आई-बाबा मनासारखे कपडेच घालू देत नाही, सतत ऑब्जेक्शन घेतात!

साधारण ६वी किंवा ७वी मध्ये मुलं गेली की त्यांचे आणि आईवडिलांचे रोजच वादविवाद सुरु होतात. त्याचे विषय खूप असतात. पण त्यातला एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे कपडे!

image : iStock

खरं म्हणजे कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असायला पाहिजे. पण तसं होत नाही. मुलांना जे कपडे घालावेसे वाटतात ते त्यांच्या आईवडिलांना ऑलमोस्ट कधीच आवडत नाहीत. मुलांना जे कपडे ‘ट्रेंडी आणि फॅशनेबल’ वाटतात ते त्यांच्या आईवडिलांना ‘घट्ट आणि छपरी’ वाटतात. मुलांना जे कपडे ‘रिलॅक्स्ड आणि कॅज्युअल’ वाटतात ते आईवडिलांना ‘गबाळे’ वाटतात. त्यात शिवाय ‘आपल्या घरात हे चालत नाही.’ किंवा ‘आपल्या गावात हे घालू नकोस.’ असंही काय काय असतंच. त्याचा तर फार फार वैताग येतो मुलांना. पण तसं बोलता येत नाही. नाही तर ‘आगाऊ’ झाल्याचा शिक्का बसतो लगेच!

 

हेही वाचा!

सहावी-सातवीतल्या मुलींच्या छातीचा आकार वाढतो, तेव्हा…

image : freepik

बरं यात मुलांच्या बाजूने बोलावं, तर त्यांनीही कपड्यांचा काही फार विचार केलेला असतो असं नाही. ते सुद्धा कुठल्या हिरोने कुठल्या सिनेमात काय घातलं, कुठल्या हिरोईनची स्टाईल चांगली आहे, सध्या काय फॅशनमध्ये आहे असल्याचं गोष्टी बघून कपडे निवडत असतात.

 

एकीकडे संस्कार, संस्कृती, लोक काय म्हणतील, ते चांगलं वाटणार नाही असं आईवडिलांचं म्हणणं तर दुसरीकडे फॅशन, पिक्चर, हिरो, हिरोईन, रील्स असं मुलांचं म्हणणं यात कपड्यांचा जो विचार खरं म्हणजे केला पाहिजे तो कोणीच करत नाही. आणि तो विचार म्हणजे कम्फर्ट… आपली सोय… सुटसुटीतपणा…

आपण जे कपडे घालतो ते मुळात आपल्याला सोयीस्कर वाटले पाहिजेत. त्याचं कापड, त्याचं डिझाईन, त्याची फॅशन ही आपल्या सोयीची, हालचालीला अडचण न करणारी, ऋतूला साजेशी अशी असली पाहिजे ना? ऐन उन्हाळ्यातल्या लग्नात चकचकीत सिंथेटिक उकडणारे कपडे घालणं आणि ऐन दिवाळीतल्या थंडीत स्लीव्हलेस कपडे घालणं यात काय अर्थ आहे बरं?

कुठल्याही वेळी कपडे निवडण्याचं सिक्रेट काय असतं माहितीये? तर ते कपडे घालणं आपल्याला सोयीचं वाटलं पाहिजे. त्या कपड्यात आपण कम्फर्टेबल असलो पाहिजे. कारण जे कपडे आपल्याला कम्फर्टेबल वाटतात, ते आपल्याला चांगले दिसतातच. करून बघा एकदा!

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया.. 

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 91120505500

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact