
आई बाबा कधी पण मोठ्या बहिण भावाना का बर रागावता ,चुकी छोटे करतात तरी पण? म्हणतात की तुम्ही मोठे आहात.
आचल नागरे ७वी, लिट्ल एंजल्स स्कूल, औरंगाबाद
हाय आचल… ‘छोटे भाऊ बहिणी चुका करतात आणि ओरडा मात्र मोठ्यांना खावा लागतो’ ही इतक्या म्हणजे इतक्या मोठ्या भावंडांची तक्रार असते ना, की बास! सगळ्या ताईदादांना कायम असंच वाटत असतं. ताईदादा लोकांची अजून एक तक्रार काय असते माहितीये? ते म्हणतात, “आम्ही आमच्या छोट्या भावाला किंवा बहिणीला खेळतांना नुसतं रागावलो तरी ते मोठ्या मोठ्याने रडतात. इतके जोरात रडतात की आईबाबांना वाटतं, की आम्ही त्यांना मारलं असेल.” किंवा एखादा खेळ छोट्या मुलांना येत नाही. म्हणून या छोट्यांना सांगितलं, की तुम्हाला या खेळात घेणार नाही, तरीपण ते मोठ्याने रडतात किंवा आरडाओरडा करतात. मग आईबाबा म्हणतात की “घे की त्याला / तिला खेळायला. एवढा काय खेळ बिघडणार आहे तुमचा?” किंवा ताईदादा जिथे जातील तिथे सगळीकडे या छोट्यांना त्यांच्याबरोबर जायचं असतं. आणि त्यांना जरा नाही म्हंटलं की ते आईबाबांकडे तक्रार करतात. छोटी भावंडं म्हणजे काही बाबतीत नुसता डोक्याला ताप असतात. त्यांच्यामुळे आम्हाला रागावतात. असं वाटतं, हो ना?
हेही वाचा!
https://urjaa.online/what-are-the-kids-stressed-about-what-is-childhood-stress/
असं का होतं? आईबाबा मोठ्यांना का रागावतात? त्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण असं, की तुमची लहान भावंडं खरंच लहान असतात आणि त्यांना रागावून काहीच उपयोग होणार नसतो. तुम्ही जेव्हा त्यांच्याइतके लहान होता, तेव्हा तुमचे आईबाबा तुम्हालापण रागवायचे नाही.
दुसरं कारण काय असतं सांगू? तुम्हाला ते अजिबात आवडणार नाही. अजिबात पटणार नाही. पण प्रामाणिकपणे खरं खरं सांगा बरं… निदान अर्ध्या वेळेला तरी तुम्ही छोट्यांची काहीतरी खोडी काढलेली असते की नाही? खरं खरं सांगायचं हां! तुम्ही काय इतकेच्या इतके शहाणे आहात का, की तुम्ही एकदाही छोट्या भावाला / बहिणीला त्रास दिलेला नाही. त्याची खोडी काढलेली नाही. त्याला कामं सांगितलेली नाहीत. असं नसतं. तुम्हीही पूर्वी असं काहीतरी केलेलं असतं. ते आईबाबांना माहिती असतं. त्यामुळे त्यांना असं वाटू शकतं की याहीवेळी तुम्हीच काहीतरी खोडी काढली असेल.
तिसरी गोष्ट अशी की तुमची लहान भावंडं तुम्हाला कुठल्याच बाबतीत पुरी पडत नाहीत. तुम्ही त्यांच्यापेक्षा बुद्धीने, अनुभवाने, ताकदीने मोठे असता. आणि हे छोट्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते कांगावा करतात. पण जसे हे छोटे थोडे मोठे होतील, तसे हे सगळे विषय हळूहळू मागे पडतात. मग आईबाबा त्यांनासुद्धा सांगतात, “तू काही इतका लहान नाहीयेस. कशाला ताईला त्रास देतोस?”
पण याचा अर्थ आत्ता आईबाबा तुम्हाला जे रागवतात ते प्रत्येक वेळी बरोबर असतं का? तर नाही. कधीकधी आईबाबांचंही चुकू शकतं. मग काय करायचं? तर सोडून द्यायचं. कारण अश्या आपल्याही अनेक चुका आईबाबा सोडून देतच असतात ना!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


