला खूप भीती वाटते. मला माझा अभ्यासही करता येत नाही मग, मी काय करु?
- नाव लिहिलेले नाही

सगळ्यात आधी, शांत हो… माझ्याबरोबर एक दीर्घ श्वास घे. दीर्घ श्वास कशासाठी? कारण सगळ्यात आधी मला तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे : तुझे आईबाबा भांडतात,यात तुझा दोष नाही, अजिबात नाही… आईबाबा भांडायला लागले की मुलांना मनातल्या मनात वाटत असतं, माझंच काहीतरी चुकलं असणार! - पण तसं नसतं. मोठ्या माणसांच्या भांडणांचा मुलांशी काही संबंध नसतो. त्यांना असलेली टेन्शन्स, वैताग, समज-गैरसमज या सगळ्यातून ही मोठी माणसं भांडतात.
कधीतरी मोठी माणसं 'इगो बॅटल'मध्ये अडकतात. माहितीये ना म्हणजे काय ते... कोण बरोबर, कोण चूक? कोण काय विसरलं? कुणी काय म्हटलं? त्यामुळे कुणाला कसं आणि किती वाईट वाटलं, वगैरे वगैरे… खरंतर या गोष्टी छोट्या असतात, पण मोठ्यांना त्या खूप मोठ्ठ्या वाटतात आणि मग त्यावरुन त्यांची भांडणं होतात. पण ही भांडणं सोडवायला जाणं ही मुलांची जबाबदारी नसते, हे विसरु नकोस.
आईबाबा भांडायला लागले, की तुला भीती वाटणार, तुझ्या छातीत धडधडणार. हातपाय गार पडणार. पोटात भितीने खड्डा पडणार. अभ्यासाचं पुस्तक उघडं असलं तरी त्यातलं काहीच डोक्यात शिरणार नाही.. का माहितीये?- कारण तू मनातून घाबरलेली असतेस. पण मग असं झालं की आपण काय करायचं?

हेही वाचा

हाय, मी रुचिरा.. आता आपण भेटूया, दर रविवारी ! इथेच !

स्टेप बाय स्टेप सांगते.

१ - आईबाबा आपल्यामुळे भांडत नाहीत हे स्वतःला सतत सांगत राहायचं. मनातल्या मनात घोकायचं. एखाद्या कागदाच्या चिटोऱ्यावर ते लिहायचं. अधुनमधुन वाचायचं. अजिबात विसरायचं नाही.
२ - आईबाबांचं भांडण थांबतच नसेल तर उठून दुसऱ्या खोलीत जायचं. थोडी शांतता असेल अशा कोपऱ्यात जायचं. एखादं छान गाणं ऐक. गोष्टीचं पुस्तक वाच, किंवा चित्र काढत बस…असा एखादा कोपरा नसेल, तर तो तयार कर… त्याला तू तुझी ‘पीस स्पेस’ म्हणू शकतेस.
३ - दीर्घ श्वास घे. हे मी माझ्या मुलांनाही शिकवलं आहे. आपण घाबरलेले असतो तेव्हा आपला श्वास खूप फास्ट पळत असतो. अशावेळी शांत व्हायचं, खोल श्वास घ्यायचा म्हणजे आपलं मन आणि मेंदूही थाऱ्यावर येतो. मनातल्या मनात चार आकडे मोजत श्वास घ्या… आता दोन आकडे मोजत तो धरुन ठेव आणि सहा आकडे मोजत मोजत हळू हळू तो सोड. हे ५-१० वेळा कर … आता मनातल्या मनात एखादी छोटीशी आवडीची प्रार्थना असेल तर ती म्हण. हे केल्यावर तुला शांत वाटेल, स्ट्रॉंग वाटेल…
४ - आईबाबा शांत झाले की दोघांपैकी एकाशी बोल - ते भांडत असतील तेव्हा नको, पण शांत झाले की दोघांपैकी एकाशी नक्की बोल. 'तुम्ही भांडायला लागलात की मला भीती वाटते, हे त्यांना सांग. आपल्या रागाचा मुलांवर काय परिणाम होतो हे आईबाबांना नेहमीच कळत नाही, पण त्यांना कळलं तर ते स्वतःला नक्की बदलतात.
५ - दुसऱ्या मोठ्या माणसाशी बोल, आज्जीआजोबा? टीचर? काउन्सिलर? ज्या कुणाशी बोलणं सेफ वाटेल त्याच्याशी नक्की बोल. मनातला गोंधळ कमी होईल.
आणि आता मी माझ्या मुलांना सांगते ती अजून एक गोष्ट तुला सांगू?

तुझे आईबाबा एकमेकांशी भांडतात म्हणजे त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही असं नसतं… ते एकमेकांशी भांडतात म्हणजे त्यांचं आपल्या मुलांवर प्रेम नाही असंही अजिबात नसतं. आईबाबा कितीही चांगले असले तरी कधीतरी त्यांचं भांडण होणारच. घर, फॅमिली, आपण कुणीच कधीच पर्फेक्ट नसतो, पण पर्फेक्ट नसलो तरी आपलं प्रेम असतंच ना एकमेकांवर?!

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact