-डॉ. सुजित पाटील,
बालरोगतज्ज्ञ
पुणे.

काय चाललंय मग? अभ्यास? मग जरा थांबा, कारण आज मला तुमच्याशी अभ्यासापेक्षाही महत्त्वाच्या असलेल्या एका विषयावर बोलायचंय. तो विषय म्हणजे तुमची 'वॉटरबॅग' आणि तुमची 'शू' (लघवी)!
तुम्हाला वाटेल 'वॉटरबॅग' आणि 'शू' हे कसले महत्त्वाचे विषय? त्याची पण एक 'स्टोरी' आहे, सांगतो. माझ्याकडे परवा श्रेया आली होती. ती १० वर्षांची आहे, म्हणजे साधारण तुमच्याएवढीच... श्रेया बरेच दिवस आजारी आहे. मी दिलेल्या कुठल्याही औषधाने तिला बरं वाटत नाहीये. त्यामुळे खरं सांगायचं तर माझीच झोप उडाली आहे... शेवटी मी खूप खूप प्रश्न विचारुन, तिला बिचारीला 'बोअर' होईल एवढे प्रश्न विचारले तेव्हा मला एक 'सिरियस' गोष्ट समजली. शाळा, शाळेतली शिस्त या टेन्शनमुळे, उगाच अध्येमध्ये 'शू' ला जायला लागू नये म्हणून ती दिवसभर पाणीच पित नाही. 'शू' आली तरी तासनतास ती बाथरुमला जात नाही. हे ऐकून परत माझी झोप उडाली, कारण 'शू' रोखून धरणं म्हणजे शरीरात 'कचरा' साठवणं!
हेही वाचा!
पिटू पक्ष्याच्या पोटात प्लॅस्टिकचे ४०३ तुकडे! त्याच्या पोटात एवढं प्लॅस्टिक कुठून आलं?
आपलं शरीर म्हणजे एक भन्नाट मशीन आहे. आपण पाणी प्यायलं की या मशीनमधली सगळी घाण स्वच्छ होते आणि 'शू' झाली की ती घाण बाहेर पडून जाते. घरात साठलेला कचरा तुम्ही बाहेर टाकलाच नाही तर काय होईल? वेळच्या वेळी 'शू' केली नाही तरी तेच होतं. सगळे 'बॅक्टेरिया' मिळून तुमच्या शरीराच्या आत पार्टी करायला लागतात... ही पार्टी एवढी डेंजर असते की ती तुमच्या किडनीची वाट लावू शकते.
मग आता यावर उपाय काय?
उपाय आहे आणि तोही सिंपल आहे… तुमची ‘वॉटरबॅग’ सतत भरली जायला हवी आणि ‘रिकामी' ही व्हायला हवी!
मला भेटणारी कितीतरी मुलं शाळेत मधली सुट्टी होईपर्यंत पाणी पीत नाहीत. का? तर ‘शू’ ला जायला लागेल म्हणून! ही सवय लगेच बदलायला हवी. वाहतं पाणी नेहमी स्वच्छ असतं आणि साचलेल्या पाण्यात खूप कचरा असतो, हे तुम्ही बघितलंय ना? शाळेत जाताना भरुन घेतलेली ‘वॉटरबॅग’ शाळेतून घरी येईपर्यंत रिकामी व्हायलाच हवी. मध्येच संपली तर शाळेतल्या पिण्याच्या पाण्याने भरुन पाणी पित राहाणं हे तुमचं काम आहे… आणि हे काम सॉरी टू से, पण तुमच्या अभ्यासापेक्षाही महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही प्यायलेलं पाणीच तुमच्या शरीराच्या ‘मशीन’ ला थंड आणि स्वच्छ ठेवतं.
लक्षात ठेवा, शाळेत मिळणारे मार्क्स महत्त्वाचे आहेतच, पण ते मिळवण्यासाठी तुमचं शरीरही ठणठणीत हवं. त्यामुळे ‘वॉटरबॅग’ रिकामी करायची आणि 'शू' आली की लगेच जायचं... कळलं?
तुम्ही वाचलात हा लेख? - आता शाळेत नेऊन तुमच्या शिक्षकांना, मित्रमैत्रिणींनाही वाचायला द्या! आणि शू लागली, तर न लाजता शिक्षकांकडे 'ब्रेक' मागा. अनेक शाळांमध्ये आता 'वॉटर बेल' असते. तुमच्याही शाळेत आहे का?

हे नियम लक्षात ठेवा
१. ‘शू’ किंवा ‘शी’ होणार असेल तर कितीही महत्त्वाचा तास सुरु असेल तरी हात वर करुन टीचरना सांगा आणि ‘वॉशरुम’ गाठा. घाबरू नका, लाजू नका…कारण तुमचं आरोग्य अभ्यासापेक्षा महत्त्वाचं आहे.
२. तहान लागायची वाट बघू नका. अधूनमधून दोन-दोन घोट पाणी पीत राहा. जेवढी ‘वॉटरबॅग’ रिकामी होईल, तेवढी तुमची 'मेमरी' शार्प होईल आणि थकवा येणार नाही, हे लक्षात ठेवा.
३. ‘शू’ करताना दुखत, जळजळत असेल, पोटात दुखत असेल तर लगेच आईबाबांना सांगा आणि तुमच्या डॉक्टरांना भेटा. यात लाजण्यासारखं काही नाही.
ndbsushil21@yahoo.co.in
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


