-वैशाली गेडाम

मी लहान होते तेव्हा माझा एक आवडता उद्योग होता, तो म्हणजे झोपळ्यावर बसून तासनतास कल्पनेच्या जगात बुडून जाणे. किती प्रकारच्या कल्पना असायच्या त्या!
मी लहानपणी जी पुस्तकं वाचली त्या पुस्तकातील गोष्टी माझ्या कल्पनेत असायच्या. तुम्ही पण कल्पनेच्या जगात फिरता का? तुमच्या माझ्या कल्पनेच्या 'कंटेट'मध्ये फरक असेल. पण कल्पनेचा रोमांच तर सारखाच असेल.
मी लहानपणी जे वाचलं, पाहिलं, अनुभवलं त्यानुसार माझ्या कल्पनांची घोडदौड चालायची. तुमच्या जगात डेमाॅन स्लेयर, नरुतो, जुजुत्सु कैसन असेल. तांजिरो, नेझुको, सतोरो गोजो, युजी इतादोरी, मेगुमी फुशिगूरो ही पात्रं तुमच्या डोक्यात फिरत राहात असतील. तुम्ही अग्निपंख वाचलं असेल तर डोक्यात अब्दुल कलामही असतील. मंगळ ग्रहावर घर बांधल्याची कल्पना, टाइम मशीनमध्ये बसून जाण्याची कल्पना किंवा एनीव्हेअर डोअर. मला तर आत्तापण एका क्षणात माझ्या घरातून मी थेट माझ्या शाळेत असावे असं वाटतं. तुम्हाला पण काही ना काही नक्कीच वाटत असेल ना? जसे एखादे न आवडणारे शिक्षक शाळेत येऊच नयेत. त्यांनी पाय पुढे टाकायचा प्रयत्न करावा पण कोण्यातरी अदृश्य शक्तीनं त्यांचे पाय जखडून ठेवावेत.. चंद्रावर मी जागा घेतली आहे आणि आता तिथे मी घर बांधत आहे. हे घर माझ्या मनासारखे आहे. मी तिथे रहात आहे.. ही कल्पना किती मजेशीर आहे ना? अशा कितीतरी कल्पना आपल्या मनात येत असतात. हे एवढं सगळं कल्पनेच्या जगात सुरु असतं आणि कोणाला या कल्पनांचा थांगपत्ता पण नसतो.
हेही वाचा!
खेळ खेळताना एवढा उत्साह कुठून येतो?
आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी असा कल्पना विहार खूप महत्त्वाचा असतो. आपल्या डोक्यातल्या कल्पना इच्छा नसेल तर त्या कोणाला सांगण्याची गरजही नसते. तुमच्या कल्पनांचे राजे तुम्ही आहात. आम्ही मोठी माणसं उगाच लुडबुड करत असतो तुमच्या डोक्यात काय चाललंय ते शोधण्यासाठी. तुम्ही सांगू नका मला किंवा इतर कोणालाही. पण तुमची कल्पनांची रोमांचक शक्ती मरू देऊ नका. शाळेत तुम्हाला निबंध म्हणून कल्पनाविस्तार सांगितलेला असतो. मी अमुक झालो तर.. मला पंख फुटले तर.. वगैरे वगैरे. पण आपला कल्पनाविस्तार हा परीक्षेतील निबंधापुरताच मर्यादित राहायला नको. आपल्याला डोक्यात कल्पनांना मुक्त प्रवेश देता यायला हवा.
शाळेच्या अभ्यासातील किंवा परीक्षेतील कल्पनाविस्ताराचा तुम्ही जास्त ताण घेऊ नका. आपल्या कल्पनेच्या जगात मस्त विहरत राहा. बघा या कल्पनांमुळे आपलं रोजचं आयुष्य किती मजेदार आणि कल्पक होतं ते!
(प्राथमिक शिक्षक+मुख्याध्यापक
जि. प. प्रा. शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जुनी)
ता. जिवती, जिल्हा - चंद्रपूर)
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


