मी मोठा झालोय की लहानच आहे? आई-बाबा एकदाचं ठरवत का नाही

 

हाय ऊर्जा… मला असा प्रश्न पडला आहे, की आपण लहान आहोत का मोठे हे आईबाबा कशावरून ठरवतात? म्हणजे जेव्हा त्यांना आपल्याला काहीतरी काम सांगायचं असतं तेव्हा आपण मोठे असतो. पण जेव्हा आपण आपल्याला पाहिजे ते करायचं म्हणतो तेव्हा मात्र ते म्हणतात की “तू अजून लहान आहेस. तुला काही कळत नाही.” असं कसं? याला काय अर्थ आहे?

सौरभ जोशी, आठवी, नागपूर

 

हाय सौरभ!

तुला पडलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. आपल्या वयाच्या मुलांना हे आईबाबा लोक्स असंच करतात. कधीतरी म्हणतात, “एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही तुला? तू काय लहान आहेस का आता?” आणि मग लग्गेच एक तासात म्हणतात, “तू मध्ये बोलू नकोस. तू अजून लहान आहेस.” अरे याला काय अर्थ आहे? ते असं करतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपले आईबाबा त्यांना सोयीचं असेल तेव्हा आपल्याला मोठं म्हणतात आणि त्यांना सोयीचं नसेल तेव्हा आपल्याला लहान म्हणतात. आणि ते आपल्याशी चीटिंग करतात.

हेही वाचा!

आई-बाबा भावंडांमध्ये मोठ्यांनाच का रागवतात? लहानांना का नाही?

पण आपली चिडचिड जरा कमी झाल्यावर आपण जर शांतपणे विचार केला ना, तर आपल्याला असं लक्षात येतं, की ते असं का करतात.

काय असतं ना, साधारण १० ते १६ वर्षं या वयात ना आपण काही गोष्टी करण्याइतके खरंच मोठे झालेले असतो. पण काही गोष्टी करायला आपण लहान असतो. असं का? तर त्या वयात आपण ‘मोठे झालेले’ नसतो, तर ‘मोठे होत’ असतो.

म्हणजे कसं, की स्वतःची कामं करायची, घरातल्या कामांमध्ये मदत करायची, आपला अभ्यास, शाळेतले प्रकल्प हे सगळं वेळच्यावेळी पूर्ण करायचं हे करण्याएवढे आपण मोठे असतो. आपल्या आजूबाजूचे रस्ते आणि रहदारी बघून काही वेळा आपले आपण एकटे शाळेत जाण्यायेण्याएवढे मोठे झालेले असतो. पण, मोठ्या माणसांच्या जगात, दोन मोठ्या माणसांमध्ये काय बोलणं होतं, त्याचा अर्थ काय होतो, अश्या वेळी कोणी काय केलं पाहिजे याचा विचार करण्याइतके आपण मोठे झालेले नसतो.

आणि आपण जर खरंच विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आईबाबा आपल्याला ‘तू मोठा झाला आहेस’ असं कुठल्या बाबतीत म्हणतात? तर अश्या कामात जी आपली आपण सहज करू शकतो. आणि ‘तू अजून लहान आहेस’ असं कधी म्हणतात? तर आपण मोठ्या माणसांमधल्या नात्यांबाबत बोलतो तेव्हा!

अजून नाही पटलं? तुझ्या आजूबाजूच्या एखाद्या तुझ्याहून छोट्या मुलाचा विचार कर बरं. समजा एखादा सहा वर्षांचा मुलगा असेल, तर तो आपल्या आपल्या हाताने जेवण्याइतका मोठा झालेला असतो. तो जर का ‘मला भरव’ म्हंटला, तर त्याचे आईबाबा काय म्हणतील? की “तू आता मोठा झाला आहेस. तू आपल्या आपल्या हाताने जेऊ शकतोस.” पण तो जर म्हणाला, “मी आता मोठा झालोय. तर मी एकटा सायकलवरून शाळेत जातो.” तर ते काय म्हणतील? की “अरे तू अजून लहान आहेस.” असं होईल की नाही?

आपल्याही बाबतीत असंच होतं. आपण काही बाबतीत लहान असतो आणि काही बाबतीत मोठे!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact