
घरातले सगळे मला म्हणतात, ‘मोठेपणी कोण व्हायचं ते तुझं तू ठरव, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू एक चांगली माणूस हो!’ पण चांगली व्यक्ती व्हायचं म्हणजे नक्की काय? चांगली व्यक्ती होण्यासाठी मला काय करावं लागेल? - आराध्या गोंदल, छत्रपती संभाजी नगर
आपल्याला रोज कितीतरी प्रकारची माणसं भेटतात. त्यातली काही माणसं आपल्याला अजिबात आवडत नाहीत आणि काही माणसं मात्र अगदी पहिल्या भेटीत आपल्याला आवडतात. आईबाबाही त्यांना भेटल्यावर म्हणतात, किती चांगली माणसं आहेत ती… हो ना?
तर आता तुझा प्रश्न, चांगली व्यक्ती व्हायचं म्हणजे काय करायचं? सोपं आहे. आपल्याला त्रास देणारी, आपल्याशी खोटं बोलणारी, वागणारी माणसं आपल्याला आवडतात का? त्यांना आपण चांगली माणसं म्हणतो का? नाही! मग आपल्या आजूबाजूला जी चांगली माणसं असतात त्यांचं निरिक्षण करायचं. ती कशी वागतात? बोलतात? कशी सगळ्यांना मदत करतात? ते बघायचं आणि आपणही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करायचा.
आपण नेहमी सगळ्यांना आपल्याला जमेल तेवढी, जमेल तशी मदत करावी. कुणाशी खोटं बोलू नये. सगळ्यांचा आदर करावा. एखाद्या वेळी कुणाला मदत करणं शक्य नसेल तर ते का शक्य नाहीये हे खरं खरं सांगावं. कुणाला फसवू नये. कुणाचं वाईट चिंतू नये. शिस्तशीर वागावं. हे झालं आपण इतरांशी वागताना काय करतो, कस वागतो त्याबद्दल.
पण समाजात वावरतानाही आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर आपण आपली जबाबदारी, कर्तव्य लक्षात ठेवायला हवीत. बाहेर वावरताना नियम पाळायला हवेत. समजा तू रस्त्याने गाडी चालवत जाते आहेस आणि लाल सिग्नल बघून तू थांबली नाहीस आणि तुझ्या गाडीमुळे कुणाचा अपघात झाला तर तुला चांगली माणूस म्हणतील का बाकीचे? नाही! म्हणजे समाजात वावरताना आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर आपण नियम पाळायला हवेत.
याशिवाय तू निरिक्षण करुन तुला चांगली व्यक्ती म्हणजे कसं व्हावंसं वाटतं, याचा विचार कर आणि मला कळव, मी वाट बघते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


