
'किती तो टाइमपास. किती तो टीव्ही पाहायचा. थोडं पुस्तक हातात घ्या. वाचन करा' ही अशी वाक्यं तुमच्या नक्कीच ओळखीची असतील ना? या वाक्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देतात? म्हणजे कपाळावर आठ्या पडतात की लगेच आवडीने पुस्तक हातात धरुन वाचायला लागतात. अगदी खरं खरं सांगा. मला माहितीये अनेकजणांच्या कपाळावर आठ्याच पडत असतील. हे असं होतं कारण की आपल्याला पुस्तक वाचन म्हणजे अभ्यासाशी निगडित गोष्ट वाटते. वर्षभर अभ्यास केला ना मग आता सुट्यात कशाला पुस्तक बिस्तक वाचायचं असं वाटत असतं आपल्याला. पण तुम्हाला सांगू का ही पुस्तक वाचनाची सवय खरोखर खूप फायद्याची असते. सुटीत जेव्हा कंटाळा येतो त्यावर विरंगुळा म्हणून पुस्तक वाचणे ही फार आनंद देणारी गोष्ट असते. एकदा का पुस्तक हातात घेतलं की ते वाचताना वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही.
पुस्तक वाचन हा असा छंद आहे जो सगळ्यांनी जोपासायला हवा असं तज्ज्ञ म्हणतात. पुस्तक वाचनाचे अनेक फायदे तज्ज्ञांनी सांगितले आहेत. तुम्हालाही पुस्तक वाचनाचे हे फायदे माहिती असायलाच हवेत.
हेही वाचा!
चांगले झोपा आणि भरपूर मोठे व्हा! असं विज्ञान का म्हणतं?
पुस्तक वाचल्याने काय होते?
१. नियमित पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे आपली एकाग्रता वाढते. जेव्हा गोष्टीचं पुस्तक आपण वाचतो तेव्हा त्यात गोष्ट असते. पात्रं असतात. हे सर्व नीट समजणं आवश्यक असतं. त्यामुळे पुस्तक वाचताननाते मन लावून वाचलं जातं. लक्ष एकाग्र केल्याशिवाय पुस्तकातली गोष्ट , त्या पात्राचं व्यक्तिमत्व, गोष्टीतल्या घटना लक्ष एकाग्र केलं नाही तर लक्षात येणारच नाही. म्हणून पुस्तक वाचनाच्या सवयीतून लक्ष केंद्रित करण्याची सवय लाअते. ती पुढे अभ्यास करतानाही उपयोगी पडते.
२. कुणाचा वाचनाचा वेग जास्त असतो तर कुणाचा कमी. पुस्तक लहान असो की मोठं ते वाचायला एक दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागू शकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुस्तक वाचण्यासाठी आपण हातात घेतो तेव्हा या आधी त्या पुस्तकातलं आपण काय वाचलं होतं हे आठवता येणं आवश्यक असतं. पुस्तक वाचण्याच्या सवयीतून आपली लक्षात ठेवण्याची शक्ती म्हणजेच स्मरणशक्ती देखील वाढते. पुस्तक वाचून झाल्यावर त्याबद्दल आपण मित्र मैत्रिणींशी , आईबाबांशी, भावंडांशी बोलतो. हे असं बोलताना आपण पुस्तकात जे वाचलेलं असतं ते आठवून बोलत असतो.
३. पुस्तक वाचताना आपण त्यात हरवून जातो. वाचताना जे वाचतोय त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहातं. आपण पुस्तक वाचता वाचता त्या पुस्तकातल्या जगाचा भाग होऊन जातो. पुस्तक वाचून झाल्यावर पुस्तकातल्या गोष्टीचा आपण विचार करत राहतो. पुस्तक आपल्या जगाबद्दल, माणसांबद्दल, माणसांच्या स्वभावाबद्दल सांगतं. त्यामुळे मनोरंजनासोबतच आपल्याला खूप माहितीसुध्दा मिळते.
४. पुस्तकात विविध पात्रं असतात. पात्रांच्या गोष्टी असतात. ते वाचताना आपण त्या पात्रांशी, त्यांच्या भावनांशी जोडले जातो. पुस्तक वाचनाच्या सवयीतूनच आपण अवतीभवतीचं जग, माणसं वेगवेगळी परिस्थिती, भावभावना समजून घेण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. जगताना माणसांना, परिस्थितीला, जगाला समजून घेणं खूप गरजेचं असतं. ही क्षमता पुस्तक वाचनातूनच विकसित होते.

५. पुस्तक वाचनातून विचार करण्याची, चिकित्सक, विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय लागते. आपल्यासमोर जे आलंय ते वाचून तेवढ्यावरच विश्वास न ठेवता इतर अनेक गोष्टी वाचण्याची इच्छा निर्माण होणे, वाचलेल्या गोष्टींवर विचार करणे, जे वाचलंय त्याची चिकित्सा करणे, विश्लेषण करणे, समजून घेणे ही कौशल्यं पुस्तक वाचनाची सवय लावून घेतल्याने आपल्यामध्ये नक्की विकसित होतात.
६. पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची, सवयींची माणसं भेटतात. त्यांचे रंगरुप, त्यांची पार्श्वभूमी हे सर्व वेगळं असतं. जगात किती तऱ्हेची माणसं असतात हे पुस्तकं वाचल्यानेच समजतं. पुस्तक वाचनातून आपली जगाकडे बघण्याची, स्वत:कडे बघण्याची नजर तयार होते. आपल्यात अमूक एखादी गोष्ट कमी आहे म्हणून आपण वाईट नसतो. प्रत्येक व्यक्ती सुंदर असते ही जाणीव केवळ पुस्तकच देऊ शकते.
७. पुस्तक वाचणे ही अशी सवय आहे जी शाळा सुरु झाल्यावर अभ्यास सांभाळूनही जोपासता येते. पुस्तक वाचल्याने भाषा सुधारते, शब्दसंपत्ती वाढते. आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते. याचा फायदा अभ्यास करतानाही होतोच. त्यामुळे अभ्यास चांगला होऊन परीक्षेत चांगले मार्क्सही पडतात.
आता समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड नसेल. पण पुस्तक वाचण्याचे हे फायदे वाचून ती आवड जोपासण्याचा प्रयत्न तुम्ही या सुटीत नक्की करा. काय काय वाचलं, किती वाचलं त्याबद्दलचे तुमचे अनुभव मला नक्की लिहून पाठवा. मी वाट पाहतेय!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


