इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युध्दात होर्मुझची एवढी चर्चा का होतेय?

Image: Image: bbc

अमेरिका, इस्त्राएल, इराण हे देश आपल्यापासून खूप लांब आहेत. त्यांच्यात २८  फेब्रुवारीपासून युद्ध पेटलं आहे. तेव्हापासून सतत आपल्याकडेही या युध्दाच्या बातम्या सुरु आहेत. युध्द इतकं लांब सुरु असूनही आपल्या देशात , तसेच घराघरात या युध्दाने वातावरण गंभीर केलं आहे. हे झालं त्याला कारणीभूत ठरली ती होर्मुझची सामुद्रधुनी. आज या सामुद्रधुनीतून होणारा जहाजांचा प्रवास इराणणे अडवल्याने संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला. संपूर्ण जगाचे डोळे या होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे लागलं आहे. इथल्या जहाजांचा प्रवास सुरु झालाय का याचा कानोसा अवघं जग घेतं आहे. ही होर्मुझ सामुद्रधुनी जगासाठी महत्वाची आहे त्यामागे विशिष्ट कारणं आहेत.

 

हेही वाचा!

युध्द चालू असताना मुलं कशी खेळतात?

होर्मुझची सामुद्रधुनी एवढी महत्त्वाची का?

* होर्मुझची सामुद्रधुनी ही आशियाच्या मध्यपूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताला जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी इराणच्या आखाताला अरबी समुद्र आणि हिंदी महासागराशी जोडते. ही सामुद्रधुनी जगातल्या महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेस इराण आहे तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती आणि ओमान हे देश आहेत.
* जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. होर्मुझ हा जगातला सर्वात महागड्या जलमार्गापैकी एकआ हे. या मार्गाला 'चोक पाॅइंट' असंही म्हटलं जातं. चोक पाॅइंट म्हणजे पाण्यातला अरुंद मार्ग ज्यातून जहाजांना जावंच लागतं.
*जगास आवश्यक असणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा याच मार्गाने होतो. जगाच्या एकूण गरजेच्या एक तृतियांश द्रव नैसर्गिक वायूचे, तसेच २० टक्के खनिज तेलाचे टॅंकर या मार्गाद्वारे जगभरात जातात. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची आहे.
* होर्मुझ हा जगाला तेल आणि ऊर्जा पुरवणारा महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. इथून प्रवास करुन बाहेर पडलेलं खनिज तेल चीन, जपात, भारत, दक्षिण कोरिया या देशात जातं. जगाला आवश्यक ऊर्जा या होर्मुझच्या छोट्या अरुंद मार्गावर अवलंबून आहे. जर हा मार्ग बंद झाला , जहाजांच्या वाहतुकीला काही अडथळा आला तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि खनिज तेलाच्या किंमतीवर होतो. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांना हा होर्मुझ मार्ग बंद होऊ नये असं वाटतं. व्यापारासाठी महत्त्वाचं असलेलं हे ठिकाण राजकीय, लष्करी तणावात मात्र ताणाचं मध्यवर्ती केंद्र होतं.

Image: bbc

होर्मुझवर तणाव निर्माण होतो तेव्हा?
* सन १९८० मध्ये इराण -इराक युध्द झालं. इराणने सोडलेल्या बोटीवर इराक सैन्य हल्ला करीत. इराण इराकशी संबंधित जहाजांवर हल्ला करीत. हे युध्द त्यावेळेस 'टॅंकर वाॅर' म्हणून ओळखलं गेलं. युध्द संघर्ष ही कारणं सोडली तर ही सामुद्रधुनी कधीही जहाजांच्या प्रवासासाठी बंद नसते. आताही इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युद्धात काही प्रमाणात का होईना मालवाहू जहाजांचा प्रवास सुरु आहे.
* अमेरिकेचे नौदल, इतर देशांचे नौदल या सामुद्रधुनीतील जहाजांचा प्रवास संरक्षित करण्यासाठी देखरेख ठेवतात. यातून काहीवेळा तणाव निर्माण झाले आहेत, अपघातही झाले आहेत. १९८८ मध्ये अमेरिकन युध्दनौकेने इराणचं प्रवासी विमान पाडलं. ज्यात २९० प्रवासी मारले गेले. नंतर अमेरिकन सरकारने स्पष्टीकरण दिलं की आमच्या युध्दनौकेला वाटलं की हे हमला करणारं फायटर जेट आहे त्यामुळे ते पाडलं.
* होर्मुझ हा मार्ग अतिशय व्यस्त मार्ग आहे. येथे जहाजांच्या टकरींच्या घटनाही घडलेल्या आहेत. २००७ मध्ये अमेरिकेची आण्विक पाणबुडी आणि मोठं जपानी तेल टॅंकर यांच्यात धडक झाली होती. २००९ अमेरिकन पाणबुडी आणि अमेरिकन नौदल जहाज यांच्यात टक्कर झाली होती.
* दोन देशांत राजकीय बेबनाव झाल्यानंतर, इतर देशांनी इराणवर आर्थिक दंड लादले तेव्हा इराणने अनेकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, इंग्लड, फ्रान्स त्यांच्या युध्दनौकांद्वारे ही सामुद्रधुनी सुरक्षितरित्या खुली ठेवण्यास प्रयत्न करतात.
* इराणने २०१९ मध्ये ब्रिटीश झेंडा असलेले तेल जहाज पकडलं होतं. तर २०२४मध्ये इराणी सैन्याने एक कंटेनर जहाज जप्त केलं होतं.
* होर्मुझ ही सामुद्रधुनी अरुंद आहे. त्यामुळे जहजांचा प्रवास अवघड करणे, असुरक्षित करणं, समुद्र सुरुंग पेरणं, वेगवान बोटींची धडक देणं, क्षेपणास्त्र हल्ला याद्वारे इराण समुद्री वाहतुकीला धोका निर्माण करु शकतं. पण अमेरिकेसारखे प्रबळ देश या सामुद्रधुनीवर आपल्या सशक्त सैन्यांचा वावर या क्षेत्रात असतो. आपल्या सैन्याद्वारे हा मार्ग पुन्हा खुला करण्याची क्षमता आपल्यात आहे असं अमेरिकेसारखे देश म्हणतात.

होर्मुझ हे नाव कसं पडलं?
* यामागे विविध सिध्दांत सांगितले जातात. चौथ्या शतकात शापूर दुसरा हा पर्शियन राजा होता. त्याच्या आईचं नाव इफरा हुर्मिझ. त्यांच्या नावावरुन हे होर्मुझ नाव पडलं असावं असं म्हटलं जातं.
* हे नाव पर्शियन शब्द हर-मोघ म्हणजे खजूर या शब्दावरुन पडलं असावं असं म्हटलं जातं.
* प्राचिन झोराष्ट्रियन धर्मात होर्मुझ नावाचा देव. त्यावरुन हे नाव पडलं असावं
* भूतकाळात ओरमस नावाचे शक्तीशाली व्यापारी साम्राज्य होते. त्या नावावरुन होर्मुझ हे नाव पडलं असावं असं म्हटलं जातं.

 

होर्मुझ सामुद्रधुनीवर वाहतुकीची काळजी
* होर्मुझच्या अरुंद मार्गातून प्रवास करताना मोठमोठ्याला जहाजांची टक्कर होवू नये म्हणून वाहतुक विभागणारी व्यवस्था या सामुद्रधुनीवर आहे.
* जे जहाज पर्शियन आखातात जातात त्यांच्य्यासाठी स्वतंत्र मार्गिका आहे.
* पर्शिय आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी वेगळी मार्गिका आहे.
* प्रत्येक मार्गिका दोन मैल रुंद आहे. या मार्गिका दोन मैल रुंद मध्यकाने विभागलेल्या आहेत. त्यामुळे जहाजांची टक्कर टाळली जाते.
* या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजे इराण आणि ओमान या दोन देशांच्या पाण्यातून प्रवास करतात. सामुद्रधुनी जहाजांच्या प्रवासासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी 'युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लाॅ ऑफ द सी' सारखे आंतरराष्ट्रीय नियम आहेत.
* जहाजांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी, ही वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी ओमानच्या एका बेटावर रडार स्टेशन आहे.