आम्ही कशाला पेपर वाचू? पेपर वाचल्याने मुलांना मिळतं तरी काय?

'आजचा पेपर वाचलास का?' हा प्रश्न कानावर पडला की तुम्ही काय करता? मला माहितीये तुम्ही काय करत असाल ते... एकतर या प्रश्नाकडे तुम्ही सरळ दुर्लक्ष करत असणार किंवा मला दुसरं महत्त्वाचं काम होतं वगैरे थाप मारत असणार. थोड्या वेळाने वाचतो/वाचते असं सांगून वेळ मारुन नेत असणार किंवा मुलांनी कुठे पेपर वाचायचा असतो का? वगैरे म्हणून वाद घालत असमार... हो ना?
पेपर वाचणं हे महाभयंकर कंटाळवाणं काम आहे, असं तुम्हाला वाटतं... त्यापेक्षा शाळा आणि अभ्यास परवडला, असंही वाटतं. तुम्हालाही तसंच वाटतं? मग तुम्हाला एक बातमी सांगायलाच हवी. ही महत्त्वाची बातमीही मी पेपरमध्येच वाचली बरं का, जस्ट तुमच्या माहितीसाठी! तर बातमी अशी की कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने सगळ्या शाळांमध्ये मुलांनी रोज दहा मिनिटं पेपर वाचायचाच असा नियम केलाय. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर जेव्हा तिथल्या शाळा उघडतील तेव्हा मुलं शाळेत रोज दहा ते पंधरा मिनिटं पेपर वाचणार आहेत. प्रतिज्ञा आणि प्रार्थना झाली की मुलांकडून पेपर वाचून घेतला जाणार आहे.

हेही वाचा!

सुटीत पुस्तक वाचण्याचा एवढा आग्रह आई बाबा का करतात?

 

मुलं मोबाइलवर खूप वेळ घालवतात. सोशल मीडियावर रील्स वगैरे पाहतात. त्यामुळे मुलांना वाचनाची सवय राहिलेली नाही. अभ्यासातली एकाग्रता कमी झाली आहे. त्यांचं मैदानावर खेळणं कमी झालं आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. कर्नाटकमधील बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण विभागाला पत्र पाठवून हे कळवलं आणि रोज पेपर वाचण्याचा 'तास' असावा अशी विनंती केली. त्या माहितीतलं तथ्य लक्षात आल्यावर तिथल्या सरकारने हा नियम केला. आता सरकारनेच सक्ती केली आहे तर तिथली मुलं पेपर वाचतीलच. पण ही बातमी तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे मोबाईल, रील्स, अभ्यास नको वाटणं हे सगळं आपल्याही बाबतीत घडतंच आहे की... रोज पेपर वाचण्यामुळे हे सगळं कमी होणार असेल तर काय वाईट आहे?
आई बाबांनी, शाळेने किंवा सरकारने सक्ती करण्याआधीच आपण रोजचा पेपर वाचायला हवा. तशीही आता उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. उन्हं उतरल्याशिवाय घराबाहेर खेळायला जाता येत नाहीच, मग दुपारभर घरात बसून बोअर होण्यापेक्षा पेपर वाचला तर तो वेळ सत्कारणी लागेल, करताय ना मग सुरुवात?

रोजचा पेपर का वाचावा?
१. पेपर वाचल्यामुळे आपल्या माहितीत भर पडते. आपल्या शहरात, गावात, जगात कुठे काय सुरु आहे हे कळतं. आपण एकदम अपडेट राहातो.
२. आपलं सामान्य ज्ञान म्हणजे 'जीके' वाढतं. मग आपण सगळ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारु शकतो. मोठं झाल्यावर स्पर्धा परीक्षा देताना पेपर वाचण्याच्या सवयीचा खूप उपयोग होतो.
३. पेपरमध्ये वेगवेगळ्या विषयांची सविस्तर माहिती असते. आत्ता हेच बघा ना यंदाच्या पावसाळ्यात 'एल निनो' चा प्रभाव असणार अशी बातमी आहे. आता हे 'एल निनो' काय असतं ते तुम्हाला पेपर वाचला तरच कळणार आहे. उद्या भूगोलाच्या परीक्षेत उत्तरं लिहिताना किंवा एखादा निबंध लिहितानाही तुम्हाला या माहितीचा उपयोग करता येईल.
४. पेपर वाचल्यामुळे आपली भाषा सुधारते. नवनवीन शब्द माहिती होतात. आपली विचार करण्याची प्रक्रिया सुधारते. एकाग्रता वाढते. मनोरंजन होतं.
५. आता तुम्ही म्हणाल मोबाइलवरही बातम्या वाचायला मिळतात, ते खरं असलं तरी पेपर वाचताना जसं लक्ष एकाग्र होतं तसं मोबाइलवर वाचताना होत नाही. स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे शांतपणे न वाचता भरभर वाचलं जातं. ते वाचलेलं नंतर लक्षातही राहात नाही. पेपर वाचल्यामुळे आपली स्मरणशक्तीही सुधारते.

काय आणि कसं वाचावं?
१. वर्तमानपत्रात बातम्यांसोबतच प्रत्येक वयोगटाला वाचण्यासाठी काही ना काही असतंच. मुलांसाठी स्पेशल पानं असतात. आपल्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्रात आपल्या आवडीचं काय काय येतं हे शोधून ठेवा. रोजचा पेपर हातात घेतला की तिथून वाचायला सुरुवात करा. मग बातम्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी वाचा.
२. वर्तमानपतात राजकारण, गावात, शहरात, राज्यात, देशात, जगात जे घडतं त्याच्या बातम्या असतात. आपले आवडते खेळ, खेळाडू, पुस्तक, लेखक, सिनेमा, नाटक, कलाकार, चित्र, शिल्प या सगळ्यांबद्दल बातम्या आणि लेख असतात. म्हणजे तुमच्या आवडीचं काहीतरी तुम्हाला त्यात नक्की सापडेल.
३. तुमच्यासाठी कथा, कविता, चित्र, गाणी, कोडी असतात. पर्यावरण, जंगल, प्राणी, पक्षी यांच्या बातम्या आणि लेखही असतात.
४. रोज फक्त दहा मिनिटं पेपर वाचा. वाचण्याआधी अख्खा पेपर चाळा. आपल्याला आवडतील अशा गोष्टी सुरुवातील वाचा.
५. जे वाचलं त्याबद्दल घरातल्यांशी, मित्र मैत्रिणींशी बोला. घरातल्या मोठ्या माणसांना पेपरमध्ये त्यांना काय वाचायला आवडतं ते विचारा. ते काय वाचतात ते तुम्हीही कधीतरी वाचून पाहा.
६. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? पेपर वाचून आपण अपडेट राहिलो ना की आपल्या वागण्याबोलण्यात आपोआप कॉन्फिडन्स येतो. मग आपण स्मार्ट होतो. अशी कॉन्फिडन्ट आणि स्मार्ट मुलं कुणाला आवडणार नाहीत, सांगा बरं!
चला, आता नाही ना विचारणार, आम्ही कशाला पेपर वाचू?