चांगले झोपा आणि भरपूर मोठे व्हा! असं विज्ञान का म्हणतं?

Image: freepik

नुकताच आरोग्य दिन साजरा झाला. वर्षातून फक्त एक दिवस आरोग्याचा विचार करुन बाकीच्या दिवशी तो करायचाच नाही असं अजिबात नाही. उलट आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वर्षभर प्रयत्न करावे लागतात. दरवर्षी साजरा होणारा आरोग्य दिन आपल्याला याचीच जाणीव करुन देतो. यंदाच्या आरोग्य दिनाची वर्षभरासाठीची थीम आहे 'टुगेदर फाॅर हेल्थ स्टॅण्ड विथ सायन्स' (आरोग्यासाठी एकत्र या आणि विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा) असंही थीम सांगते.
विज्ञान हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना विज्ञान आपल्याला खूप मदत करतं. आजाराचं निदान, त्यावरचे उपचार यामागे विज्ञानाचे नियमच असतात. या पृथ्वीवर माणसांसोबत जितके म्हणून जीव आहेत त्यांच्या जगण्यामगे विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञान काय सांगतं हे पाहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. फक्त आहार विहार, आजार औषदं यातच विज्ञान असतं असं नाही तर आपल्या झोपण्यातही विज्ञान असतं. असं म्हटलं जातं की आपल्याला रात्री पुरेशी चांगली शांत झोप मिळणं गरजेचं असतं. आपली झोप चांगली झाली तरच आपण शाळेत उत्साहाने जाऊ शकतो, मित्रमैत्रिणींसोबत मजा करु शकतो, चांगला अभ्यास करु शकतो. व्यवस्थित झोप होण्यासाठी विज्ञान सांगतं की मुलांनी ९ ते ११ तास झोपणं आवश्यक आहे. अनेक गोष्टी आपण झोपेत असताना घडतात. आपण झोपलेलो असताना एका रात्रीत आपण झोपेच्या चार सायकलमधून जातो. प्रत्येक झोपेच्या सायकलमध्ये ४ स्टेजेस येतात.

हेही वाचा!

‘शू’ लागलीय? लग्गेच जा! शू रोखून धरल्याने आजारी पडाल!

Image: freepik

आपण झोपतो तेव्हा ..

स्टेज १- झोपायला गेलो की आपल्याला गुंगी यायला लागते. आपण डोळे मिटतो. डोळ्याच्या हालचाली मंदावतात.आपले डोळे वेगवेगळ्या दिशांकडे हळूहळू वळतात. आपण झोपायला जातो तेव्हा हे असं होतं.
स्टेज २  - या स्टेजमध्ये आपलं शरीर आणि मन शांत होतं तसा आपला मेंदू झोपेच्या असंख्य सिग्नल्स द्यायला लागतं.
स्टेज ३- या स्टेजमध्ये आपल्याला गाढ झोप लागते. या स्टेजमध्ये आपल्या शरीराची वाढ होते आणि शरीराची झीज भरुन निघते. या टप्प्यात मेंदूकडून येणारे तरंग मोठे आणि मंद होतात . आणि म्हणूनच आपल्याला झोपेतून उठवणं अवघड होतं.
स्टेज ४ - हा शेवटचा टप्पा. याला REM म्हणतात. म्हणजे या टप्प्यात डोळे मिटलेले असतात. पण डोळ्यांची जलद हालचाल होत असते. या टप्प्यात आपला मेंदू आपण जागे असताना जसा सक्रीय असतो तसा ॲक्टिव्ह असतो. आणि या टप्प्यात आपल्याला जे स्वप्न पडतात ते आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या घटनांशी मिळतेजुळते असतात.

Image: freepik

चांगली झोप का हवी?

चांगली झोप येणं हे गरजेचं असतं. पण झोप लागणं ही सोपी गोष्ट नाही. चांगल्या झोपेसाठी आपल्या प्रयत्न करावे लागतात. झोपण्याआधी टीव्ही, मोबाइल पाहाणं टाळावं लागतं. लवकर उठणं लवकर झोपणं, भरपूर मैदानी खेळ खेळणं अशा चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक लावाव्या लागतात. चांगली झोप ही पुढे दिवसभराच्या सर्व कामांवर चांगला परिणाम करते. पण झोप चांगली झाली नाही तर सकाळी उठून शाळेत जावंसं वाटत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. नवीन काही शिकणं अवघड वाटू लागतं, विसरभोळेपणा वाढतो, चिडचिडेपणा वाढतो. संताप येतो, निराश वाटायला लागतं. ज्या गोष्टी सहज करता येण्यासारख्या असतात त्या अवघड, त्रासदायक आणि डोकेदुखीच्या वाटतात. आणि म्हणूनच चांगल्या झोपेसाठी विज्ञान काय म्हणतं ते ऐकायला हवं. स्वत:ला आनंदी आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर झोप खूप महत्वाची भूमिका पार पाडते. चांगल्या झोपेमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. झोपेमुळेच आपली स्मरणशक्ती पक्की होते. चांगल्या झोपेमुळे आपल्या मेंदूला आठवणी साठवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरु झाल्या आहेत. सुटी म्हटलं की झोपायला, उठायला नियम नाहीत असं वाटायला लागतं. आणि उशिरा झोपणं, उशिरा उठणं अशा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. विज्ञानाने सांगितलेलं झोपेचं महत्व लक्षात घेऊन चांगल्या झोपेसाठी स्वत:ला शिस्त आजपासूनच लावायला हवी!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact