पण का?
- डॉ. कल्पना सांगळे
बालरोग तज्ज्ञ, पुणे

काल डब्यात भाजी-पोळी नेली ना?- मग आज मला नूडल्स हवेत!. मिळतात का? - नाही! रात्री दहा वाजून गेलेत, तरी मला अजून थोडावेळ टीव्ही बघायचाय. चालतं का? - नाही. हिरवा चारा बकरी खाते, मी का पालक खाऊ ?- असा आईशी वाद घातला. आई ऐकते का? - नाही.
आज गणिताच्या पिरियडला बंक मारून बाहेर खेळायला जावंसं वाटतंय. शाळेत परवानगी मिळते का ? - बापरे, नाही! संध्याकाळी बाहेर खेळायला जाण्यापेक्षा समजा, घरी बसून खेळले थोडावेळ व्हिडिओ गेम्स तर काय असं बिघडतं , हो ना? - पण घरी कुणाला पटतं का हे ? - नाही.
रात्र झाली की झोप येत नसली तरी झोपलंच पाहिजे हा खरं म्हणजे किती वेडेपणा आहे! - पण असं ऑर्ग्यू करायला गेलं तर घरात ऐकतं का कुणी ? - बिलकुल नाही. शाळा असते तेव्हा उठायला लागतंच सकाळी. मग सुट्टी असताना समजा मस्त पांघरून घेऊन झोपलं दहा वाजेपर्यंत. चालतं का असं ? - नाही.
शाळेतून घरी आल्यावर खूप भूक लागलेली असते. इतकी भूक लागलेली असताना बिस्किटांचा एक अख्खा पुडा गरम गरम चहात बुडवून खायला किती मजा येईल. पण असं अलाऊड असतं का?- छे छे, अजिबातच नाही!
हेही वाचा!
एक चांगली व्यक्ती होण्यासाठी काय करावं लागेल?
ते ताट घ्या. सगळ्यांबरोबर जेवायला बसा. हळूहळू सावकाश जेवत राहा. जेवतच राहा. एक घास म्हणे बत्तीस वेळा चावून खा. किती टाईम्पास आहे हा! त्यापेक्षा पटापट जेवलं तर पाच मिनिटात जेवून होतं. काय प्रॉब्लेम आहे असं केलं तर? - पण घरात असं म्हटलं तर कुणी ऐकून घेईल का? - ना. ही.
मोठी सुट्टी कधी असते? - मे महिन्यात! मग बाहेर जाऊन खेळणार कधी ? मे महिन्यात. त्यावेळी बाहेर काय असतं ?- खूप म्हणजे प्रचंडच ऊन. आता उन्हाळ्यात ऊन असणारच ना! - पण दुपारी क्रिकेट खेळायला जातो म्हटलं की उत्तर ठरलेलं असतं - नाही. काही चक्करबिक्कर येत नसते उन्हात खेळून. पण आईला कितीही प्रेमाने विचारा, आई जाऊ का खेळायला? ती म्हणते, नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मज्जा करण्याशी घरच्यांची का इतकी खुन्नस असेल? बर्फ़ाचा गारेगार लाल-निळा-हिरवा गोळा खावा, थंडगार आईस्क्रीम खावं असं कधी वाटणार ? - उन्हाळ्यातच की नाही? करेक्ट! विचारून पाहा एकदा घरात... काय उत्तर मिळतं ? - नाही.
हे असं होतं ना सारखं ?
मोठी माणसं सारखी 'नको. नाही. आत्ता नको. कधीच नको...' या मोडमध्ये का असतात?
तेच समजून घेऊया या कॉलममध्ये. कॉलमचं नावच बघा किती भारीये : '... पण का?'
kalpana_sangale@yahoo.co.in
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


