
हाय ऊर्जा, मी सहावीत आहे. माझी एक मैत्रीण आहे. ती माझी पहिलीपासूनची मैत्रीण आहे. पण यावर्षी आमच्या शाळेत एक नवीन मुलगी आली. आणि ती आल्यापासून माझी मैत्रीण तिच्याशी जास्त बोलते. तिच्याशेजारी बसते. ती मुलगी रोज शाळेत वेगवेगळे रबरबँड, खोडरबर, पेन्सिल असलं सगळं आणते. आणि माझ्या मैत्रिणीला ते आवडतं म्हणून ती तिच्याशी बोलते. मला त्या नवीन मुलीशी भांडावंसं वाटतं आहे. तिने माझी मैत्रीण अशी घेऊन टाकली हे बरोबर आहे का? आणि आता मला माझ्या मैत्रिणीशी पण बोलायचं नाहीये. आता मलाच तिची मैत्री तोडावीशी वाटते आहे.
सारिका उनकुले
हाय सारिका,
तुझी मैत्रीण तुला सोडून नवीन मुलीशी जास्त बोलते म्हणून तुला वाईट वाटतंय ना? मला अगदी समजू शकतं. आपली मैत्रीण आपल्याशी सोडून दुसऱ्या कोणाशी तरी मैत्री करते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं, रडू येतं आणि रागपण येतो. कारण आपल्याला असं वाटत असतं की आपल्या मैत्रिणीने इतर कोणाशी आपल्यासारखी घट्ट मैत्री करू नये. तुझ्या मैत्रिणीने तुझ्याशी बोलणं कमी केलं हे तिचं वागणं चुकलं आहे. पण तरीसुद्धा तू तिच्याशी मैत्री तोडावीस असं काही मला वाटत नाही. किती झालं तरी ती तुझी पहिलीपासूनची मैत्रीण आहे. हो की नाही? आणि मैत्रीण म्हंटलं की भांडणं होतातच. आणि छोट्या छोट्या भांडणावरून अशी मैत्री तोडणं तरी बरोबर आहे का? सांग बरं? आपली मैत्रीण आहे. थोडीशी चुकली तर तिला समजावून सांगायचं आणि माफ करून टाकायचं. त्यालाच तर मैत्री म्हणतात ना?
हेही वाचा!
मोठी माणसं चुकत असतील तर लहान मुलं त्यांना कसं समजावून् सांगणार?
दुसरं म्हणजे तुला असं वाटतंय की ती नवीन मुलीने आणलेल्या वस्तूंमुळे तिच्याशी जास्त बोलते. तसं असूही शकतं. काही जणींना अश्या छान छान नवीन गोष्टी फार जास्त आवडतात. पण तसं जरी असेल, तरी त्याचं आकर्षण फार थोडे दिवस टिकतं. हळूहळू त्यातली गंमत कमी होईल आणि तुझी मैत्रीण परत तुझ्याशी आधीसारखी बोलायला लागेल. तू फक्त आत्ता तिला सांभाळून घे.
शिवाय तुला एक सांगू का? असंही असू शकतं, की ती नवीन मुलगी कदाचित स्वभावाने छान असेल, अभ्यासात हुशार असेल, इतरांना मदत करणारी असेल आणि त्यामुळे त्या दोघींची मैत्री झाली असेल. तू त्या नवीन मुलीशी कधी बोलली आहेस का? कदाचित तुझीही तिच्याशी छान मैत्री होईल. तुला खरं सांगू का? एखाद्या मुलीची ना, एकापेक्षा जास्त मुलींशी पण घट्ट मैत्री असू शकते. इतकंच नाही, तर त्या सगळ्या मुलींचा मिळून एक मस्त मैत्रिणींचा ग्रूपसुद्धा असू शकतो. असंही होऊ शकतं की तू, तुझी मैत्रीण आणि ती नवीन मुलगी या तिघींचा छान ग्रुप तयार होईल. एकदा तिच्याशी बोलून तर बघ.
तुझी ऊर्जा.


