गावाकडे नेवून घरात बसवता.. मग कशाला जायचं गावाला?

Image: freepik

एखाद्या लॉंग वीकेंडला आपण गावी जाऊया असं बाबा म्हणाले… पण मला अजिबात जायचं नाहीये. तसं मी सांगणार आहे त्यांना. माहितिये का तुम्हाला, परवा… म्हणजे अगदी परवा नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत… काय झालं, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी फारच भुणभूण केली म्हणून बाबा म्हणाले की ठीके, आपण पण जाऊया गावाला. मी असला खूष झालो होतो मला वाटलं की आम्ही कुठेतरी मस्त फिरायला जाणार. पण आम्ही गेलो कुठे माहितिये? बाबांच्या गावाला!

मी 'गावाला जाऊया' म्हणलो ना, म्हणून म्हणे बाबांच्या गावाला जायचं ठरवलं. म्हणजे तसं गावाला जायला आवडलं मला. मस्त मोकळं ग्राऊंड होतं. पण आई तिथे मुलांमधे जाऊ देत नव्हती. नदी होती, पण बाबा म्हणे की 'मी असेन तेव्हाच जायचं पोहायला ' आता हे ऐकल्यावर बाकीची मुलं हसणारच ना मला, की एवढा मोठा झाला तरी बाबांशिवाय जात नाही म्हणून. मग काय, झालं आमचं भांडण. मग आई बाबा म्हणे, की याला कोणाशी जमवूनच घेता येत नाही. आजी काहीतरी आईला बोलली वाटतं 'एकटा असल्यामुळे लाडावला आहे तो तरी आम्ही सांगत होतो…' पुढचं काही ऐकू आलं नाही. मग जरा वेळाने आई बाहेर येऊन मला साॅलिड रागवली. म्हणे 'जा त्या गावंढळ पोरांच्यात! उंडारा! करा आयुष्याची माती! मला काय' मग बराच वेळ स्वतःशीच काहीतरी बोलत बसली. मी काय गेलो नाही. ती मुलं मला हसत होती तर मी कशाला जाऊ त्यांच्यात? बाबा गेले त्यांच्या कुठल्या कुठल्या मित्रांना भेटायला. 

मी आईला म्हटलं 'टी व्ही लाऊन दे' तर तिथे सारखी वीज जाते. वीजच जाते म्हटल्यावर बाबांच्या मोबाईलमधे गेम्सपण कोणी खेळू देईना. म्हणे बॅटरी उतरली तर? मग मला कंटाळा आला. मग त्यावरुन पण दोघं मलाच रागवले. आजी आईला रागवली. आई बाबांना रागवली. मग आम्ही परत आलो. मी म्हटलं ''मला फार बोअर झालं. आपण पुढच्या सुट्टीत दुसरीकडे जाऊ कुठेतरी '' बापरे! त्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी पार संपून गेली तरी दोघं मला रागवत होते. हे बरंय या दोघांचं! आधी कुठे जायचं नाही.गेलो तर बाबांच्या गावाला जायचं.

 हेही वाचा!

खरं म्हणजे आईचं गाव जास्त छान आहे. पण तिकडे बाबा येत नाहीत. आम्हीच दोघं जातो दिवाळीत. बाबांच्या गावाला गेलो तरी हे असं… ग्राऊंडवर जायचं नाही, पोहायला जायचं नाही म्हणे शेतात जाऊ 'शेतात जाऊन काय करायचं' असं विचारलं तर बाबा लगेच ''आपली माती, काळी आई' असलं काहीतरी सांगतात मग ते लहानपणी कसे तालुक्याला शिकायला होते. गावी यायचं तर बैलगाडीतून यायला लागायचं असं सांगायला लागतात. मग ते बैलगाडीतून जायचे म्हणून मलापण नेलं

बैलगाडीतून. मजा आली. खर्रच मजा आली. मी म्हटलोपण तसं. पण मला कळेना की आता जर का तिथे बस येते तर कशाला जायचं बैलगाडीतून??? तर लगेच ''आमच्या लहानपणी……. तुम्हाला किंमत नाही........'' असं सगळं सुरु होतं.

मी तर आता सांगून टाकलं आहे पुढच्या सुट्टीत मी कुठेतरी कॅम्पला नाहीतर ट्रेकलाच जाणार आहे. मला नाही आवडत त्यांच्याबरोबर गावी जायला! बाबा इतकं वर्णन करुन सांगतात की ते लहानपणी किती मजा करायचे. पण मला त्यातली काहीच मजा करु देत नाहीत. खेळ आणि नदी तर नाहीच, पण खोकला होईल म्हणून

चिंचा नाहीत, आजारी पडेन म्हणून बर्फाचा गोळा नाही.

Image: istock

मी एकट्याने डोंगरावर जायचं नाही आणि बाबांना तिथे गेल्यावर कधीच वेळ नसतो. शेळ्यामेंढ्यांना हात लावायचा नाही कारण त्या घाणेरड्या असतात. इथे जसं सुट्टीत दिवसभर घरी बसतो तसं तिथेपण दिवसभर घरी बसायचं. शिवाय तिथे टी व्ही नाही, काँप्युटर नाही, मोबाईलला चांगली रेंज नाही. मग दिवसभर घरीच बसायचं, तर मी इथेच बसतो ना! गावाला कशाला जायला पाहिजे त्यासाठी? त्यामुळे मी आता नाहीच जाणार त्यांच्याबरोबर गावाला. ओरडू देत काय ओरडणार असतील ते!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact