मी मुलगा आहे तर मी कसंही वागेन! मुलग्यांसाठी कुठे नियम असतात का?

– डॉ. वैशाली देशमुख

 Image: freepik

हार्दिक खेळून आला. आईनं दार उघडल्यावर त्यानं ‘हाय आई!’ असं म्हणून तिला घामट अंगानं थेट मिठीच मारली. आईचा एकदम तोल गेला आणि ती ओरडली, ‘अरे हळू जरा, किती मस्ती करतोस हार्दिक! धसमुसळेपणा नुसता!’

परवा त्यानं सहज त्याच्या छोट्या बहिणीला टपली मारली , तर तिनं भोकाड पसरलं.

‘मी काय केलंय? साधी टपली तर मारली! उगाच ओरडते ही.’ आठवीतला हार्दिक हा खेळाडू आहे, तो बास्केटबॉल खेळतो. सध्या त्याची उंची वाढायला लागली आहे आणि तो आईहून उंच झाला आहे. त्याची ताकद वाढली आहे, पण त्याच्या ते लक्षातच येत नाही. त्यानं सहज गमतीत धक्का मारला तरी लोकांचा तोल जातो. मग सगळे त्याला ओरडतात. ‘धसमुसळा, मस्तीखोर, आडदांड’ असं काही ना काही त्याला आई, आजी, बाबा म्हणत असतात. शाळेतून घरी आला आणि कुठेतरी बँडेज केलेलं दिसलं की आई विचारते, ‘आज काय उद्योग करून आला आहेस? मारामारी वगैरे केलीस का?’ कारण मधल्या सुट्टीत डबा खायचा सोडून या मुलांची कुस्ती चालू असते हे तिला माहिती झालंय.

हेही वाचा!

संमतीशिवाय स्पर्श नाहीच!

 परवा तर कहरच झाला.  हार्दिकच्या वर्गातल्या शमानं टीचरकडे तक्रार केली त्याच्याविरुद्ध. ती त्याला पेन देत नव्हती तर त्यानं तिचा हात पिरगळून ते काढून घेतलं. मग टीचरनी शिकवायचं थांबवलं आणि त्या म्हणाल्या, ‘मला वाटतं आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपले हक्क काय हे सगळ्यांना माहिती असतं, हो ना? पण जेव्हा तुम्ही इतरांना स्पर्श करता तेव्हा मात्र त्यात तुम्ही एकटे नसता, अशा वेळी तो फक्त तुमचा हक्क रहात नाही. त्या दुसऱ्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कुणालाही हात लावताना स्वत:ला विचारा, त्या व्यक्तीची त्यासाठी संमती आहे ना? सरसकट त्यांची संमती गृहीत धरणं, त्यांना मान्य असेलच असं समजणं बरोबर आहे का?’ मुलांनी ‘नाही’ अशा माना हलवल्या.

‘हार्दिक, तुम्हा मुलांना याबाबतीत जास्त काळजी घ्यायला हवी. आता तुमचे स्नायू बळकट होतायत, तुमची शक्ती वाढतेय. आपण दुसऱ्याला दुखवतोय हे तुमच्या लक्षात येत नाही. मस्ती करणं हा आपला हक्क आहे असं तुम्हांला वाटतं. ‘मी मुलगा आहे ना, म्हणून मी असा आहे.’ असं तुमचं म्हणणं असतं. पण मुलगा असणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं नव्हे. तुमच्या शक्तीचा नीट वापरही करता येतो. इतरांना आदर देण्यात खरी मर्दानगी आहे.

 Image: freepik

शाळा सुटल्यावर कुणी न सांगताच हार्दिक शमाला सॉरी म्हणाला. 

(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)

vrdesh06@gmail.com

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया.. 

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact