
Image: freepik
शमिका दिवसभर मैत्रिणीकडे खेळायला गेली होती. ती संध्याकाळी पाच वाजता सायकल घेऊन परत आली तर तिला एक सेकंद तिची सोसायटी ओळखूच येईना. गेटला खोट्या प्लॅस्टिकच्या मुलांची कमान लावलेली होती. सोसायटीतल्या ४ बिल्डिंग्जपैकी एका बिल्डिंगवर दिव्यांची माळ लावलेली होती. सगळ्या गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या होत्या. पार्किंगवर पूर्ण मांडव घातलेला होता. आणि कंपाऊंडच्या भिंतीला लागून स्पीकर्सची मोठी भिंत उभी केलेली होती.
“हे काय?” शमिकाला काही कळेचना. तिच्या नेहेमीच्या सायकल लावायच्या जागेवर केटरिंगवाल्या लोकांनी गॅस लावून पुऱ्या तळायला सुरुवात केलेली होती. शामिकाने मग कुठेतरी दुसऱ्या कोपऱ्यात कशीबशी तिची सायकल लावली आणि ती घरी गेली. आपल्या सोसायटीत हे काय चालू आहे ते तिला कोणालातरी विचारायचं होतं. पण आईबाबा दोघं घरी नव्हते. तिने शेजारच्या आजींकडून किल्ली घेऊन दार उघडलं. घरात येऊन जरा पाणी पिऊन ती थोडा वेळ बसली. मग शमिका गॅलरीत गेली.
हेही वाचा!
गॅलरीतून तिला सोसायटीत चालू असलेली सगळी तयारी दिसत होती. हळूहळू छान कपडे घातलेली माणसं यायला लागली. शांत आवाजात सनईचे सूर ऐकू यायला लागले. सगळ्या तयारीवरून कोणाच्या तरी घरी लग्न असणार हे शमिकाच्या लक्षात आलं.
“असू दे… आपल्याला काय करायचंय?” असं म्हणत शमिका तिच्या चिमण्यांच्या घरट्याकडे वळली.
तिने दोन महिन्यांपूर्वी चिमण्यांसाठी घरटी बांधण्याची एक कार्यशाळा अटेण्ड केली होती. तिथे तिला समजलं होतं, की पूर्वी सगळ्यांच्या घरात चिमण्या रहायच्या. पण आता मात्र वेगवेगळ्या कारणांनी चिमण्या घरात येत नाहीत. नवीन फ्लॅट्स मध्ये चिमण्यांना घर करायला जागा नसते. त्यांनी एखादा कोपरा शोधला तरी कचरा होतो म्हणून लोक त्यांचं घरटं पाडून टाकतात. शिवाय मोबाईल टॉवर्स मुळेही चिमण्या आता शहरात कमी येतात. शिवाय त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर तिने तिच्या गॅलरीत चिमण्यांसाठी पाणी तर ठेवायला सुरुवात केली होतीच, पण चिमण्यांना घरटं करण्यासाठी एक लाकडी खोक्याचा आडोसा पण तिने बनवला होता. आणि त्यात एका चिमणाचिमणीने त्यांचं घरटं केलं होतं. त्यांनी त्यात अंडी घातली होती आणि जेमतेम एक आठवड्यापूर्वी त्यातून दोन पिल्लं बाहेर आली होती.
शमिकाला स्टूलवर चढून ती पिल्लं बघता यायची. आणि पिल्लं किंवा चिमण्या डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी घेत शमिका पिल्लं बघायची. आत्ताही तिने पिल्लं बघायला स्टूल आणलं, ती स्टूलवर चढली आणि एकदम मोठ्याने म्युझिक सुरु झालं. आणि त्या आवाजाला घाबरून इतका वेळ घरट्याच्या जवळ आपापसात बोलत बसलेले चिमणाचिमणी घाबरून फर्रर्रर्र करून उडाले. त्यांची पिल्लं घाबरून चिवचिवायला लागली असणार. कारण शमिकाला ती त्यांची छोटुशी चोच उघडून ओरडतांना दिसत होती. पण त्यांच्या आईबाबांना ते ऐकू येत नव्हतं. ते बिचारे कसला आवाज आहे, आपल्या घरट्याला त्यातून काही धोका आहे का याचा अंदाज घेत घाबरून भिरभिरत होते. त्या आवाजाने त्यांचं घरटं आणि ते ठेवलेलं खोकं अक्षरशः हादरत होतं. त्यामुळे पिल्लं अजूनच घाबरली होती. शमिकाला ते दिसत होतं, पण ती त्या पिल्लांना किंवा त्यांच्या घाबरलेल्या आईबाबांना काहीच मदत करू शकत नव्हती.
त्या क्षणाला शमिकाला मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्यांचा प्रचंड राग आला. त्यांच्या घरी लग्न असेल तर त्यांनी खुशाल सेलिब्रेट करावं, पण त्यासाठी चिमण्यांना त्रास द्यायची काय गरज होती? आणि मग तिच्या एकदम लक्षात आलं की खालच्या मजल्यावर राहणाऱ्या वेदांतकडचं कुत्र्याचं पिल्लू पण घाबरलं असेल. ती घाईघाईने स्टुलावरून उतरली आणि दार लॉक करून खाली गेली. तर खरंच! वेदांत त्याच्या घरी नवीनच आणलेल्या छोट्या पिल्लाला शांत करायचा प्रयत्न करत होता. शमिकाने कुठेतरी वाचलं होतं की कुत्र्यांना माणसांच्या वीस पट जास्त ऐकू येतं. त्यांनी त्या पिल्लाला उचलून घेऊन, छातीशी धरून कसंबसं शांत केलं. मग वेदांतने त्याच्या छोटुश्या कानात कापूस घातला आणि वरून चक्क आईचा स्कार्फ त्याला बांधून टाकला. इतकं सगळं केल्यावर शेवटी ते पिल्लू शांत झालं.
आता काय करावं? शमिकाने आणि वेदांतने मिळून ठरवलं की आपण त्या लोकांना समजावून सांगू. लग्न ज्यांच्या घरी होतं, ते वेदांताच्या ओळखीचे होते. त्यामुळे तो शमिकाला म्हणाला, “तू पिल्लूपाशी थांब. मी त्यांना सांगून येतो.” असं म्हणून वेदांत गेला खरा, पण तो दहाच मिनिटात परत आला. त्याचं कोणीच काही ऐकून घेतलं नव्हतं. म्हणजे तो काय सांगतोय ते कोणाला ऐकूच गेलं नव्हतं.

Image: .freepik
हेही वाचा!

Image: .freepik
दोन मिनिटं शमिका आणि वेदांत हताशपणे एकमेकांसमोर बसून राहिले. पण पिल्लाची अस्वस्थता बघून त्यांना काही गप्प बसवेना. कारण आत्ता सुरु झालेला हा आवाज रात्री अकराच्या आधी थांबणार नाही हे त्यांना नक्की माहिती होतं. शिवाय प्रत्येकालाच एवढ्या मोठ्या आवाजाचा त्रास होणार होता. सोसायटीत लहान बाळं होती. आजूबाजूच्या सोसायटीत पण लोकांना त्रास झाला असता. “या मोठ्या माणसांना एवढं कसं कळत नाही? आम्ही खेळतांना थोडा मोठ्याने दंगा केला की आम्हाला लगेच रागवतात. मग हे कसा काय एवढा आवाज करतात?” बराच वेळ नुसती चिडचिड करून झाल्यावर शेवटी शमिकाला एक आयडिया सुचली. तिने वेदांतला विचारलं, “तुझ्याकडे कार्डशीट आणि मार्कर आहे का?” वेदांतकडे एक कार्डशीट आणि एक पुठ्ठा सापडला. त्यावर शमिका आणि त्याने काहीतरी चित्र काढायला घेतलं आणि काहीतरी लिहायला घेतलं.
शमिका आणि वेदांत चित्र काढून रंगवलेलं कार्डशीट हातात घेऊन डोक्यावर धरून मोर्चा काढल्यासारखे बाहेर पडले तेव्हा मोकळ्या जागेत खूप लोक नाचत होते. काहींनी खायला सुरुवात केली होती. अशात हे दोघं सगळ्यांच्या मधून थेट डीजे पर्यंत चालत गेले. त्यांच्या हातातल्या कार्डशीटवर लिहिलेलं होतं, “आवाज कमी कर डीजे तुला आईची शपथ आहे.”
ते शांतपणे, हळूहळू सगळ्यांना दिसेल असे मधून चालत गेले तसे लोक त्यांच्याकडे बघायला लागले. नाचणाऱ्यांनी नाच थांबवला. आणि शेवटी जेव्हा ते डीजेपर्यंत पोचले तेव्हा सगळे जण त्या दोघांकडे बघत होते.
शेवटी डीजेने गाणं थांबवलं. ज्यांच्या घरी लग्न होतं ते काका आले. त्यांना बघून वेदांत म्हणाला, “काका, प्लीज आवाज कमी करायला सांगा. माझ्या कुत्र्याच्या पिल्लाला खूप भीती वाटतेय.”
शमिका म्हणाली, “चिमण्या पण घाबरतायत खूप.”
आता यावर काय होणार हे कोणालाच कळत नसतांना शेजारच्या घरातून एक आजोबा बाहेर आले आणि म्हणाले, “शाब्बास! मी विचार करत होतो की आता यांना कोण समजावून सांगणार? कारण हे सगळे आता मोठे आहेत ना… पण मुलांनो आज तुम्ही शहाणपणा म्हणून त्यांच्यापेक्षा खूप मोठे ठरलात.” आणि मग ते डीजेला म्हणाले, “बघितलंस ना रे? आईची शपथ आहे तुला!”
डीजेने व्हॉल्युम कमी केला आणि गाणं लावलं, 'अभी तो पार्टी शुरू हुई है।'
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact