पण का?
- डॉ. कल्पना सांगळे,
बालरोगतज्ज्ञ, पुणे

माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या लहान मुलांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. घरचं खा म्हटलं की ती नाक मुरडतात आणि बाहेरचं मात्र रोज, कितीही दिलं तरी त्यांना हवं असतं. ही माझी नाही त्यांच्या आईबाबांची तक्रार असते.
तुमच्या डॉक्टर काकांकडे किंवा मावशीकडे गेल्यावर तुमच्या आईबाबांची हीच तक्रार असते? - मग मी आणि मीरा परवा काय बोललो ते जरा तुम्हीही वाचाच!
मीरा - डॉक्टर मावशी, मला ना कंटाळा आलाय रोज आईबाबांचं लेक्चर ऐकून. मला नाही आवडत पोळी भाजी, मला उसळी नको आहेत. कोशिंबिरी का खायच्या मी रोज? आईबाबांना हे का कळत नाही? का सारखे त्यावरुन लेक्चर देतात?
मी - अगं? कसलं लेक्चर? चांगलं, हेल्दी, पौष्टिक खाल्लं नाही की आजारी पडतेस आणि मग इकडे यायला लागतं तुला माझ्याकडे. हेल्दी म्हणजे सकस, चौरस, घरी केलेलं जेवण… ते जेवलं की आपल्याला शक्ती येते. ऊर्जा मिळते.
मीरा - पण मी तरी कुठे सारखी सारखी आजारी पडते? मी हेल्दी नाही खाल्लं तरी बरी आहे की मी.
हेही वाचा!
नो, नाय, नेव्हर! आई बाबांना काहीही विचारा त्याचं उत्तर हेच का?
मी - सारखी सारखी आजारी नसशील पडत, पण शाळेत शिकवतात त्याकडे लक्ष लागतं का? पाठांतर नीट होतं का? मेंदूला अभ्यास करायला आवडतो का तुझ्या? ग्राऊंडवर खेळलीस की किती पटकन दमतेस? सांग बरं तूच खरंखरं…
मीरा - पण अभ्यास, पाठांतराचा आणि हेल्दी खाण्याचा काय संबंध?
मी - अगं, आपल्या शरीराच्या वाढीसाठी लागतात ते सगळे पोषक घटक घरच्या ताज्या चौरस जेवणातून आपल्याला मिळतात. उसळी, धान्य, भाज्या, कोशिंबिरी, फळं या गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात. ती ऊर्जा आपल्या शरीरातले बिघाड दुरुस्त करण्याचं कामही करते. चांगलं खाल्लं प्यायलं की आपला मेंदू तल्लख राहतो. मग अभ्यासाचा कंटाळा येत नाही. पाठांतर छान होतं. आपला मेंदूही योग्य विचार करतो. सकस अन्न आपल्या पोटाची म्हणजे पचन संस्थेची काळजी घेतं. तिच्यावर जास्त ताण येणार नाही ना हे बघतं. पोटातले good bacteria वाढले की आपण आपोआप आजारांपासून लांब राहातो.
मीरा - पण मग सकस अन्न म्हणजे काय?
मी- घरी आईबाबा, आजी, स्वयंपाकाला येणाऱ्या मावशी जे करतात ते सगळं सकस… वरणभात, पोळीभाजी, इडली, डोसे, खिचडी. पराठे. उसळी. कोशिंबिरी. याच्या जोडीला फळं, ड्रायफ्रूट्स खाल्ली तर अजूनच छान! दूध-दही-ताकही सकस. त्या त्या मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या तर खाल्ल्याच पाहिजेत. टेट्रापॅकमधले ज्यूस, रेडी टु कुक नूडल्स, बेकरी आणि स्वीट्सचे प्रोसेस्ड खाऊ हेल्दी नाही हे तुला शाळेत शिकवलं असेलच?
मीरा - हो , पण कधीतरी तरी बाहेर खाल्लं तर चालतं ना?
मी - हो, महिनाभर रोज न कुरकुरता घरी केलेलं सगळं शहाण्यासारखं खाल्लं, डब्यातली पोळीभाजी, पोहे, उपमा, पराठे रोजच्या रोज पोटात जाऊन संपले तर महिन्यातून एखाद्या वेळी बाहेर चांगल्या ठिकाणी खाल्लं तर चालेल, पण नो स्ट्रीट फूड!
मी हे म्हणताच मीरा आनंदली आणि तिच्याबरोबर आलेल्या आईबाबांनीही सुटकेचा निश्वास सोडला, तो वेगळाच!
kalpana_sangale@yahoo.co.in
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


