झोपण्याआधी टीव्ही पाहिला तर काय बिघडलं?

पण का?

- डॉ कल्पना सांगळे,
बालरोगतज्ज्ञ, पुणे

Image: freepik

अवनीश माझ्या शेजारी राहातो. त्याला काही दुखलंखुपलं की त्याची आई घरीच येते त्याला घेऊन. परवा असाच अवनीश आला तेव्हा ‘तो झोपतच नाही’ ही तक्रार त्याच्या आईने केली. ‘का रे झोपत नाहीस?’ विचारलं तर म्हणतो मला झोपच येत नाही… पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो ना, तेव्हा घड्याळाला किल्ली द्यायला लागायची, तशी आता अवनीशच्या झोपेलाही किल्ली द्यायला हवी असं वाटलं, म्हणून मी त्याला समोर बसवून काही गोष्टी सांगितल्या.
त्या आज तुम्हालाही सांगणार आहे…

अवनीश - डॉक्टर काकू, संध्याकाळी खेळून घरी आलो की तेव्हापासून आई झोपेचं टुमणं लावते. लवकर आवर, म्हणजे लवकर झोपता येईल… सारखं सगळं लवकर कशाला करायला हवं? झोपायची एवढी घाई कशाला करतात मोठी माणसं?
मी - हे बघ अवनीश, आपलं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी, छान अभ्यास होण्यासाठी, भरपूर खेळायचा स्टॅमिना राहाण्यासाठी चांगलं सकस खाणं, स्वच्छता म्हणजे हायजीन जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढीच पुरेशी शांत झोपही आवश्यकच आहे. त्यामुळे आई सांगते ते बरोबरच आहे. तू खेळून घरी आलास की काय काय करतोस मला सांग बरं जरा.

 हेही वाचा!

भाज्या, उसळी, सॅलेडस खाण्याचा एवढा आग्रह कशासाठी? हे नाहीच खाल्लं तर?

अवनीश - खेळून आलो की हातपाय धुवून अभ्यासाला बसतो, मग जेवता जेवता टीव्ही बघतो. ते झालं की शाळेचं दप्तर भरतो आणि झोप येईपर्यंत पुन्हा टीव्ही बघतो.
मी - आत्ता मला कळलं तुला झोप का येत नाही ते… झोपेचा शत्रू नंबर एक म्हणजे टीव्ही किंवा मोबाईल. किंवा कुठलाही स्क्रीन, अगदी कंप्यूटर आणि टॅब पण… आपण झोपायच्या आधी किमान दोन तास कुठलाही स्क्रीन बघायला नको, नाहीतर झोप उडालीच म्हणून समज.
अवनीश - पण झोपेचा आणि टीव्हीचा काय संबंध? एवढी का महत्त्वाची आहे ही झोप?

अवनीशने असं विचारताच मला चान्सच मिळाला. झोप का महत्त्वाची त्याची लिस्टच मी त्याला सांगितली.

झोप महत्वाची का?

१. झोपेमुळे आपल्या शरीराची वाढ होत असते. जितकी चांगली झोप तितके आपण उंच होतो आणि आपलं वजनही वाढतं. आपल्या शरीरात एक ग्रोथ हार्मोन असतं. ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतं. आपण झोपतो तेव्हाच ते शरीरात स्त्रवतं.
२.आपली झोप पूर्ण झाली की आपण दिवसभर आनंदी असतो. आपली चिडचिड होत नाही.
३. झोपेत आपल्या शरीराला, डोळ्यांना, मेंदूला आणि हृदयाला चांगला आराम मिळतो.
४. शरीराला आणि मेंदूला आराम मिळाला की आपली प्रतिकारशक्ती जोमाने काम करते. त्यामुळे आपल्याला बरं नसेल तर आपण निवांत झोपणं अजूनच महत्त्वाचं असतं.
हे सगळं अवनीशला थोडं थोडं पटलंय असं वाटलं, ‘टीव्ही लवकर बंद करायचा हे माझ्या आईबाबांनाही सांगा काकू…’ असं मला सांगून तो आज गेला आहे. आता त्याच्या झोपेची प्रगती बघायला पुढच्या आठवड्यात मी भेटेनच परत त्याला. तोपर्यंत तुम्हीही ही लिस्ट वाचा आणि बदल करा तुमच्या रोजच्या वेळापत्रकात!

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact