
हॅलो मुलांनो…
तुमच्यापैकी कोण कोण रोज घरी येणारा पेपर वाचतं? न्यूज चॅनल्सवरच्या बातम्या बघतं?
तुम्ही रोज बातम्या वाचत / बघत असाल तर तुम्हाला अमेरिका आणि इस्त्रायल या देशांनी इराणवर हल्ला केल्यानंतर सुरु झालेल्या युध्दाबद्दल नक्की माहिती असेल. या युध्दात इराणमधल्या एका शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्या शाळेतल्या सगळ्या लहान मुली मारल्या गेल्या, हेही तुम्ही वाचलं असेल.
अशा बातम्या बघितल्या, वाचल्या की मोठ्या माणसांनाही टेन्शन येतं. भीती वाटते. तुम्हालाही वाटते ना भीती? - हा असा एखादा बॉम्ब आपल्या गावावर पडला तर?-अशा विचाराने भीती वाटून काही मुलांना झोपही येत नाही. जे काही चालू आहे ते बघून कुणालाही अशी भीती वाटणं अगदी ‘नॉर्मल’ आहे. पण म्हणुन मग युध्दाबद्दलच्या बातम्या वाचायच्या / बघायच्याच नाहीत का? - तर तसं नाही. तुम्ही लहान असलात, तरी आपल्या जगात काय चालू आहे हे तर् तुम्हाला माहिती असलंच पाहिजे.... पण मग भीती वाटते त्याचं काय करायचं?
- तर नीट विचार करायचा. काही गोष्टी कठीण असल्या तरी त्या समजून् घेण्याचा प्रयत्न करायचा. कसं करायचं हे?
हेही वाचा!
झोपण्याआधी टीव्ही पाहिला तर काय बिघडलं?

काय लक्षात ठेवायचं?
१. युद्ध गुंतागुंतीचं असतं.. आणि प्रत्येक युद्धामागे काहीतरी इतिहास असतो
२. कुठलंही युद्ध एका दिवसात अचानक सुरू होत नाही. त्या युद्धामागे बराच मोठा इतिहास, मतभेद, राजकरण असतं. दोन देश, त्यातली माणसं, राजकारण यांमुळे ही युद्धं होतात. अनेकदा त्यामागची कारणं कितीतरी वर्षं जुनी असतात.
३. बातम्यांमध्ये बरेचदा फक्त अलिकडच्या, ताज्या गोष्टी सांगितल्या जातात. पण पुस्तकं, इंटरनेटवर एकमेकांशी युध्द करण्याऱ्या देशांची माहिती मिळवून आपण ती वाचू शकतो. तसं केल्यामुळे आपल्यालाच जास्त नेमकी माहिती मिळू शकते.
४. बातम्या छापताना / दाखवताना बहुतेकवेळा फक्त एखादाच फोटो, व्हिडिओ आपल्याला दाखवतात. पण ते फोटो, व्हिडिओ म्हणजेच जिथे युध्द सुरु आहे तिथली खरीखुरी परिस्थिती असते असं नाही. म्हणजे क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्यावर उठणारे आगीचे लोळ. तसे फोटो दिसले म्हणजे ते अख्खे देश असे सतत होरपळत असताततासं नाही हे लक्षात ठेवायचं.

५ . युद्ध सुरु असलेल्या देशातला काही भाग सोडला तर इतर भागातले लोक आपलं नेहमीचं जगणं जगत असू शकतात. मुलं शाळेत जातात. युद्ध थांबवण्यासाठीही अनेक लोक प्रयत्न करत असतात. युद्धात ज्यांना काही त्रास होतो त्यांना मदत करणारेही खूप लोक काम करत असतात.
६. सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन दिसतं ते सगळं खरं असतंच असं नाही. कधी कधी जुनेच फोटो, व्हिडिओ नवीन असल्यासारखे दाखवले जातात. काही वेळा जुने फोटो मॉर्फ किंवा एडिट करुनही दाखवले जातात. हे करणं बरोबर नसतं.
७. त्यामुळे असं काही पहायला मिळालं तर - ही बातमी खरंच खरी आहे का? ही बातमी सगळीकडे प्रसिद्ध झालेली दिसते का? हे जुनं, खोटं किंवा अफवा नाही ना?- हे प्रश्न पडायला हवेत. त्यांची उत्तरंही शोधता यायला हवीत. जे खरं नाही ते पुढे पाठवायचं नाही हे तुम्ही मोठ्या माणसांना सांगायला हवं.
८ युध्दाच्या बातम्यांमध्ये दिसतात ती शाळेत जाणारी मुलं, कामावर जाणारे त्यांचे आईबाबा, देशासाठी लढणारे सैनिक, युद्धात त्रास होणाऱ्या लोकांना मदत करणारे लोक हे सगळे खरेखुरे आहेत. युद्धामुळे त्या सगळ्यांना खूप त्रास होतो. त्यांच्या आयुष्यावर युद्धाचा परिणाम होतो.
९. अनेक डॉक्टर, स्वयंसेवक, पत्रकार, स्वयंसेवी संस्था या युद्धात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे युद्ध कितीही अवघड, वाईट असलं तरी त्यात काही चांगली माणसं चांगलं कामही करत असतात, हे विसरायचं नाही.१०. भीती वाटणारच थोडी, पण घाबरायचं नाही. ज्या गोष्टी समजत नाहीत त्याबद्दल आईबाबांना, शाळेत शिक्षकांना जरूर विचारा.
लहान मुलांनी हे सगळं का करायचं? - आजची मोठी माणसं ज्या चुका करत आहेत, त्याच चुका तुम्ही मोठे झाल्यावर तुमच्याही हातून होऊ नयेत, म्हणून...
हे असं सगळं केल्यामुळे तुम्ही मोठे व्हाल तेव्हा जबाबदार, विचारी आणि समंजस नागरिक व्हाल… तसे झालात तर तेव्हाचं जग तुम्ही अधिक चांगलं करु शकाल.
काय वाटलं वाचून ? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


