
Image: freepik
मला ना, फार भीती वाटते. खरंच कधीकधी फार भीती वाटते. उशीत तोंड खुपसून जोरजोरात रडावंसं वाटतं. अंधार करून बसावंसं वाटतं. खोलीतून बाहेर यायलाच नको असं वाटतं. काही वेळा शाळेतून घरी जायला नको असं वाटतं. कारण माझे मम्मी पप्पा सारखे भांडत असतात. कधी कधी पप्पा ऑफिसमधून दमून आलेले असतात. कधीकधी आजी मम्मीला काहीतरी वेडंवाकडं बोलते. आणि मग थोडंसं काही तरी कारण काढून मम्मी पप्पांचं भांडण होतं.
असं भांडण झालं, की मम्मी जोरजोरात भांडी आपटत स्वयंपाक करते. आणि पप्पा रागारागात बाहेर निघून जातात. कधी कधी ते “कुठेतरी जाऊन जीव देतो म्हणजे बरं वाटेल तुला.” असं म्हणतात. मग मला फार भीती वाटते. ते खरंच तसं करतील का? मला माझे पप्पा फार आवडतात. त्यामुळे ते असं म्हंटले की मला फार रडू येतं. पण त्यांना ‘नका जाऊ.’ म्हंटलं तरी मलाच बोलणी बसतात. मोठी माणसं बोलत असतांना लहान मुलांनी बोलायचं नसतं, असं म्हणून मलाच सगळे ओरडतात.
हेही वाचा!
अशा वेळी मग माझा अभ्यास होत नाही. कधी कधी तर गृहपाठ पण पूर्ण करता येत नाही. मग शाळेतील सर त्यावरून रागावतात. त्यांना असंपण सांगू शकत नाही, की अभ्यास का नाही केला. शाळेत कुठल्या मैत्रिणीला पण सांगता येत नाही. नाही तर घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना सांगितल्या म्हणून पुन्हा मलाच मारतील.
मला मम्मी खूप आवडते. ती खूप चांगली आहे. पप्पा पण खूप आवडतात. मग ते दोघं असे का भांडतात? मोठी माणसं लहान मुलांना सांगतात की सारखं सारखं भांडू नये. मग ते स्वतः कशाला असे भांडतात? त्यांना प्लीज कोणीतरी सांगेल का? असे भांडू नका म्हणून?
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact