नदी डोंगरातून निघते समुद्राला मिळते. पण लुनी नदी मधेच कुठेतरी हरवते!

Image: tripoto

कोणत्याही खंडातला कोणताही देश असो,जगातलं कोणतंही राज्य, त्यातलं शहर असो किंवा जगाच्या कोपऱ्यातलं कोणला माहीत असण्याची शक्यताही नसलेलं एखादं छोटंसं गाव असो, त्यांचं अस्तित्त्व कोणत्या ना कोणत्या नदीशी, तिच्या उपनदीशी जोडलेलं असतं. निसर्गात नदीच नसती तर सजीव सृष्टी फुलू बहरुच शकली नसती. आज आपल्या देशात मोठ्या नद्यांसोबत  ४०० उपनद्या आहेत. या नद्यांमुळे प्रत्येक प्रदेशाला एक विशिष्ट ओळख मिळाली आहे. माणसं जशी दिसायला, वागा-बोलायला वेगळी असतात तशाच नद्यांचं देखील असतं. प्रत्येक नदीचं भलेही ती किती छोटी का असेना तिचं म्हणून एक वैशिष्ट्यं असतं. तिची स्वतंत्र ओळख असते. काही काही नद्या तर इतक्या विशिष्ट असतात की त्यांचं वैशिष्ट्यं ऐकणाऱ्यांसाठी आश्चर्य बनतं. आपल्याकडे अशा अनेक नद्या आहेत. त्यातली एक लुनी नदी. या नदीचं नाव ऐकलं आहे का तुम्ही? ही नदी आहे राजस्थानमधली.

हेही वाचा!

लुनी नदीचं वैशिष्ट्यं काय?

कोणत्याही नदीचा शेवट कुठे होतो  याचं उत्तर आपण झोपेतही देवू शकतो. नदीचा शेवट समुद्रात होतो,  हे आपण  अभ्यासाच्या पुस्तकात वाचलेलं असतं.  शिक्षकांनी आपल्या शिकवलेलं असतं किंवा घरातल्या मोठ्या माणसांनीही सांगितलेलं असतं. नद्यांचा उगम कोणत्यातरी डोंगरावर-पर्वतावर होतो आणि शेवट समुद्रात होतो हे सत्य आहे. पण लुनी नदी या सत्याला अपवाद आहे.  का माहितीये? - कारण लुनी नदी समुद्राला मिळत नाही. समुद्राला न भेटता ही लुनी नदी कुठे जात असेल बरं? हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. या प्रश्नाचं उत्तर मोठ रोचक आहे.

लुनी नदी जाते कुठे?

लुनी नदीचा उगम राजस्थानमधील अजमेर जिल्हातील ७७२मीटर उंचीवर असलेल्या अरवली पर्वतरांगेतील नागा डोंगरावर होतो. ही नदी अजमेरमधून बाहेर पडून पुढे दक्षिण-पूर्व या दिशेवरचा मार्ग पकडून राजस्थानमधील नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर, जालौर या जिल्ह्यांमध्ये वाहत जावून गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात प्रवेश करते. आणि कच्छमधील वाळवंटात ही नदी हरवून जाते. ती पुढे ना वाहात ना समुद्राला जावून भेटत. राजस्थान ते गुजरातमधील कच्छपर्यंत वाहणाऱ्या लुनी नदीची एकूण लांबी ४९५ कि.मी आहे तर राजस्थानमध्ये लुनी नदीची लांबी ३३० कि.मी आहे.

Image: tfiglobalnews

लुनी नदीचं आणखी एक वैशिष्ट्यं तिच्या चवीबद्दलही आहे. अजमेरवरुन निघालेल्या लुनी नदीचं पाणी पुढे १०० कि.मी. पर्यंत गोड असतं. या पाण्यावर राजस्थानमधल्या अनेक जिल्ह्यात शेतीही केली जाते. मात्र बाडमेर जिल्ह्यानंतर पुढे वहताना ही नदी खारट होते. पुढे गुजरातमधील कच्छमध्ये शिरल्यानंतर तर तिची चव खूपच खारट होते. याचं कारण वाळवंटातून वाहताना वाळूच्या कणातील मीठ या नदीच्या पाण्यात मिसळून गोड पाण्याची चव खारट होत जाते. तिच्या या खारट चवीमुळेच तिचं नावं लुनी असं पडलं आहे. लुनी हा शब्द संस्कृत भाषेतील लवणगिरी या शब्दापासून निर्माण झाला आहे. या शब्दाचा अर्थ  खाऱ्या पाण्याची नदी असा होतो. मिठडी, लीलडी, जवाई, सुकरी, बांडी, खारी, जोजारी या लुनी नदीच्या उपनद्या आहेत.   कच्छ जिल्ह्यात शिरल्यानंतर लुनी नदी सुकून जाते. याच कारणामुळे लुनी नदीची भेट समुद्राशी होत नाही.

कधीही समुद्राला न भेटणऱ्या या लुनी नदीचं सौंदर्य राजस्थानमध्ये पाहाण्यासारखं आहे. कधी राजस्थानला गेलात तर लुनी नदीचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवून तिला अवश्य पाहा. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact